हा ब्लॉग शोधा

मंगळवार, ३० एप्रिल, २०१९

पथभ्रष्ट


तो कल्पनेत होता त्यालाच ज्ञात नव्हते
सत्यास शोधताना पथभ्रष्ट फक्त झाला
सामान्य माणसाची त्यागून स्वच्छ ऊर्मी
मृगजळ बघून तृष्णा शमवायला निघाला

जगण्यात नेहमी तो योगी विरक्त वाटे
देहात खोलवर पण व्याकूळ दग्ध राही
दाबून वासनांचे कढ नेहमी उराशी
आयुष्य त्यास भासे ज्वालामुखीच देही

वर्षाव रोज होतो आता जरी फुलांचा
जाणीव कोणतीही कबरीत त्यास नाही
आली तशीच गेली सारी विरून स्वप्ने
आता कशाचसाठी तनमन उदास नाही

टाकून जी दिली ती त्याने गरीब भार्या
सांभाळते घराला झिजवीत रोज काया
भिववू तिला न शकली कुठली कधीच भीती
जखडू तिला न शकली कुठलीच मोहमाया


- निलेश पंडित
३० एप्रिल २०१९

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा