जसे मी सोडले सुख सोडतो साऱ्या व्यथाही मी
इथे घेऊन होतो काय आलेलो असाही मी
जपा कवितेतला आशय कवीचे नाव मग विसरा
जरी उरणार नाही मी कधी मरणार नाही मी
विरह सोसून नंतर पाहिले सुख मी तुला कळले
तुझ्या हसण्यात तेव्हा पाहिली का वेदनाही मी?
सुखाची कारणे बघण्यास मी धुंडाळली पृथ्वी
परंतू कारणांमध्ये बघितली यातनाही मी
खरा तो कोण आहे हे मला नसते कधी कळले
कधी नसताच जर चिरफाडला स्वप्नातलाही मी
मला साऱ्या जगाने नेहमी विद्रूपही म्हटले
बरे झाले स्वतःसाठीच जपला आरसाही मी
- निलेश पंडित
३ जानेवारी २०२१
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा