हा ब्लॉग शोधा

सोमवार, २१ जानेवारी, २०१९

गती


साचता साचता | विरूही लागते
आयुष्य भासते | एक कोडे

दबून राहती | सरपटताना
भीत जगताना | किडे मुंग्या

कुणी घेत राही | आकाशी भरारी
दूर अधांतरी | विहरत

आपापला जो तो | त्यात अभिमान
पेरे देहभान | विसरून

एकत्वाचे तत्व | बळेबळे ह्यात
कुणी कल्पनेत | पाहतात

प्रत्यक्षात मात्र | यातनामयता
जिवास जगता | ग्रासतसे

अटळच सारे | चढ व उतार
उजेड अंधार | सर्वथैव

परिपक्वतेचा | कशासाठी ध्यास
उगा का मनास | संमोहन

परिपूर्ण काही | नसतेच कधी
असे स्वप्न व्याधी | हेच सिद्ध

विटेवर वीट | लावीत जगावे
अपूर्णत्व व्हावे | पूर्ण सत्य

चिरंतन सत्य | केवळ आभास
प्रवास प्रयास | हीच सत्ये

जसा साचण्याचा | तसा विरण्याचा
वसा आयुष्याचा | गती फक्त


- निलेश पंडित
२२ जानेवारी २०१९

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा