हा ब्लॉग शोधा

शनिवार, १९ डिसेंबर, २०२०

दलित

 

वसुधैव कुटुंबकम् म्हणून 

अवघी पृथ्वीच परिवार मानणारी,

अहिंसा परमो धर्म:

अर्थात् अहिंसा हाच सर्वश्रेष्ठ धर्म 

अशी धारणा जपणारी, 

सत्यमेव जयते 

हे राष्ट्रीय आदर्श वाक्य 

जिच्यासाठी शिरोधार्य आहे ती, 

वाचिक, मौखिक तपाने 

वैचारिक औदात्त्य 

युगानुयुगे अखंड टिकवणारी 

प्राचीन व्यवस्था 

केवळ परिस्थितीत 

काहीही कधीच 

दीर्घकाल स्थैर्याने वा शाश्वतीने

न उतरल्यामुळे 

पौराणिक प्रतिमांमध्ये 

कोणत्याच वर्णामध्ये 

न गणल्या गेलेल्या 

व आजही बहुतांश 

दारिद्र्यात दबल्या पिचलेल्या 

वर्गाला 

नवयुगातील 

लोकशाहीत 

दुर्लक्षित कशी ठेवेल?


हा तर विवेकशून्यत्वाचा मासलाच


सर्व वंचनांमध्ये सर्वाधिक भेसूर 

आर्थिक असून 

कुणी कधी लिहिलंच तर 

विषमता निर्मूलनाच्या नाटकाचा 

सर्वांत मोठा अंक 

दारिद्र्यनिर्मूलनाचा असेल 

( ... आणि मोजावी लागेल 

कितीतरी अधिक किंमत

कर्तव्यभावनेनं ...)

हे न समजून 

सर्वांगीण उत्थानासाठी 

केवळ आर्थिक निकषाच्या 

उथळ वल्गनांचा 

निरर्थक पोकळ घोष 

करणाऱ्या समाजाच्या  

ह्या पायाभूत तथाकथित संस्कृतीत 

प्रत्येक वर्गातील 

प्रत्येक व्यक्तीचं 

अनन्यसाधारण एकमेवाद्वितीय 

महत्त्व जाणून व मान्य करून 

आजही त्यांना 

दिला जातोच मान 

- न्याय, स्वास्थ्य वा समृद्धीसाठी नाही तरी -

योग्य वेळी 

कोंबडी, बाटली आणि काही फुटकळ नोटांच्या 

मोबदल्यात मिळणाऱ्या मतांसाठी!



- निलेश पंडित 

२० डिसेंबर २०२०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा