हा ब्लॉग शोधा

शुक्रवार, ८ मार्च, २०१९

गोल


खोदावे जितके माणसात
तितके सापडे
तलम रेशमी त्वचेखाली
पशूत्व रांगडे

शांततेत सळसळ गूढ
वाटते भयाण
अरण्यात लपती शिकारी
बांधून मचाण

पदोपदी उदात्ततेखाली
गरजेचा वास
सुसूत्रता वरवर वसे
आत स्वप्नभास

साचा रचना बाहेर आत
वसते पोकळी
जंगलाच्या कुंपणात कैक
श्वापदे मोकळी

द्वैताद्वैत कल्पनेत लख्ख
विरोधाभासही
अवघे आयुष्य माजविते
सर्वव्यापी दुही

जन्मापासून मृत्यूपर्यंत
सांभाळीत तोल
दिशेच्या भ्रमात जग सारे
फिरे गोल गोल


- निलेश पंडित
९ मार्च २०१९

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा