हा ब्लॉग शोधा

गुरुवार, २३ जानेवारी, २०२५

आशय

संकटांचा करत बसतो नवनवा संचय पुन्हा

त्यात लिहिण्याला गवसतो आगळा आशय पुन्हा 


काळ सरतो जसजसा मीही तसा निर्ढावतो

काळही होतो नव्याने क्रूर अन् निर्दय पुन्हा


भरजरी असतो कधी हिणकस निपजतो क्षण कधी

रोज काळाचाच होतो नेहमी अपव्यय पुन्हा


हारतो लढतो तसा तो संपतो अंधारता

दिवस पुढचा उगवताना रुजवतो निश्चय पुन्हा 


जिंकण्यासाठी पुन्हा मी डाव संपवलास तू

कोणता आता पराजय आणि कुठला जय पुन्हा 


त्याच त्या असती लढाया सुष्टदुष्टांच्या इथे

तेचते कोट्यावधी धृतराष्ट्र अन् संजय पुन्हा 


प्राप्त झाले अर्थ आता निर्भयाला नवनवे

शेवटी होईल का कोणी खरा निर्भय पुन्हा?


- निलेश पंडित 

२४ जानेवारी २०२५

मंगळवार, १४ जानेवारी, २०२५

स्वर्ग

एक छंद फक्त त्यास कुशल ज्यात खास तो

एरवी रिकामटेकडा उदास भासतो


तो निघे जिथून पोचतो तिथेच शेवटी

दूर वाटतो प्रवास मात्र आसपास तो


क्षेत्र आपलेच थोर विश्व वाटते खरे

चिखल उथळ मात्र दिव्य स्वर्ग बेडकास तो


मिरवितो यशास आपल्या जुन्याच नेहमी

काम काय त्यापुढे विचारताच त्रासतो


कंठ फुटतसे समोर चार लोक ऐकता

शांततेत मात्र म्लान चेहरा भकास तो


पाहती दुरून लोक आणि दूर राहती

जाणती नजीक सर्व कार्यभाग नासतो


शेवटी कृती हरेक फक्त एक विकृती

मानतो विकास जो ठरे अखेर ऱ्हास तो


- निलेश पंडित 

१५ जानेवारी २०२५

शुक्रवार, १० जानेवारी, २०२५

तान

 

संयमाने वाढला सन्मानही

अन् जगाचे येत गेले भानही


तेवणारी ज्योत होतो फक्त मी

मात्र पेटवले अचानक रानही


फक्त जुळले सूर आधी नेमके

खुलत आपोआप गेली तानही


मी मरातब आणि वलये विसरलो

आपसुक मग विसरलो अपमानही


सर्व मोफत रोज वाया जातसे

का कुणी येथे करावे दानही!


शांत रात्री भुंकला तो एकटा

लाळ सुकता संपले अवसानही


न्यून हे तो दोष त्याचा समजतो

हास्य साधे समजतो अवमानही


परतले ते एकटे आले तसे

मग समर्थांचे परतले श्वानही


- निलेश पंडित 

११ जानेवारी २०२५

सोमवार, ३० डिसेंबर, २०२४

सोंगट्या

 (वृत्तः स्त्रग्धरा)


स्थाने चौसष्ट येथे अवघड रचना गूढ  साऱ्याच वाटा

युद्धा-व्यूहात जेथे अगणित घटना, योजनांचा झपाटा

… चातुर्याची कसोटी, झगडत जगणे, धोरणांची परीक्षा 

आव्हाने जीवघेणी, अवतरत पुढे, संकटांचा सपाटा


प्यादी सारी निराळी धडपडत इथे खेळती खेळ सारा

एका खेळीत कोणी पट उधळतसे व्यर्थ होई पसारा

… धीराने संथ कोणा अवचित मिळते सार दुर्मीळ काही

जीवाला क्षीण येथे क्षणिक न गवसे सूक्ष्मसाही निवारा


अर्ध्या निद्रेत कोणी तगमगत उठे अल्पशा व्यग्रतेने

कोणी जागून काढे सहज हसतही काळरात्री सुखाने

… टोकांची दोन रूपे अपरिमित अशी उष्णशीतापरी जी

साचा ज्या त्या मनाचा नकळत घडतो जो कसा तोच जाणे


गुंतागुंतीतही ह्या नियमित ठरते सोंगटी धावणारी 

त्या साऱ्या सोंगट्यांना श्रमवित असते मोजक्यांची हुशारी


- निलेश पंडित
३१ डिसेंबर २०२४

रविवार, २२ डिसेंबर, २०२४

ताळमेळ


चाचपतो कसाबसा 

भीत कोनाडा कोपरा

किड्यामुंगीचा मी दंश

होता सोसतो घाबरा


प्रयासाने शोधतो मी

इथे तिथे चोहीकडे 

अंधारात कवडसा

त्यास घालतो साकडे


गवसून कवडसा

होता त्याचीच तिरिप

सूर्य बाहेर तळपे

आत होई उघडीप 


मग उघडती दारे

आणि कवाडे सारीच

दिसे प्रकाश सर्वत्र

पुन्हा भांबावतो मीच


सूर्यप्रकाशात येता

डोळ्यांसमोर अंधारी

अंधाराच्याच दिशेने

परततो मी माघारी 


कुठे सुरुवात होते

कुठे संपावा हा खेळ

ह्याचादेखील संतत

बदलतो ताळमेळ 


- निलेश पंडित 

२२ डिसेंबर २०२४




शनिवार, १४ डिसेंबर, २०२४

कौल


कुणी शब्दात सांगावे कशाला अन् कसे काही?

मनोमन भावनांची कास जर सोडायची नाही?


कधी मी हासतो वा राहतो केवळ तुझे ऐकत

तुझ्याशी वाद नसल्याचा तुझा का वाद, त्रागाही?


बदललो आजही नाही पटो वा ना पटो ओळख

विसरली फक्त तू आहेस काही आणि जागाही


पुन्हा भेटू कधीकाळी नव्याने ओळखी देऊ

तुझ्या माझ्याच वाटांनी पुन्हा शोधू दिशा दाही


अचानक थांबलो अर्ध्याच रस्त्यावर कुठे नकळत?

ठरवता आपले आपण अशी अस्वस्थता का ही?


यशामागे सदोदित धावलो आपण शरीराने

जरासा कौल वाटे आज घ्यावासा मनाचाही



- निलेश पंडित 

१५ डिसेंबर २०२४