हा ब्लॉग शोधा

शनिवार, १३ एप्रिल, २०१९

गाभा



गर-सालीच्या आत खोलवर
बिया कडू गोडवा संपता
पुनरुत्पत्ती चोख जन्मते
जन्मफलाची जरी सांगता

पृथ्वीच्या अंतरात लाव्हा
सदैव वसतो अन् ठसठसतो
बाह्यांगी निद्रिस्त दिसे पण
उसळलाच तर तांडव करतो

पांढरपेशा बुरख्यांमध्ये
हिंस्त्र पाशवी दडते काही
जिथे संपते दृश्य सभ्यता
फक्त उरे वासना प्रवाही

जन्मजात लाभते जगाला
गाभ्याशी द्वंद्वाचे कोडे
उत्क्रांतीच्या रथास सृष्टी
संहाराचा लगाम जोडे

ह्या कोड्यातच पुढेच थोडे
शेवटचे पाऊल पडावे
शांत स्वच्छ छोटाच श्वास अन्
त्यात नसावे उजवे-डावे


- निलेश पंडित
१४ एप्रिल २०१९

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा