हा ब्लॉग शोधा

शनिवार, १४ सप्टेंबर, २०१९

सरबत


कधीकाळी मला आयुष्य सुखकर वाटले होते
कुणी सांगून सरबत मद्य थोडे पाजले होते

पुरेसा नेहमी आधार वृक्षांनी दिला होता
जरी आभाळ डोक्यावर अचानक फाटले होते

मनाला रोज माझ्या स्वच्छ हिरवी पालवी फुटली
विचारांऐवजी सुखदु:ख जेव्हा वाटले होते

प्रसिद्धीचे जरासे वेगळे परिमाण असणारे
खरे बोलून केला त्याग पण नावाजले होते

कुणी खुडले जरी गेले तरी फुलले चिकाटीने
कुणी सांभाळले गेले तरीही माजले होते

सदोदित न्याय केला शिस्त जपली नेमकी त्यांनी
कटाक्षाने तरी जपलेच जे जे आपले होते

मिळवले खूप त्यांनी चांगले सर्वत्र अनुयायी
कुणाला बांधले होते कुणाला पाळले होते


- निलेश पंडित
१४ सप्टेंबर २०१९


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा