हा ब्लॉग शोधा

अक्षरगणवृत्ते लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
अक्षरगणवृत्ते लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, ७ नोव्हेंबर, २०२५

पारंगत

 

अनिच्छा चेहऱ्याला ग्रासण्याआधीच ओसरते

जरी प्रत्येक टप्प्यावर नव्याने वेदना वसते

… तिच्या रात्रीत रुजती यातना दिवसा ठणकती ज्या

पुढे त्या वाढण्यासाठी नवी तारीख अवतरते


जिवाची होत असते रुक्ष शब्दांनी जरी लाही

दिलाशाचा नसे लवलेशही … रात्री व दिवसाही

… विषारी डंख शब्दांचा तसा स्पर्शातही लपतो

सहन करण्यात पारंगत तिला तो जाणवत नाही 


तिच्या ह्या घोर दिव्यातून ती काहीतरी लिहिते

जसे लिहिते तसे त्यातून मोहक स्वप्न अवतरते

… कधी ते अल्पजीवी तर कधी उत्तुंग अजरामर 

अशा स्वप्नांमधे विसरून जगणे रोज ती जगते


कधी स्वप्नात भुरभुरते सुगंधी रेशमी जावळ

स्मृतीतिल आपल्याशा माणसांची भोवती वर्दळ

… जरा येताच भानावर कधी ते स्वप्न हे कळते

असा जाईल हाही काळ ही ती बांधते अटकळ


चिरंतन स्वप्न ठरते यातनेवर नेमके औषध

असावे वास्तवापासून थोडे दूर बेसावध

… सरावा काळ आनंदात खोट्या मात्र मौजेने

पुढे येतोच अवचित आपली करण्यास तो पारध



- निलेश पंडित 

८ नोव्हेंबर २०२५


बुधवार, २७ ऑगस्ट, २०२५

सत्य

 

दोन पेशी एक होता जन्मते काही खरोखर 

आणि बाकी कल्पना प्रत्येक जी विरतेच नंतर 

… कल्पनांचे कल्पनांवर नेहमी बांधून इमले

माणसांचे फुलत जाते विश्व मायावी निरंतर


त्यातही प्रत्येक टप्प्यावर निपजते अजब काही

वेदनामय रात्र नंतर एक आशेची उषाही

… स्वप्न पडते स्वप्न फुलते संपते कालांतराने

मात्र उरतो अश्म एखादा व त्यावरचा ठसाही


त्या ठशासाठीच होतो जन्म काही पाकळ्यांचा

जन्म सरतो गंध दरवळण्यात सुकणाऱ्या फुलांचा

… सर्व होती नामशेषच पाकळ्या त्या अन् फुलेही

अंत होतो मागही उरल्याविना अगणित ठशांचा


… एक उरणाराच देतो स्वप्न पुरते जन्मभर जे

स्वप्न ते ती कल्पना आजन्म ठरते सत्य माझे



- निलेश पंडित 

२७ ॲागस्ट २०२५















सोमवार, ३० डिसेंबर, २०२४

सोंगट्या

 (वृत्तः स्त्रग्धरा)


स्थाने चौसष्ट येथे अवघड रचना गूढ  साऱ्याच वाटा

युद्धा-व्यूहात जेथे अगणित घटना, योजनांचा झपाटा

… चातुर्याची कसोटी, झगडत जगणे, धोरणांची परीक्षा 

आव्हाने जीवघेणी, अवतरत पुढे, संकटांचा सपाटा


प्यादी सारी निराळी धडपडत इथे खेळती खेळ सारा

एका खेळीत कोणी पट उधळतसे व्यर्थ होई पसारा

… धीराने संथ कोणा अवचित मिळते सार दुर्मीळ काही

जीवाला क्षीण येथे क्षणिक न गवसे सूक्ष्मसाही निवारा


अर्ध्या निद्रेत कोणी तगमगत उठे अल्पशा व्यग्रतेने

कोणी जागून काढे सहज हसतही काळरात्री सुखाने

… टोकांची दोन रूपे अपरिमित अशी उष्णशीतापरी जी

साचा ज्या त्या मनाचा नकळत घडतो जो कसा तोच जाणे


गुंतागुंतीतही ह्या नियमित ठरते सोंगटी धावणारी 

त्या साऱ्या सोंगट्यांना श्रमवित असते मोजक्यांची हुशारी


- निलेश पंडित
३१ डिसेंबर २०२४

शनिवार, १५ जुलै, २०२३

परिपूर्ती

 (वृत्तः वसंततिलका)

उत्स्फूर्त वर्तन कुणी लिलयाच केले

मौनात केवळ कुणी रममाण झाले

... कोणी सदैव रमले सृजनात त्यांच्या

सारेच मात्र झिजले, विलयास गेले


भासे जरी बदलले सगळे जगी या

भूमीत नित्य लपला अविभाज्य पाया

… बाह्यांग निर्मळ दिसे ह्रदयात गुंता

निर्माण होत फुलता विरतात काया


संदिग्ध धूसर दिशा घनदाट झाडी

कोडीच हे न कळता उरतात कोडी

… त्यातूनही निपजतेच अतूट इच्छा

आजन्म घाट चढता … पथ नागमोडी


आहेत मात्र पदरी अनमोल काही

भाषा व कल्पकतेसम साधनेही

… योजून यत्न करता प्रगती युगांची

साधून अंत - गवसे परिपूर्णताही



- निलेश पंडित

१६ जुलै २०२३

शनिवार, ६ मार्च, २०२१

सर्वार्थ

 


सांभाळताना स्वतःला, मनाला अहंता जरा झाकतो मी जरी

जाणीव माझी मला बोचते, यातना मीपणाची सले अंतरी

... कौशल्य लावून सारे पणाला छुप्या भावना आत मी पोसतो

घेऊन शंका, कुशंका, व्यथा फक्त भीती उरी पाळतो बोचरी


संपर्क होतो जिथे ज्या कशाशी तिथे ज्ञात अज्ञात दोन्ही वसे

आपापला माणसे राखती बंद कप्पा कदापी न कोणा दिसे

... दु:खी जिवा भासवी जो कुणी स्नेह अन् दु:ख तोही नसे सोबती

बाहेर जो चेहरा हासरा त्याचखाली कटूता विषारी असे


माझ्यासवे खेळ चाले जगाचा जगाशी असे नित्य माझा तसा

कोणीच कोणा न सांगू शके कोण कोणास जाणे किती अन् कसा

... राखून थोडा प्रदर्शून थोडा अविश्वास विश्वास दोन्ही इथे

सारेच चोखाळण्याचा जणू मार्ग आपापला घेत जाती वसा


दोघांकडे मात्र अाहे असा प्रांतही गूढ अज्ञात सर्वांस तो

संशोधिता त्यातला अंशही जन्मण्यातील सर्वार्थ साकारतो



- निलेश पंडित

७ मार्च २०२१


शुक्रवार, ३ जानेवारी, २०२०

भक्त


जशी लेखणी थांबुनी सुस्त होई
जशी शुष्क होई तिच्यातील शाई
... पशूता तशी मुक्त फोफावते अन्
समाजास ग्रासे छुपी रोगराई

शिगोशीग वाढे उरी दंभ जेव्हा
सुखे बोलते सर्व खोटेच जिव्हा
... जरी दर्शनी भास मोठ्या मनाचा
कृतीतून खेळे शकूनीच तेव्हा

जशी क्षीण होते जराग्रस्त काया
शरीरास आच्छादते मृत्युछाया
... तरीही न लाभे जिवाला विसावा
उराशी उरे बेगडी मोहमाया

असे सर्व ठाऊक अंतर्मनाला
मनाला तरी मोहवी स्वप्नमाला


- निलेश पंडित
४ जानेवारी २०२०

शनिवार, २२ जून, २०१९

गुणाकार

(वृत्त: भुजंगप्रयात)

करे वार कोणी कुणी ठार होतो
कुणा वेगळ्याचाच सत्कार होतो

मिळे दु:ख सीता नि मंदोदरीला
शिळेचा अकस्मात उद्धार होतो

इथे चांगले होतसे बेरजेने
गुन्ह्यांचा गुन्ह्यांशी गुणाकार होतो

पिकावा हशा बोलता मूर्ख कोणी
बुवा बोलता ते चमत्कार होतो

करे वल्गना तो ठरे गर्जना ती
शहाणा कुणी मात्र गद्दार होतो

मना दुर्जनांचीच पूजा करावी
खऱ्या सज्जनाचा गुन्हेगार होतो

इथे सूर्य निस्तेज होऊन गेले
उजाडायच्या आत अंधार होतो


- निलेश पंडित
२३ जून २०१९

गुरुवार, ७ जून, २०१८

धुरळा

(वृत्त:  शिखरिणी)

धरेला तेजाने नित सजविती सूर्यकिरणे
अनादी उर्जेची अपरिमितशी दिव्य सुमने
... कधी अस्तित्वाने सुफल करती जेथ पडती
अभावाने केव्हा प्रसवित तमा ग्रासत मने

विषारी वल्लींची अविरत प्रजा भूवर फळे
विखाराच्या पोटी खल कृपणताही खळबळे
... दुराचाराचाही अनुभव दडे सर्व जगती
मनादेहासंगे कुरुप पशुता, क्रौर्य उसळे

कुणा पुण्यात्म्याचे स्मरण करता विश्व समजे
सदाचारायोगे नकळत जगी मोल उमजे
... समाधी वाटावे सहज अवघे जीवन जणू
अशी कर्तृत्वाची परम प्रतिमा त्यात निपजे

असामान्यत्वाचे सकल नमुने मात्र विरळा
प्रकाशाची माया वरवर वसे आत धुरळा


- निलेश पंडित
७ जून २०१८

रविवार, १३ मे, २०१८

आरसा

(वृत्त: शार्दूल विक्रीडित)

हा रस्ता कसला कुणास न कळे कोठून जातो कुठे
जो तो हाच सदैव मार्ग क्रमतो सारे तरी एकटे
चिंचोळा असतो कधी मग पुढे विस्तीर्ण होई पुन्हा
केव्हा केवळ खेळवी तिमिर वा घेतो उराशी उन्हा

झाडी गर्द सभोवती दिसतसे किंवा दुतर्फा घरे
केव्हा केवळ माळरान भवती वारे जिथे बोचरे
एखादी खिडकी क्षणात उघडे वा नेमके दारही
काही मात्र सदैव बंद असती येती न दृष्टीतही

व्यक्ती खास कुणी अतीव विरळा जेव्हा कधी भेटते
स्वप्नांची किमया अनंत टिकते आशा खुळी लागते
सारे आप्त नि सर्व लोक परके येथे जरी लाभती
कोणी त्यांत न सावलीस अथवा साथीसही राहती

मी पासूनच मार्ग हा घडतसे तेथेच होतो पुरा
माझा मीच प्रवास फक्त बघणे हा आरसाही बरा

- निलेश पंडित
१३ मे २०१८

गुरुवार, ११ जानेवारी, २०१८

विद्ध


(वृत्त: इंद्रवज्रा)

माझ्या मनाचे कसदार धागे
गुंफून होता मजबूत जाळे
जाळ्यामधे त्या जखडून दु:खे
मांडेन न्यूनांवर ठोकताळे

ज्या ज्या उणीवा दिसतात माझ्या
होतील जागा सुखसाधनेच्या
आयुष्य माझे विरले तरीही
देईल गाथा चिरवेदनेच्या

निक्षून दावील परंतु रूपे
आनंददायी सहवेदनेची
सौख्यात दु:खे मिसळून जाता
रात्रीच नांदी मिळते उषेची

माझ्या नशीबी असतील शून्ये
देईन जोडीस सुयोग्य अंक
बांधून शेला जखमेस माझ्या
नक्षीत माझे जिरवीन डंख

आहे न काही नसतेच काही
निर्भेळ संपूर्ण सदैव शुद्ध
पंखास झाल्या जखमा तरीही
आकाश पाहीन असून विद्ध


- निलेश पंडित
१२ जानेवारी २०१८

शुक्रवार, ७ जुलै, २०१७

सीमा

(वृत्त: शार्दूल विक्रीडित)

आशंका ह्रदयात गूढ वसती ज्या शक्य ना सांगणे
चिंता नित्य मनास ग्रासत असे आजन्म जी पोसणे
भीती क्रोध विकार सुप्त करिती वस्ती तळाशी मनी
ऐसे अस्थिर क्षुद्र चंचल जिणे मी रोज चोखाळणे

केव्हा दूर अथांग दिव्य दिसते जादू नभाची निळी
देहातून प्रसन्न चित्त उसळी घेते कधी आगळी
एखादा सुमधूर सूर भिडता लागे समाधी जणू
एखादी भुलवे अचानक खळी रेखीवशी कोवळी

विश्वातील समग्र ज्ञान असुनी ते ज्ञान भासे फिके
जेथे सूर्यप्रकाश बाष्प वसती तेथे दिसावे धुके
अभ्यासू इतिहास चोख सगळा सूक्ष्मातिसूक्ष्मातला
काळाच्या उदरात काय वसते हे कोण जाणू शके

शब्दांचे अधिराज्य सीमित ठरे नि:शब्दता जागते
त्या सीमेवर दीर्घकाळ कविता माझी मुरू लागते


- निलेश पंडित
७ जुलै २०१७

बुधवार, ३० नोव्हेंबर, २०१६

औषध

वृत्त: मनमोहिनी

विचारात एखाद्या मिळावे असे काही
जिथे शब्द संपावे नुरावी नि भाषाही
... तरी चक्र चालावे रसांचे व भावांचे
कवीची अहंता ना उरो औषधालाही

खुल्या स्वच्छ श्वासाने नभाचा वसा घ्यावा
निळाईत विश्वाच्या उभा देह दाटावा
... सुरांच्या मुळाशी जी असे शुद्ध ती शांती
शरीरात साचावी ... नवा जन्म भासावा

कवी मी असा राही प्रयासात मायावी
उरी घेउनी स्वप्ने कधी जी न संपावी
.... जरी जागतो येथे अनंती असे डेरा
जणू सुज्ञ कोणाही समाधीच वाटावी

जरा थांबता गाडी ... भिकारी कुणी येतो
अहंता टळेना ती मला नेमकी देतो


- निलेश पंडित
३० नोव्हेंबर २०१६

रविवार, २८ ऑगस्ट, २०१६

तपस्या

(वृत्त: स्रग्विणी)

शोभते का तुला हे असे वागणे?
मूक होकार अन् दूरही राहणे

जाणतो मी जुना सूक्ष्म कावा तुझा
मी तुला पाहता पाहणे टाळणे

त्रस्त मी अल्पसंतुष्ट तू नेहमी
सज्ज देण्यास मी तू न ते मागणे

वेदना सारख्या पद्धती वेगळ्या
स्वप्न मी पाहणे रात्र तू जागणे

सभ्यता पाळुनी आत अस्वस्थ तू
का अशी देत जातेस तू कारणे?

शक्य होते कशी ही तपस्या तुला
अल्पसे भोगता खूपसे त्यागणे

- निलेश पंडित
२८ आॅगस्ट २०१६

बुधवार, ८ जून, २०१६

अटळ

(वृत्त: पृथ्वी)

अतर्क्य मन की अनंत दुनिया मला ना कळे
प्रवास अवघा क्षणात बदले दिशा सारखी
जशी विहरते समीप प्रतिभा तशी भासते
पळात नवख्या अचानक जणू मला पारखी

क्षणात खिजवी क्षणात खुलवी मला विश्व जे
तयात दडुनी अखेर निपजे नवी कल्पना
तमास ढवळूनि गूज गवसे प्रकाशातले
सुखान्त घडता तशी सुखविते कधी वेदना

यथेच्छ सगळे जरी मिळवले उरे अल्पसे
भरीव जगती दिसे चहुकडे अशी पोकळी
अशात सलता मनास खुपता व्यथा नेमकी
तिच्यात रुजुनी अथांग कविता खुले मोकळी

परी समजते इथे थबकणे टळे ना मुळी
स्वये अनुभवे तयाच मिळते दिशा आगळी

- निलेश पंडित
८ जून २०१६

शुक्रवार, ४ डिसेंबर, २०१५

अट

(वृत्त: उपेंद्रवज्रा)

जबाबदारी अधिकार ह्यांचे
उदासवाणे विपरीत कोडे
सदैव राही मखरात कोणी
कुणी जगावे झिजवीत जोडे

ददात नाही कसलीच ज्यांना
प्रतोद त्यांचा स्वजनांस जाचे
जिवास त्यांच्या जपतात जे जे
खलास होते जगणेच त्यांचे

मुखात त्यांच्या रुजतात स्वप्ने
समाज ज्यांना वलयात राखे
अतर्क्य भारी परमेश भोळा
अशक्त भक्तां नरकात टाके

अतीव सोपी अट एवढीशी
समानतेचा बुरखा असावा
जपून साऱ्या बहुमोल श्रद्धा
हरेक भोळा भजनी वसावा


- निलेश पंडित
५ डिसेंबर २०१५

रविवार, २२ नोव्हेंबर, २०१५

तमलांच्छन

(Acquainted with the night ह्या Robert Frost च्या कवितेचा स्वैर भावानुवाद)

(वृत्त: भुजंगप्रयात)

मला ज्ञात आहे अशी रात्र काळी
जिथे फक्त दाटे तमाचा दरारा
असे ज्यात मारा सदा पावसाचा
त्वचेला भिडे बोचरा गार वारा

मला दावितो वाकुल्या रुक्ष रस्ता
प्रकाशातला प्रांत संपून जेथे
कुणी गस्त घालीत येता समोरी
उदासीन मी टाळतो त्यास तेथे

जरी क्रंदते दूर कोणी भयाने
इथे भेकडासारखे मी लपावे
भयाकूल होऊन मीही स्वताशी
खुज्या शांततेला उराशी जपावे

परी सुप्त घंटाध्वनी सांगताहे
मनाच्या मुळाशीच ही रात्र आहे


- निलेश पंडित
२३ नोव्हेंबर २०१५

मूळ कविता

I have been one acquainted with the night.
I have walked out in rainand back in rain.
I have outwalked the furthest city light.

I have looked down the saddest city lane.
I have passed by the watchman on his beat
And dropped my eyes, unwilling to explain.

I have stood still and stopped the sound of feet
When far away an interrupted cry
Came over houses from another street,

But not to call me back or say good-bye;
And further still at an unearthly height,
One luminary clock against the sky

Proclaimed the time was neither wrong nor right. 
I have been one acquainted with the night.
 
- Robert Frost (1928)

शुक्रवार, १६ ऑक्टोबर, २०१५

वंद्य


(वृत्त: भुजंगप्रयात)

उन्हे लुप्त झाली तशी सांज आली
पहा सूर्य अस्ताचला चालताहे
नभाच्या कडा स्वर्णरंगी परंतू
पुन्हा कृष्णछाया पुढे येत आहे

त्वरे राज्य प्रस्थापिते शांतता अन्
मनी दाटते गूढता गोठणारी
दिवे चार भिंतींमधे तेवताना
तमाच्या पखाली जगी ओतणारी

कुठे दीपमाला कुठे रोषणाई
कुठे दु:ख दाटून राहे सभोती
परी दु:ख जेथे तिथे एकट्याशा
सुखाने भल्या तेवती वंद्य ज्योती

अशा दिव्य ज्योतीच आधार देती
तमातून विश्वा उजेडात नेती


- निलेश पंडित
१४ ऑक्टोबर २०१५


(एका काव्यप्रेमी समूहात अनुकरणावर आधारीत खेळात भारती बिर्जे डिग्गीकर ह्या निष्णात कवयित्रीच्या शैलीचं अनुकरण करण्याच्या प्रयत्नातून लिहिली गेलेली कविता.)

शुक्रवार, १८ सप्टेंबर, २०१५

सामान्य

(वृत्त: श्रवणाभरण)

सहज सुखात रमे मन जे फुलते झुलते निमिषात कधी
तळमळते मन तेच जळे सलते खचते पुढच्याच पदी
अजब कशी दुनिया बदले क्षण दोन क्षणातच भिन्न दिसे
सतत अकल्पित विश्व अचानक लावितसे मज गूढ पिसे

तडफड दंगल हिंसकता अथवा दिसताच कुठे कटुता
गडबडते मन बावरते मति कुंठित दानवता बघता
ठसठसत्या दुविधा जखमा फुलतात किती शमतात किती
अगतिक जीव इथे जगती झिजती पिचती तगती मरती

अनुपम रम्य प्रकाश जिथे दिसतो तिकडे तमही वसतो
नकळत द्वंद्व कळून स्विकारुन मीच जरा मग सावरतो
अवचित जाण मनी हलके हलकेच जणू झरते गमते
बळ जगण्यास पुन्हा पहिलेच हळूच मनोमन पाझरते

अनुभव मात्र असा मिळता ह्रदयात कधी कळ का नसते?
अतिशय मध्यमवर्गिय मी मज निव्वळ काव्यच का स्फुरते?


- निलेश पंडित
१३ सप्टेंबर २०१५

सोमवार, ३१ ऑगस्ट, २०१५

बहुजन


(वृत्त: मालिनी)

"तरतम असण्याची भावना योग्य नाही
सधन गरिब ऐसा ना उरे भेद काही
धडपड करण्याचे सूत्र ध्यानी असावे
उठपळ श्रमण्याला रोज प्राधान्य द्यावे

तगत जगत जावे हीच मात्रा सुखाची
पडत घडत जाणे ह्यात किल्ली यशाची
बहुविध किति सारी संकटे येत जाता
सकस बनत जावी नित्य आयुष्यगाथा"

सहज हसत स्वामी बोध देती जगाला
अगणित मग लाभे देणगी आश्रमाला
अविरत भजणारे सर्व श्रीमंत भक्त
सतत सकल त्यांचा वाढतो भक्तिपंथ

बहुजन श्रमिकांचा वर्ग थोडा निराळा
झिजत पिचत पोसे बुद्धिजीवी जगाला

- निलेश पंडित
३० आॅगस्ट २०१५

शुक्रवार, ३१ जुलै, २०१५

मित्र

(वृत्त: सुमंदारमाला)

जगावे असे मी जगावे तसे मी असे बेत जो आखतो नेहमी
खरा कोण तो नेमका हे कळेना दुजा ना तरी तो नसे पूर्ण मी
पहाटे पहाटेस मांगल्य पावित्र्य तोडीतले ऐकतो मी जसा
तसा सांजवेळी मला शांतवी ग्रासुनी मारवा धीरगंभीरसा

प्रकाशात घेता जरा मोकळा श्वास बंदिस्त काही सले आतले
सुखे पाहता याचि देही नि डोळा त्वरे डाचते गूढ स्वप्नातले
मनाच्या तळाशी समाधिस्थ कोणी मला राखताना मला जाचतो
पुढे जात राही जसा मोह माझा तसा नित्य मागे तया खेचतो

सदा सोसणे हेलकावे जिवाला असे भाग्य माझ्या कपाळी जरी
मला तोच बांधून ठेवी कधी अन् कधी सोडतो मुक्त वाऱ्यापरी
असे स्वप्न हा एक सत्यांश तैशी अपूर्णातही लाभते पूर्णता
जया जाणतो ना अणूमात्रही मी असा मित्र माझ्या मनी नांदता


- निलेश पंडित
१ ऑगस्ट २०१५