हा ब्लॉग शोधा

शनिवार, ११ जानेवारी, २०२०

मोहरा



जरी सगळेच जग खोटे तरीही तो खरा असतो
म्हणे तो बोलला खोटे तरी हेतू बरा असतो

सदोदित ऐतिहासिक दाखले देण्यात रमतो तो
परंतू बोलताना आजचे तो घाबरा असतो

जसे घोडे तशी तो मानतो सारी प्रजा त्याची
कुणा बंदूक अन् उपयुक्त त्याला तोबरा असतो

भल्या मोठ्या सभा तो हात उंचावून गाजवतो
खरे ते बोलताना हात थोडा कापरा असतो

बडे शास्त्रज्ञ अन् विद्वानही असतात दिमतीला
जणू आडात मोठ्या तो रिकामा पोहरा असतो

पटाच्या मध्यभागी सज्ज तो दिसतो भल्यामोठ्या
खरे तर एक केवळ मामुली तो मोहरा असतो


- निलेश पंडित
१२ जानेवारी २०२०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा