हा ब्लॉग शोधा

गुरुवार, ३ डिसेंबर, २०२०

विस्तार

 

(वृत्त: अविनाशी)

संथावते अन् पुन्हा वेग घेते

भाषा प्रवाही उधाणून येते

... हाती परंतू न सर्वार्थ येई

आयुष्य दाने अशी फक्त देते


सांभाळतो मी अशी सर्व दाने

जपतो मनाशी अधाशीपणाने

... मुरताच ती मांडतो काव्यपंक्ती

शब्दांत नि:शब्द विणतो श्रमाने


पूर्णार्थ येई तरीही न हाती

अस्वस्थता खोल उरतेच चित्ती

... धुंडाळता मी पुन्हा मार्ग तेव्हा

अपुरेपणाची कळे गूढ महती


अज्ञात देई नवे नित्य काही

दृष्टी नवी अन् नव्या प्रेरणाही

... आरंभ व्हावा जरी कल्पनेने

विस्तारती जाणिवा अन् दिशाही


- निलेश पंडित

४ डिसेंबर २०२०


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा