हा ब्लॉग शोधा

शुक्रवार, १५ फेब्रुवारी, २०१९

देश


आयच्यान् भाड्यांनो
तुमी इचारता
त्येबी माज्या मांगं गावात
मी अशी का निपजली
आन् जाती अंधारात
रातच्याला कुटं कुटं?

आयच्या मंगळसुत्राच्या वाट्या
दोन बांगड्या
आन् उरलेली अर्धा गुंठा जिमीन
इनामदाराला इकून
पाटलाच्या शेतात मजूरी करून
वर गाय तारन ठ्यून
सह्कारी प्येडीतून कर्ज काडून
शिकिवलं न लावला नोक्रीवर
बा नं माज्या संबादादाला
आय म्येल्यावर

"जिमीन, दागिनं आन् अठवन्
जित्या प्वाराप्येक्षा कदी मोटी असती का कुटं"
म्हनत
... धाडला बर्फात चाकरीवर

त्यो म्येला ... काय धारातिर्थि का काय म्हनं ...
द्येव, द्येश आन् धर्मापायी म्हन्त्यात नव्हं!

झ्यांड्यात गुंडाळून आनला त्येला
मंग जाळला
पन् आमची मनी आर्डर थांबली

... आता आमी
मी न् खाट धरल्याल्या बानं
खावं काय?

द्येशासाठी यवडं कराया नगं?


- निलेश पंडित
१६ फेब्रुवारी २०१९

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा