हा ब्लॉग शोधा

शनिवार, २३ नोव्हेंबर, २०१९

समाधान


(वृत्त: दासी)

स्वप्न अप्रतिम पडते आकर्षक जे त्याचे
मन मनात रंगविते कोष्टक आभासाचे
असूनही कामातुर काम सरे श्रमांमुळे
आटपणे जगणे अवसानाने बळेबळे

काळवेळ बदलतात अन् तसेच तनमनही
वणवण उरते तशीच क्षुधा तृषा परवडही
कुबट थिजटशी खोली मळके चादर अभ्रे
जीवित पण शुष्क रुक्ष देठ पाकळ्या अग्रे

अगतिकता तडफड वाढे क्षणाक्षणात उरी
इच्छा संपूनही न देहाची धाव पुरी
गिऱ्हाईक आले तर पडते पानात अन्न
मन मरणासन्न मात्र देह भग्नतेत मग्न

समाधान मात्र तिला अजूनही खरेखुरे
खादी-भगव्या-हिरव्या पेक्षा हे जिणे बरे!


- निलेश पंडित
२४ नोव्हेंबर २०१९

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा