हा ब्लॉग शोधा

शनिवार, ३ ऑगस्ट, २०१९

वल्गना


सूर्य आहे चालला अस्ताचलाला
वल्गना आता उजेडाच्या कशाला

जे दिसे ते नेत्रदीपक सप्तरंगी
जाग आल्यावर उमगते स्वप्नमाला

धूर सोन्याचा निघे दररोज येथे
परवडेना मात्र ते आता खिशाला

वर्तमानाची कथा बेचव निघाली
रमवतो इतिहास आताशा मनाला

राजसत्ता धर्मनिष्ठा एक दोन्ही
उंदराची साक्ष शोभे मांजराला

कायद्यांमध्ये दुरुस्त्या खूप झाल्या
वापराचा प्रश्न मग त्यातच बुडाला

आजही अभिमान आहे कासवांना
एकदा जेता कुणी त्यांच्यात झाला

फार उत्तम बोलणारे सर्व वक्ते
ऐकणे शिकवेल का कोणी कुणाला?


- निलेश पंडित
४ आॅगस्ट  २०१९

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा