हा ब्लॉग शोधा

बुधवार, ८ जुलै, २०२०

खेळ


अवघे जग गोंजारते स्वप्न आशेने
मग नकळत होते कुचंबणा सत्याची
सौजन्याचा मृदुतेचा बाह्य मुलामा
अस्वस्थता आत केवळ भयभीताची

कळवळा नेहमी आपल्याच वंशाचा
ह्या सुप्त जाणिवेस ना तोड काहीही
जगतात देह मन प्रेरणेत उगमाच्या
वर खुणावते बाजूस दुज्या प्रगतीही

क्षण क्षणास जोडत कुणी भाबडे जगती
युगप्रवर्तक कुणी संतत झिजवी जोडे
वाहता धबधबा अविरत वरून खाली
पोहती असे भेदून त्यासही वेडे

आपापलाच हा खेळ आपल्यासाठी
खेळती माणसे आणिक जनावरेही
पाहता कोण नेमके कोण त्यांमधले
पडते कोडे जे कधीच उकलत नाही


- निलेश पंडित
८ जुलै २०२०

1 टिप्पणी: