हा ब्लॉग शोधा

मंगळवार, ३० जुलै, २०१९

अनाम


पायाखाली वाळू  | जाते सरकत
वारा घोंगावत  | खुणावतो ||

निर्मितो मी माझा  |  पायांखाली ठसा
ज्याचा भरवसा  | क्षणकाल ||

येतात जातात  |  छोट्यामोठ्या लाटा
दूरवर छटा  |  सूर्यास्ताच्या ||

तळपायाखाली | विरतात तसे
लाटांमध्ये ठसे | हळूवार ||

लोक भोवताली  |  दूर पांगलेले
परके आपले  |  दिसतात ||

अमर्याद व्याप्ती  |  जे जे दिसे त्याची
छाती माणसाची  |  दडपते ||

मंदावता गती | नौका परतती
काही तरंगती |  किनाऱ्याशी ||

मिणमिणतात | तारकांचे दिवे
पाखरांचे थवे | शांत होती ||

गर्द काळा साचे | सर्वत्र अंधार
सोडूनी थरार | जाणिवेत ||

शांततेत दिसे | अनामशी दिशा
रुजवीत आशा | प्रकाशाची ||



- निलेश पंडित
३० जुलै २०१९

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा