हा ब्लॉग शोधा

शुक्रवार, ८ फेब्रुवारी, २०१९

हुंकार

(वृत्त: परिलीना)

दिसते ते अपुरेसे वेगळीच प्रचिती
शब्दकळा वर खाली भाव गूढ वसती
... पदरापदरात दडे अनपेक्षित जगणे
उंचसखल कृष्ण श्वेत ओहोटी भरती

भिंती कित्येक सभोती खिडक्या थोड्या
पसरे सागर अथांग तुरळकशा होड्या
... होडीशी होडीचे गूज खेळ केवळ
स्वप्नांच्या शरिराला सत्याच्या कुबड्या

कागद तर उंदिरही सगळे कुरतडती
शब्दांचे शब्दांवर थर तसेच पडती
... लिहिलेच न त्यात दडे गर्भितार्थ सारा
मूळ खोड स्तब्ध मात्र पाने थरथरती

कल्पनेतलाच भला पण तो आधार
फुटका तुटकाच मात्र देतो आकार
... व्यक्ताव्यक्तात जसे काव्य जन्म घेई
ऐकविते माती आकाशा हुंकार


- निलेश पंडित
९ फेब्रुवारी २०१९

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा