हा ब्लॉग शोधा

आयुष्य लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
आयुष्य लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, ४ एप्रिल, २०२६

निश्चिंत


बघताना वळून आज अचानक मागे

वाटल्या त्यास सारख्याच साऱ्या वाटा

पायवाट साधी तसेच हमरस्ते अन्

धोपटमार्गावर झिजण्यातील झपाटा


हातात गवसले तसे निसटले तेही

स्वप्नात पाहिले मात्र न हाती आले

मिळवून झिजवता मोल संपले ज्याचे

अन् झिजूनही जे पुन्हापुन्हा लखलखले


तो सुखावला चेहरे विरळ होताना

व्यवहारासाठी झुकणारे हसणारे

एकांत बरा त्याहून वाटला नकळत

अन् क्षणार्धात आयुष्य बदलले सारे


निश्चिंत मनोमन जसा होत गेला तो

हरपता भान ओठांवर हास्य तरळले

उतरती कळा लागली संथ श्वासांना

मोजके फक्त जे आता होते उरले


- निलेश पंडित 

५ एप्रिल २०२६



शनिवार, २१ जून, २०२५

दुहेरी

 (वृत्तः भूपतिवैभव)

समजलो ज्यास मी महाल बळकट माझा 

ते केवळ होते नाजुक छोटे घरटे

आगळा मानले कल्पवृक्ष मी ज्याला

तो झुडूप होता एक रानटी खुरटे


मिळताच मला संकेत राजमार्गाचे

मी माझे त्याच दिशेला पाय वळवले

अज्ञात नागमोडी वाटेवरती त्या

वळणा-चकव्यांनी हातोहात फसवले


गेले फुंकत आयुष्य शंख युद्धाचे

मी ऐकत गेलो क्षणोक्षणी रणभेरी

चलबिचल मनाची सदैव लपवित गेलो

भीती-ईर्षेचे व्रत घेऊन दुहेरी 


रेशीमस्पर्श हातास तुझ्या हाताचा

होताच वाटते घरटे महाल सुंदर

पायवाट ठरते राजमार्ग लढण्याचा

अन् ईर्षा करते कुरघोडी भीतीवर



- निलेश पंडित

२२ जून २०२५


शुक्रवार, ६ जून, २०२५

चौकट

 (वृत्तः लवंगलता)


तहान काही घोटांची तर खोल डोह पाण्याचा

का मारावा सूर कशाला ध्यास खोल जाण्याचा?


तरंगात वरवरती प्रतिबिंबे परिचितशी दिसता

काठावर सहवास आपला त्या प्रतिबिंबांपुरता


ओंगळ जलचर गाळ तळाशी असोतही असलेले

आपण पाहू काठावरती फूल फक्त फुललेले 


जसा डोह बाहेर तसा वसतसे आतही एक

तुला मला ठाऊक त्यातही जलचर गूढ अनेक


आपलाच आपल्यात गहिरा अनोळखी पण तोही

कधी शांत निर्मोही सुखकर कधी भयंकर द्रोही


ह्या डोहाचे त्या डोहाशी नाते हवे कशाला?

स्पष्ट सपाटीवर घावांचा का आगंतुक घाला?


असे डोह अन् गाळ असा हे असेच सगळे असते

जपायचे अन् असेच फुलवायचे आगळे नाते


… स्वीकारत हे हात घेत हातात असे बघताना

क्षण येती अद्वितीय काही चौकटीत जगताना


क्षणभर मात्र दिसे स्फटिकासम स्वच्छ तळाशी पाणी

अवचित मग नकळतही स्फुरती परिपूर्तीची गाणी


परिपूर्ती नसतेच निरंतर गाळ स्वच्छ पाणीही

नसे शांतता वा कोलाहल अन् नसती गाणीही


- निलेश पंडित 

७ जून २०२५

सोमवार, २४ मार्च, २०२५

उठाठेव


शंकित मनाची   दीर्घ उठाठेव 

हीच एकमेव   नित्य क्रिया 


बाह्य ओढाताण  तशी आंतरिक 

प्रसंगा गणिक   खटाटोप


गोतावळा सारा  पसरे भोवती

त्यात नातीगोती  गदारोळ 


दरी किंवा भिंत  भयाण गवसे

पूल जेथे भासे  आधी मना


गढूळसे पाणी   तृषार्त जीविता

ओंजळ भरता  दिसतसे


सौंदर्याचा ध्यास  अथांग पसारा 

शोध घेणे सारा   वैफल्यात


कोलाहलात ह्या   मंजूळ सुस्वर

पडे कानावर  कोठूनसा


धूळ स्थिर साचे   तळाशी पाण्यात

तहान क्षणात   भागतसे


शुष्क कंठा भासे  अमृताचा स्पर्श 

वैफल्याचे पाश   सैलावती


नवनव्या वाटा   दऱ्यांत दिसती

कवाडे लाभती  भिंतींमध्ये



- निलेश पंडित 

२५ मार्च २०२५


शुक्रवार, २१ फेब्रुवारी, २०२५

भुयार


जिथे जाईन तिथे

निरनिराळ्या भिंतीच असतात 

ज्या अडवतात 

अडथळा बनत 

कधी धडकून 

करतात जखमीही

तरीही धडका मारत 

फोडत तोडत कधी

तर कधी शोधत दरवाजे 

खिडक्याही

आपणच काढावेत मार्ग आपले

दालनं बदलण्याचे

शोधण्याचे 

मोकळी हवा

किंवा कधीकाळी गरज भासलीच

तर फक्त जीव वाचवण्यासाठी 

निवारा


ह्या मौलिक सामाजिक पारंपरिक

अटळ दृढ

शिकवणीतून केलेल्या संघर्षात 

थकून दोन क्षण बसलो

डोळे मिटले आणि ऐकला आवाज

स्वतःच्या श्वासांचा

अजमावली शक्ती

तसंच मर्यादा 

स्वतःच्या शरीराची 

आणि न्याहाळला भवताल 


तेव्हा जाणवला

टणक जमिनीखालील

भुसभुशीत गाभा

थोडंसं वाहतं पाणी 

लुकलुकती शक्यता

भुयारं खणण्याची

जी जाऊन भिडावीत

इतर भुयारांना

तशीच इतरत्र 

कुणी खणली असल्यास 


- निलेश पंडित

२२ फेब्रुवारी २०२५


सोमवार, ३० डिसेंबर, २०२४

सोंगट्या

 (वृत्तः स्त्रग्धरा)


स्थाने चौसष्ट येथे अवघड रचना गूढ  साऱ्याच वाटा

युद्धा-व्यूहात जेथे अगणित घटना, योजनांचा झपाटा

… चातुर्याची कसोटी, झगडत जगणे, धोरणांची परीक्षा 

आव्हाने जीवघेणी, अवतरत पुढे, संकटांचा सपाटा


प्यादी सारी निराळी धडपडत इथे खेळती खेळ सारा

एका खेळीत कोणी पट उधळतसे व्यर्थ होई पसारा

… धीराने संथ कोणा अवचित मिळते सार दुर्मीळ काही

जीवाला क्षीण येथे क्षणिक न गवसे सूक्ष्मसाही निवारा


अर्ध्या निद्रेत कोणी तगमगत उठे अल्पशा व्यग्रतेने

कोणी जागून काढे सहज हसतही काळरात्री सुखाने

… टोकांची दोन रूपे अपरिमित अशी उष्णशीतापरी जी

साचा ज्या त्या मनाचा नकळत घडतो जो कसा तोच जाणे


गुंतागुंतीतही ह्या नियमित ठरते सोंगटी धावणारी 

त्या साऱ्या सोंगट्यांना श्रमवित असते मोजक्यांची हुशारी


- निलेश पंडित
३१ डिसेंबर २०२४

रविवार, २२ डिसेंबर, २०२४

ताळमेळ


चाचपतो कसाबसा 

भीत कोनाडा कोपरा

किड्यामुंगीचा मी दंश

होता सोसतो घाबरा


प्रयासाने शोधतो मी

इथे तिथे चोहीकडे 

अंधारात कवडसा

त्यास घालतो साकडे


गवसून कवडसा

होता त्याचीच तिरिप

सूर्य बाहेर तळपे

आत होई उघडीप 


मग उघडती दारे

आणि कवाडे सारीच

दिसे प्रकाश सर्वत्र

पुन्हा भांबावतो मीच


सूर्यप्रकाशात येता

डोळ्यांसमोर अंधारी

अंधाराच्याच दिशेने

परततो मी माघारी 


कुठे सुरुवात होते

कुठे संपावा हा खेळ

ह्याचादेखील संतत

बदलतो ताळमेळ 


- निलेश पंडित 

२२ डिसेंबर २०२४




शनिवार, १४ डिसेंबर, २०२४

कौल


कुणी शब्दात सांगावे कशाला अन् कसे काही?

मनोमन भावनांची कास जर सोडायची नाही?


कधी मी हासतो वा राहतो केवळ तुझे ऐकत

तुझ्याशी वाद नसल्याचा तुझा का वाद, त्रागाही?


बदललो आजही नाही पटो वा ना पटो ओळख

विसरली फक्त तू आहेस काही आणि जागाही


पुन्हा भेटू कधीकाळी नव्याने ओळखी देऊ

तुझ्या माझ्याच वाटांनी पुन्हा शोधू दिशा दाही


अचानक थांबलो अर्ध्याच रस्त्यावर कुठे नकळत?

ठरवता आपले आपण अशी अस्वस्थता का ही?


यशामागे सदोदित धावलो आपण शरीराने

जरासा कौल वाटे आज घ्यावासा मनाचाही



- निलेश पंडित 

१५ डिसेंबर २०२४

सोमवार, ३० सप्टेंबर, २०२४

दुही

 


जसा मी एकटा असतो तसा त्यांच्यातही असतो

सदोदित कोणत्या ना कोणत्या कळपात आढळतो


मला अभिमान ज्याचा ते जगाला सांगतो सारे

खजिल व्हावे शरम वाटून तेथे वेड पांघरतो


मिसळतो नेहमी आवाज मीही घोषणांमध्ये

तरी स्पर्धेत माझे वेगळेपण चोख मी जपतो


मला जो वाटतो नेता मिळे त्यालाच बांधिलकी

धुळीला तो कधी मिळताच मी दुसऱ्याकडे वळतो


जसा गर्दीत मी असतो तशी डोक्यात माझ्या ती

मला ती फक्त वापरता तिला मी फक्त वापरतो


दुही अज्ञात आहे आत माझ्या खोल लपलेली

कधी माझ्यात मी वसतो कधी कळपात मी वसतो



- निलेश पंडित

१ अॅाक्टोबर २०२४

शुक्रवार, ६ सप्टेंबर, २०२४

लाटा

 

हे असेच असते प्रवाहात वाहून जायचे नसते

वाहून लुप्त होण्याआधीही मुक्त व्हायचे असते

… भिववितो जसा भवताल तसा नेहमीच मोहवितोही

त्या सवे न जाता केवळ तो पाहून जायचे असते

(हे असेच …)


जायचे न माहित कुठे कधी वेगात किती कोणाला

क्षण वर्तमान जगतानाही ह्रदयी स्वप्नांची माला

… आशा स्फुरते घुसमट होते ह्या लाटा अटळच माथी

लाटेत तरंगत … कधी कधी पोहून जायचे असते

(हे असेच …)


प्रत्येक लाट संपते मात्र पदरात टाकते काही

जन्मणेच घडते पुन्हा पुन्हा मिळतात नव्या कक्षाही

… अश्रूंनी ओथंबित हास्याचे अद्भुत क्षण जगताना

नवनव्या उमलत्या अर्थांवर मोहून जायचे असते

(हे असेच …)


रेघांची रूपे वेगवेगळी रेघा अवतीभवती

कायमी ठळक अवतरती काही काळ्या दगडावरती

… मातीत अल्पजीवी रेघोट्या तशा विजा लखलखत्या

ह्यांमधे न गुरफटता केवळ राहून जायचे असते

(हे असेच …)



- निलेश पंडित

७ सप्टेंबर २०२४






मंगळवार, १६ जुलै, २०२४

किमया

 

सळसळते काही सुरम्य अवतीभवती

बंधन चाकोरीतील खुणावे मागे

मी मुक्त भरारीसाठी आतुरलेला

जखडता मला कसलेसे अतूट धागे


अस्वस्थपणा धडपड त्रासिकता सारी

जाचती ग्रासती शरीर आणि मनाला

थैमान घालती विचार स्वप्ने दोन्ही

शृंखला बने रेशमी मुलायम माला


हा प्रवाहपतितांचा अव्याहत ओघ

मोहून सदोदित वंचितही असण्याचा

आनंदासाठी दुःखाचा मागोवा

हा रिवाज तृप्तीसाठी आसुसण्याचा


माफक स्पर्शाची अन् दृष्टीची किमया

एकाच क्षणी आयुष्य व्यापते माया


- निलेश पंडित

१६ जुलै २०२४

शनिवार, १५ जून, २०२४

आरसे

 

गायली जल्लोषगीते एकजूटीने कधी

भाबड्या कृश चेहऱ्यांवर स्मित झळकले छानसे

पेटल्या होत्या मशाली किर्र काळोखातही

सर्व ते विझले निखारे आणि उरले कोळसे


नेहमीचे बोलणे अन् हासणेही मोजके

भावना, संवेदना अन् शब्द चोख व नेमके

औषधेही शक्तिशाली ठेवणीतच ठेवणे

दीर्घ आयुर्मान पण जगणे न उरले फारसे


ओळखी, जवळीकही जाती तिथे जपतात ही

राहती गर्दीत अन् फोफावती गर्दीत ही

मात्र सारे भ्यायलेले गांजलेले मत्सरी

आपल्या समुहातही एकेकटी ही माणसे


पाहिल्या ज्या पायवाटा गर्द हिरव्या मी कधी

दिसतही नव्हते जिथे शोधूनही तेव्हा कुणी

डांबरी रस्ते तिथे अन् रुक्ष वर्दळही दिसे

आज दिसते सूज जेथे काल होते बाळसे


काय बोलावे कसे कोणास मी केव्हा कुठे

लोक आता ठरविती अज्ञात कोणी जन्मभर

चेहरे, आवाज, शब्द व भावना मुबलक तरी

सर्व भिंती … पाहिजे असतात जेथे आरसे



- निलेश पंडित

१६ जून २०२४

मंगळवार, २१ मे, २०२४

औषध

 


भूतकाळाच्या दिशेने धावते मन

जीव भवितव्याकडे झेपावताना

निसरडा रस्ता, नकाशा फाटलेला

आणि चकवे भुलविती दाही दिशांना


हात इतरांचे गवसता आणि सुटता

स्वप्न सत्यातील सीमा विरत जाते

भासते जे जे निरंतर अन् चिरंतन

तेच ठरते अल्पजीवी एक नाते


नाइलाजानेच बघता ही भ्रमंती

नाइलाजाचेच दिसते राज्य सारे

नाइलाजाने उन्हातान्हात फिरणे

नाइलाजाने वसवलेले निवारे


सूक्ष्मसे दडतात ह्यातच मात्र मोहक

क्षण इलाजाचे विसाव्याचे निनावी

अन् पराकाष्ठा असे क्षण शोधण्याची

हेच औषध नाइलाजावर प्रभावी


- निलेश पंडित

२१ मे २०२४








शुक्रवार, १९ एप्रिल, २०२४

कात

 

उजेडातल्या सावल्या विरता अंधारात

क्षितिजावरती दूरवर प्रकाश टाके कात


मणी माळतो मोजतो क्षणोक्षणी आशेत

संध्याकाळी गोठतो गूढाच्या छायेत


सूर मधुरसे सोबती रंगांची बरसात

अवघड काळी शांतता जरी खोल ह्रदयात


शांततेतही आगळी मल्हाराची धून

तेज सूक्ष्मसे छेदते तमास उदरातून


दाह ग्रासता खोलवर देहमनाला बोच

सहन करत ती वेदना … आनंदितही तोच



- निलेश पंडित

२० एप्रिल २०२४







शनिवार, १६ मार्च, २०२४

प्रपात

 

जीव रमे तुटे  ।  दशके लोटली

विरून उरली  ।  सहवासी


जाणिवेचा सोस  ।  एकला विद्यार्थी

जग अर्थाअर्थी  ।  शिकतो मी


हपापतो जीव  ।  सहवासासाठी

धाव गर्दीपाठी  ।  हकनाक


शोधण्यात सगा  ।  दुरावले सगे

व्यर्थ आगेमागे  ।  जाचे गर्दी


आजन्म पाखरू  ।  व्यग्र भिरभिरे

परके सोयरे  ।  फुलांसम


त्यात होते स्वप्न । व्यर्थ धूसरसे

मन वेडे पिसे  । जन्मभर


खुणावे संतत  ।  काही आसपास

केवळ आभास  । असूनही 


दूर वा निकट  ।  अमूर्त वा मूर्त

श्वास ह्या श्वासात  ।  उष्ण तिचा


रेशमी गुंफण  ।  असे नसे त्याची

गूढ आनंदाची  ।  पायवाट


पथिक एकटा  ।  उरलो मी आज

समाप्तीचे तेज  ।  पाहतो मी


सल जाच खोच  ।  तक्रार काहीही

सुतराम नाही  ।  मनोमन


तेवणारी वात  ।  विरणारी ज्योत

काळाचा प्रपात  ।  मावळू द्या



- निलेश पंडित

१७ मार्च २०२४

शुक्रवार, २ फेब्रुवारी, २०२४

शोध

(वृत्तः रुचिरवदना)

बाहेर स्वस्थ मात्र आत त्रस्त नेहमी

सोसून वंचना सदैव लाभता कमी

… मी रोजरोज तेच जगत फक्त राहिलो

अज्ञात गूढ नकळत नेमका कोण मी


गोंगाट पाळण्यात गमावून शांतता

वाटेवर इतरांच्या सक्तीत चालता

… मी मला खुद्द विसरलो … दुरावलो मला

भीती मनात मुरत दावणीस बांधता


… केवळ म्हणून परतलो स्वताकडे जसा

वाटलो मूळ मीच मला अपरिचित तसा

… भांबावलो अपात्र भासलो जगापुढे

एकाकी मी … जाणला जगायचा वसा


उमगले समुद्रातलेच बेट सर्वही

आपलाच आपल्यास शोध गर्दीतही


- निलेश पंडित

३ फेब्रुवारी २०२४











शुक्रवार, २२ सप्टेंबर, २०२३

विश्वास

 

कधी चिंता, कधी त्रागा, कधी हव्यास आहे

मला माझाच माझ्या वागण्याचा त्रास आहे


चपळ आहे तसा तो रोज आहे चालतोही

गवसणी घालतो काळास मी हा भास आहे


जरा अनवट वळण घेऊन माझे पाय थकले

असो रस्ता कसाही शेवटी संन्यास आहे


बिरुद मिरवून मी बदलूनही टाकीत गेलो

जणू निष्पर्ण वृक्षाच्या तळाशी रास आहे


उभा मी ठाम आहे एकटा आहे तरीही

बिगुल वाजेल सुटकेचाच हा विश्वास आहे



- निलेश पंडित

२३ सप्टेंबर २०२३

सोमवार, ४ सप्टेंबर, २०२३

दुर्लक्षित

 (वृत्तः भामिनी)


आतल्या आत कल्लोळ काही

चाललेला जरी बारमाही

… आक्रसे चेहरा हासताना

हास्यमुद्रा ठळक दृश्यदेही


लखलखाटातला काळ गेला

मात्र तो आठवे रोज त्याला

… जीवघेणी नशा साद देई

आणि निर्जीवशी स्वप्नमाला


आगळे वेगळे खास होते

वेदनांचे तिथे फास होते

… कस्तुरीचा जसा गंध होता

कोंडलेले जुने श्वास होते


वेगळा भासतो … मात्र नाही!

खुणवितो आत माझ्यातलाही

… जाणतो आणि दुर्लक्षितो मी

चुळबुळे आतल्या आत तोही!



- निलेश पंडित

५ सप्टेंबर २०२३


शनिवार, २९ जुलै, २०२३

ठसे

 

स्वप्न पडले पाकळीला

पाकळी स्वप्नात फुलते फूल झाली

अन् सकाळी ऊन पडता

तप्त स्पर्शाने उन्हाच्या जाग आली


जसजसा चढला दिवस .. ती

होरपळली … तसतसा बाजार भरला

पाकळीने गाठला तळ

वाळली, निष्प्राण झाली … दिवस सरला


भाग होती ती फुलांचा

फूल नव्हते मात्र फुलते कोणतेही

जगरहाटी ज्ञात नव्हती

स्वप्न मनभर फुलत गेले … झीज देही


लाभले दवथेंब थोडे

देत गेले ऊब, माया, सौख्य काही

आज पाचोळ्यात दिसती

पाकळीवर पुसटसे त्यांचे ठसेही



- निलेश पंडित

३० जुलै २०२३

शुक्रवार, ३० जून, २०२३

आवेग

काहूर पसरते दृश्यातून मनात

स्फोटासम खळबळ आक्रंदे ह्रदयात

...  पडती ठिणग्या अन् आत पसरतो वणवा

दग्धता प्रखर उसळे रंध्रारंध्रात


भरती सरता तो प्रसंग केवळ सरतो

गाभ्यात ठसा पुसटसा मनोमन उरतो

... येताच उबळ गतस्मृती पुन्हा अवतरती

आवेग कमी पण जीव पुन्हा थरथरतो


साचते वाहते साकळते थिजतेही

जी अपार ऊर्जा क्षणोक्षणी ह्या देही

... मी तीच मी तशी माझीही ती म्हणतो

संपूर्ण मात्र ती कह्यात माझ्या नाही


पांथस्थ एक मी क्वचित कधी रुजणारा

मी पशू हिंस्त्र आदिमपणही जपणारा

... चालतो पुढे ठेवून पाश मी मागे

हा प्रवास आवेगासम ओसरणारा



- निलेश पंडित

१ जुलै २०२३