हा ब्लॉग शोधा

गुरुवार, २८ मार्च, २०१९

अदृश्य


स्वच्छ वातानुकुलित
वातावरणात
मादक सुगंधात
लयबद्ध मंद कर्णमधुर
संगीताच्या रुंजीत
शिस्तबद्ध आराखड्यात
परीटघडीच्या फिकेपणात

लिबलिबलेली हडकुळी
तरीही अर्धवट कुठेसं बांधलेल्या
रिबिनीसारखी फडफडणारी
अनेकदा चकचकीत धातूसारखा
रंग दिलेली
विकृत प्रतिबिंब दिसावं
इतरांना त्यांचं स्वतःचंच
इतकी चमकती
पण नेमकं दिसू नये काही
इतकी ओबडधोबड कुरुप
किंचित् ओशट
किंचित् घामट
थोडी बुरसटलेलीही
कधी अचानक उत्साही
खळखळती
वाहती खेळती
बागडती दिसली क्षणकाळ तरी
लगेच कोमेजणारी
कधी शांत वाटली तरी स्फोटक
तर केव्हा शब्दांची कारंजीच
क्वचित स्वच्छ
एरवी अस्वच्छ
त्रस्त अगतिक
आक्रमक व्यग्र
मनं

जेव्हा वसवतात
अजागळ अस्ताव्यस्त
दीर्घकालीन
असह्य होणाऱ्या
दुर्गंधीपूर्ण रोगट वृत्तीच्या
बुजबुजाटातल्या
संकुचितपणाच्या
अदृश्य झोपडपट्ट्या

तेव्हाच जन्मतात
नेमक्या तशाच
मात्र मूर्त, खऱ्याखुऱ्या
निष्पाप जिवांना
उद्ध्वस्त पंगू गलितगात्र
करूनही जगवणाऱ्या
बाहेर जमिनीवरही


- निलेश पंडित
२९ मार्च २०१९


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा