हा ब्लॉग शोधा

गुरुवार, ४ एप्रिल, २०१९

अभिप्राय


तो म्हणे त्याच्याविना देशास ह्या पर्याय नाही
लाकडाला वाळवीवाचून तरणोपाय नाही?

जामिनाचा हक्क आरोपीस देते न्यायसंस्था
लोक बघती वीस वर्षे वाट हा अन्याय नाही?

कोंबडी बकरा कशाला माणसेही संपवा की
दक्षता इतकीच घ्या की बैल नाही गाय नाही

कायदे करतात काही नवनवे दिवसागणिक ते
नवनव्या असतात पळवाटा परंतू न्याय नाही

संस्कृतीला आपल्या गोंजारतो जातो तिथे तो
विकृतीवर मात्र त्याचा एकही अभिप्राय नाही

शुष्क पाचोळा मिळाला आज खजिना उघडता मी
फक्त पैसा साचलेला बाप नाही माय नाही


- निलेश पंडित
५ एप्रिल २०१९

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा