जागरुकतेतून संशय हाच माझा श्वास आहे
जेवढा असतो पुरावा तेवढा विश्वास आहे
आशयाची भावनांची वानवा आहे जराशी
मात्र त्याचा वृत्तछंदांचा बरा अभ्यास आहे
पाहिले ते मिळवण्याचा यत्न मी भरपूर करतो
थोडके मिळता समजते खूपसा आभास आहे
रुजवले माझ्यात मी कौशल्य मध्यमवर्गियांचे
पाठ अंधाराकडे अन् प्रार्थना सूर्यास आहे
थोर आश्वासक कुणी होईल उमदा तो महात्मा
मानवी कृत्यात त्याच्या राक्षसाचा भास आहे
विपुल समृद्धी जिथे असते तिथे हमखास असतो
अंगिकारावा असा त्याचा म्हणे संन्यास आहे
- निलेश पंडित
२१ सप्टेंबर २०१९
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा