हा ब्लॉग शोधा

शुक्रवार, २२ मार्च, २०१९

बीळ


बीळ मिळता एक त्यातच जन्म आम्ही काढतो
जन्मभर कित्येक वर त्यातच बिळेही पाडतो

शोषताना रक्त ते विकतात स्वप्ने नेहमी
आणि मग बदल्यात निद्राधीन आम्ही राहतो

तू भले ओळख विसर नजरानजर टाळून जा
दूरवर सारी तुझी अस्वस्थता मी पाहतो

दूर सीमेवर कुणी निष्पाप मरती नेहमी
दु:ख की आनंद मी ती कोण ह्यावर ताडतो

चांगला पर्याय नसणे ही समस्या आमची
मेणबत्त्यांनाच आताशा मशाली मानतो

वर्तमानाला भविष्याला इथे किंमत नसे
शेवटी इतिहास उरता तोच मी गोंजारतो

पाच वर्षांनी अपेक्षा नेहमी उंचावल्या
मात्र विश्वासार्ह आता फक्त कुत्रा वाटतो


- निलेश पंडित
२३ मार्च २०१९

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा