हा ब्लॉग शोधा

मंगळवार, २१ जानेवारी, २०२०

पखाली


असेच असते
नेहमीच अन् बघावे तिथे
प्रकाशगर्भासही सदोदित
अंधाराचे कवच लाभते

संथ शांत
अतिरम्य जलाशय
पोटी जपून असतो असंख्य
ओंगळ जलचर

शांत स्वस्थ पृथ्वीच्या पोटी
ठसठसतो लसलसता लाव्हा

मोहक नाजुक
आकर्षक चेहरा गोजिरा
स्मितरेषेखाली दडवी
खुनशी ह्रदयाचा
कुटील कावा

मात्र हे खरे ...
चाणाक्षाला स्पष्ट नेमके
.... हेही दिसण्याइतका अंधुक
उजेड त्याबाहेर नांदतो ....

वेडे कोणी त्याच उजेडाच्या
पेटवती लख्ख मशाली

.... आम्ही घेतो भरून
जगता जगता ऊर्जेच्या काही
त्यातून पखाली


- निलेश पंडित
२१ जानेवारी २०२०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा