हा ब्लॉग शोधा

शनिवार, २५ मे, २०१९

विद्रोह

(वृत्त: लवंगलता)

माहित नसते काही हेही माहित नव्हते जेव्हा
कधीतरी हा प्रवास झाला सुरू असावा तेव्हा
शब्दांची अर्थाची माया विणू लागली जाळे
शुभ्र पांढऱ्याखाली गवसत गेले करडे काळे

वाट जणू मनमोहिनी तरी सोडावीशी वाटे
मऊ पाकळ्या जरी लाभल्या खुणवित गेले काटे
नित्य काळजाशी वसणारी स्वप्ने दूषित झाली
परदु:खाची धूसर छाया सुखास ग्रासत गेली

परंतु त्या जाणिवेत दडली होती भीती आत
एक पाय अनुकंपेमध्ये अन् दुसरा स्वार्थात
नित्य किनारा माझ्यासाठी मी शोधत असताना
काणाडोळा केला मीही कैक जीव बुडताना

संमोहित व्याकूळ उभा मी तसाच अजून येथे
अनुभूतींची सुखद बोचरी वर्षा भिजवत जाते
खुणावतो आजही मला तो परदु:खाचा डोह
माझा माझ्याविरुद्ध येतो उफाळून विद्रोह


- निलेश पंडित
२५ मे २०१९

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा