हा ब्लॉग शोधा

शनिवार, २० एप्रिल, २०१९

युद्ध


लढा आहे विविध मूल्यांमधे हे भासले होते
परंतू युद्ध मूल्ये संपण्याने पेटले होते

मनाच्या आतवर होती खुषी दाटून आलेली
जरी डोळ्यात नक्राश्रू उगीचच साठले होते

मिळाली मूठमाती जंगलाच्या कायद्यांनाही
समजले लांडग्यांनी खूप कोल्हे पाळले होते

कळेना राजहंसांना प्रजा विद्रूप का झाली
छुपे त्यांच्यात बगळे कावळे फोफावले होते

जगाला वाटले आता शहाणे राष्ट्र हे झाले
खरे तर लोक भोळेभाबडे भांबावले होते

जगाने पाहिलेले प्रश्न हे पासष्ट वर्षांचे
गुलामी संस्कृतीचे प्रश्न अवघड टाळले होते


- निलेश पंडित
२० एप्रिल २०१९


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा