हा ब्लॉग शोधा

आस्तिकता - नास्तिकता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
आस्तिकता - नास्तिकता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, २० डिसेंबर, २०१४

मंत्र

(वृत्त: वनहरिणी)

मनात माझ्या सुप्त अपेक्षा चमत्कृतींची सदैव उरते
बालपणापासून नेहमी कुठेतरी कोपऱ्यात मुरते
संकटकाळी अथवा दिसता पुढ्यात माझ्या दुर्मिळ संधी
प्रार्थनेत, श्रद्धेत डुंबते तर्कशुद्धता अर्धी मुर्धी

मनुष्यत्व शापात नांदते अज्ञानाच्या भले नेहमी
आत्मविकासाची त्याला परि खुबी लाभली आहे नामी
ढाल खुबीची हातामध्ये अज्ञाताची हृदयी भीती
अशा दुहेरी तजवीजीने लढत जात जगण्याची नीती

दैव प्रयत्नाची समिकरणे ठरती अगम्य नित्य परंतू
हरेक किरणाला आशेच्या लगडे अंधाराचा किंतू
धडपडीत ह्या संतत आता गुपित स्पष्ट जाणवे आगळे
जुने जाउ द्या मरणालागुन मंतरलेले मंत्र वेगळे
…. …. मंतरलेले मंत्र वेगळे


- निलेश पंडित
२१ डिसेंबर २०१४

मंगळवार, १६ डिसेंबर, २०१४

ठेवा


युगानुयुगं आपलं म्हणवणाऱ्या माणसांनी
सुखासाठी सदैव दुःख सोसत
अंधाराला प्रकाश मानत चाचपडत
मनं झिजवली कमी
थिजवली जास्त
हे जाणवून
दिशाहीन मनानं
धीरानं टाकलं एक पाउल
अज्ञानाच्या अंधारातच
प्रकाशाची निव्वळ तिरीप
दूरवर पाहात
डार्विनच्या उत्क्रांतीतत्वाच्या
कुबड्या घेऊन

तेव्हा गवसला
साडेतीन अब्ज वर्षांपूर्वीच्या
संभाव्य प्रथमपेशीचा
धुसर सूक्ष्म दुवा
अखिल स्थूल विराट जीवसृष्टीशी
निखळ अनुमानबद्ध नातं सांगणारा

सापडले
जीवसृष्टीच्या निरनिराळ्या घटकांना
एका मूलतत्वात गुंफणारे
मातीत विलीन झालेल्या
नामशेष मृतांच्या अवशेषांना
पुढील पिढ्यांसाठी न्याय देणारे
वैविध्यातून अखंड धावणारा
एकसमान धागा
पोटी बाळगणारे
असंख्य घटक

ज्यांनी मुक्तहस्ते आयुष्याला दिलं भरभरून बरंच काही  …
दिशाहीनतेत दडलेली दिशा
अज्ञानात लपलेलं ज्ञान
आणि
स्थूलसूक्ष्माच्या मूलतत्वाचं
शरणागतीविना स्वच्छ दिसणारं
श्रद्धेचा आधार न घेणारं
निकोप निर्मळ रूप


- निलेश पंडित
१६ डिसेंबर २०१४

गुरुवार, २० नोव्हेंबर, २०१४

भरारी



(वृत्त: सुमंदारमाला)

मनाच्या तळाशी वसे गूढ भीती
विचारांस जी नेहमी ग्रासते
रुजे अंधविश्वास तेव्हा स्वभावे
मनाला अतार्कीकता फासते

जरी अज्ञता जाचते मानवाला
तरी मूढता अंगिकारू कसा
भले अज्ञ मी मात्र पूजून कोणा
खुळी अंधता मी स्विकारू कसा

चला अंतराळात घेऊ भरारी
मनाचे चला पाश तोडू जरा
व्यथा अन कळा अंतरी सोसताना
सदा चेहरा ठेवुया हासरा

दिसे जेथ अज्ञात तेथे चिकित्सा
असा मंत्र जे नित्य चोखाळती
तयांनीच विज्ञान केले प्रवाही
दिली मानवाला तयांनी गती

बघू काय होते …. जगू आणि पाहू
प्रयोगात सर्वस्व शोधू चला
जसे आकळे ते तसे सर्व मांडू
वृथा भक्तिची तोडुया शृंखला


- निलेश पंडित
२१ नोव्हेंबर २०१४

शनिवार, १६ ऑगस्ट, २०१४

बुरशी

(वृत्त: मंदाकिनी)

का ग्रासते, फोफावते भरलेपणाला पोकळी
अज्ञात अन् गूढासही आनंद का जातो बळी

ही कोणती बुरशी अशी स्थैर्यास ही जी लागते
पेरून भीती कायमी आयुष्य अवघे मागते

आंजारते, गोंजारते … मग वाढते अन् जाळते
देवत्व शोधायास नंतर हीनता चोखाळते

दुर्लक्षिते खडतर विवेकाची चिकित्सा नेहमी
निर्बुद्धतेशी जोडते सुख आणि शांतीची हमी

शरणागती ना मागता बुरशी कुणी काढेल का
अज्ञात अन् गूढासवेही स्थैर्य मग लाभेल का

- निलेश पंडित
१७ ऑगस्ट २०१४

गुरुवार, २४ एप्रिल, २०१४

सवाल


कशास द्यावे कुणास काही
घेणारा मी कोण … कोण तू?
देणे घेणे झाले का रे
मनात हा जर उरतो किंतू?

तसेच मी ही काय दिले तुज
स्वरूप अन् शब्दांची झालर
भीतीच्या गाभ्याला जपले
भाव पेरला थोडा त्यावर

स्वरूप, झालर, काळ बदलले
पण भीतीचा गाभा टिकला
संदेहाचे कारण झाले
देह तुला मी उगाच विकला

मी अन् माझ्यासम सारे जे
फोफावत गेले अव्याहत
फोफावुन तू त्यांच्यावरती
गाजवीत गेलास हुकूमत

दिले घेतले नाही काही
पायामध्ये पाय अडकले
गती थांबली तुझी नि माझी
उगाच माथे मात्र भडकले

खूप विचारांती आताशा
मनातून मी तुला त्यागतो
तुझी नि माझी दोघांचीही
जागा आता मीच व्यापतो

त्यानंतरही मनात माझ्या
सवाल उरतो एक परंतू
दिले घेतले कुणी काय अन्
उरलेला जो तो मी का तू?


- निलेश पंडित
२५ एप्रिल २०१४

रविवार, २२ डिसेंबर, २०१३

वृष्टी

(वृत्त: वनहरिणी)

आज पाहता वळून मागे अनंत रूपे तुझीच दिसती
अशीच काही भविष्यातही अनपेक्षितशी खचितच वसती

बरस बरस तू बरस असा अन् आयुष्याचे वसव, उसव क्षण
कृष्ण, धवल वा हरित असो पण क्षणाक्षणा लाभो तव तोरण

पहिली वृष्टी वत्सलतेची अजून देते ऊब आगळी
ऊबेतुन जन्मली, साठली जिजीविषा अन् ऊर्मी सगळी

दुसरी वृष्टी प्रखर उन्हाची जाळित जाणारी कायेला
शिकलो कैसे विषवृक्षाच्या टाळावे जहरी छायेला

अशाश्वताच्या, चिरंतनाच्या आनंदाची तिसरी वृष्टी
मोहक मज मग भासत गेली हरित-रुक्ष मायावी सृष्टी

तू असल्याने पृथ्वी खुलते कोरड सलते दडी मारिता
पण मिळतो आधार मनाला दैनंदिन मज जगण्याकरिता

बरस बरस तू बरस असा मी तवतत्वाने  न्हाउन घ्यावे
नखशिखांत मग तन्मयतेने अद्वैती समरसून जावे


- निलेश पंडित
२३ डिसेंबर २०१३

रविवार, १३ ऑक्टोबर, २०१३

पारखा

(वृत्त: मंदाकिनी)

अस्वस्थ तू होतोस अन् होतो तसा मी ही जरा
अस्वस्थता हाताळण्याच्या भिन्न का अपुल्या तऱ्हा?

आकाश दिसते पोकळी तुज … ते दिसे मजला निळे
स्वप्नात मी रंगून जाणे आणि तुज ना आकळे

वाटा नव्या तू शोधसी अन् शोधतो मी ही तशा
विज्ञान उत्तम मानतो मी जाणतो नूतन दिशा

मज जाचते अज्ञात जेव्हां गूढ  धोका पाहतो
मी ढाल करतो कल्पनेची टाळण्याला दाह तो

हे मान्य ना तुज … राहसी अस्वस्थ तू का सारखा?
या मोहिनीमय पण खऱ्या निद्रेस होसी पारखा?


- निलेश पंडित
१३ ऑक्टोबर २०१३

शुक्रवार, ११ ऑक्टोबर, २०१३

बंध


नाही विसरता येत
जबाबदारीचा बंध
सारे आहे अस्तित्वाशी
जोडलेले एकसंध

अल्पकाल स्वप्नावस्था
देई सौख्य आणि नशा
उधळावे का आयुष्य
अनिश्चित मार्गी अशा?

उपमांच्या मिश्रणाला
शब्द्सौन्दर्याची जोड
मोघम संदिग्ध बोल
सूज्ञतेशी काडीमोड

मना पडते भुरळ
अलौकिकतेची फार
तेव्हा परजतो मीच
विवेकाची शस्त्रे चार

परी त्यातही आताशा
जीव होतो अर्धामुर्धा
अंधश्रद्धा नष्ट होते
हीच ठरे अंधश्रद्धा !

नाही नाही नाही नाही …
नाही विसरता येत
अज्ञानाच्या खांद्यावर
दिसते बुद्धीचे प्रेत


- निलेश पंडित
११ ऑक्टोबर २०१३

रविवार, १४ जुलै, २०१३

अबोध गाणे



(वृत्त: वनहरिणी)

अनंत पैलूं मध्ये दडे भीति ही मनाला सदैव डाचे
जिथे असावी छटा सुखाची तिथेच सावट असे भयाचे

म्हणावयाचे बरेच आहे सदाफुलीचे अबोध गाणे
अपार चिंता मनात गाते उदास ओले-सुके तराणे

कणाकणाने फुलावयाचे तसेच आहे झिजावयाचे
क्षणाक्षणाचा प्रवास … अंती क्षणात एका थिजावयाचे

जगावयाला भकासतेची विजोड छाया भले असावी
उधाणलेली परंतु आशा तिच्यासवे नेहमी वसावी

… म्हणून साकारतो तुला मी मनात माझ्या तुला वसवतो
जशी घडे पायवाट माझी मनोमनी मी तुला ठसवतो

पिढ्यापिढ्यांचा प्रवास आहे तनामनाच्या नियोजनाचा
तुझ्याच प्रतिमा जरा बदलुनी "असे-नसे" च्या विलोकनाचा!


- निलेश पंडित
१४ जुलै २०१३

बुधवार, ३ जुलै, २०१३

शारदे….

(वृत्त: मालिनी)

सुखद जगत जावे बेगडी स्वप्न होते
अवचित कळले जे नेहमी भग्न होते
अगणित प्रतिभेचा गर्व होता मनाला
उथळच लिहिण्याचा छंद होता जिवाला

नकळत क्षण तेव्हा यातनापूर्ण आला
ठसठस जखमांची मुक्त पेरून गेला
नजर प्रखर झाली वेदना स्पष्ट झाली
सुलभ समज आली वृत्तिही स्वच्छ झाली

अनुभव जमले जे तेच झाले शिदोरी
परवड मग माझी देत गेली उभारी
झरझर मग काव्ये लेखणीतून आली
परवड जगण्याची शब्दशृंगार ल्याली

अविरत तुज आता मागतो काव्यराशी
सतत मनन व्हावे हीच कांक्षा उराशी
तुजविण जगण्याची कल्पना व्यर्थ आहे
तुजसह जगण्याला नेमका अर्थ आहे!


- निलेश पंडित
३ जुलै २०१३

सोमवार, ३ जून, २०१३

भास

(वृत्त: दिंडी)

वेग भारी आयुष्य घोर आहे
क्रूर काळाचा त्यात जोर आहे
सूत्र गूढ जरी सूत्रहीन नाही
त्यात दडती आनंद …वेदनाही

पती पत्नी एकत्र नांदतात
स्वप्न दोघे आजन्म पाहतात
करायाला पोटची मुले मोठी
नित्य कष्टतात फक्त मुलांसाठी

पंख फुटुनी पण पिले उडुन जाता
एकटीच अखेरीस ती उभयता
एक हात त्यांत सोडता अचानक
अंत दुसऱ्याचा अधिक हो विदारक

अशी काटेरी वाट चालता मी
असे भास तुझा नित्य रोमरोमी
भले वास तुझा भास जरी असला
त्यात जगण्याचा सूर मज गवसला


- निलेश पंडित
३ जून २०१३

गुरुवार, २८ मार्च, २०१३

परमेश्वर

(वृत्त: लवंगलता)

माझ्यातून वजा करता "मी" केवळ तो उरतो
अंतर मंतरतो...त्याला मी परमेश्वर म्हणतो

सूर्य किरण होऊन सकाळी काया चेतवतो
भक्तीरस ओसंडत भैरव कानी रुणझुणतो
....उभ्या दिसाचे कोष्टक मांडुन कष्टवितो मजला....
ऊर्जा बनतो रक्ता घामा मधून सळसळतो

माध्यान्हीला पोटामध्ये वैश्वानर होतो
जिजीविषेचे जणू प्राथमिक कारण दर्शवतो
....रसरशीत रसना तृप्तीचे मोह चार देई....
पूर्णब्रह्म भासतो जसा मी कवळ वदनि घेतो

पोटासाठी घाम गाळण्या मज तो झगडवतो
दोन चार मग घोट नशेचे मंजूर हि करतो
....उफाळता सैतानी वृत्ती क्लेश चोख देई....
परिस्थिती बिघडवतो आणिक नतमस्तक करतो

संध्या समयी दिवस भराचा प्रकाश ओसरतो
डुगडुगत्या मानेला रस्ता अंतिम आढळतो
....यमपाशी ग्रासता वेदना...वाटाड्या होई....
त्याच्यावर सोपवता सारे मार्ग पार पडतो

अज्ञाताच्या नियोजनाचे माध्यम तो असतो
तर्क-चिकित्सा-अनुमानाचा पुरस्कार करतो
....अज्ञातच अन अज्ञाताचे मूर्त रूप होई....
वैज्ञानिकता विचारांत तो सदैव जागवतो

स्वस्वरुपाच्या कुरूपतेने कधी त्रस्त होतो
प्रामाणिक नास्तिकता माझी जपतो वाढवतो
...."मी-तो" अंतर टाकुन मग तो रमतो अद्वैती....
अन परमेश्वर माझ्या लेखी बाह्य जगी नुरतो !


- निलेश पंडित
२९ मार्च २०१३

मंगळवार, २६ मार्च, २०१३

दुकान

(वृत्त: हरिभगिनी)

या हो या...या सारे या...स्वप्नांच्या बाजारा या
स्वप्न विका अन् यश मिळवा - जमवा मग भक्कम माया

बाजाराच्या नियमांची जगावेगळी घडण इथे
कंत्राटाची गरज नसे, तर्काचेही स्थान थिटे

दुकानात येणा-याला नको "गि-हाइक"..."भक्त" म्हणा
गंडा बांधा अन झुकवा, तोडा त्याचा ताठ कणा

"स्वप्नांची पूर्ती होते...पुढल्या जन्मी" हे सांगा
लागतील तुमच्या दारी, तिष्ठत भ्रमणा-या रांगा

भाषेवरती जोर हवा, सात्विकतेची छबी हवी
सांगावी शिष्यांकरवी, दिव्यकथा मग नवी नवी

निश्चित उत्तर टाळत जा, प्रश्नावरती प्रश्न करा
आधाराला जाडासा, बगलेमध्ये ग्रंथ धरा

एकवटा सारी गात्रे, अन् गात्रांना फोल म्हणा
संपताच शस्त्रे काढा, क्रोधाचा फुत्कारफणा

युगा युगांची पेठ खरी, या धंद्या बरकत न्यारी
सहज यशाचा मार्ग भला, दंशच पेरू अंधारी !


- निलेश पंडित
४ ऑगस्ट २०१२

शनिवार, १५ डिसेंबर, २०१२

विरोधाभास


काळ्या पांढ-याचा खेळ
त्यात उष्ण शीत मेळ
कुणा आजन्म दारिद्र्य
कुणा श्रीमंती निर्भेळ

कुठे घट्ट गाठ-साथ
दुष्काळाला भूकंपाची
क्रूर शक्तींना लाभते
खाण सोन्याची रुप्याची

सा-या सा-यात समान
विरोधाचा हा पदर
काय किमया रे तुझी !
द्वैती अद्वैत सुंदर !

रिझवतो मीच माझ्या
जरा मनाला माफक
आणि समाधाने गातो
देव दानव रूपक

समजावतो स्वतःला
सारे मिथ्या नि नश्वर
डोळयांसमोर अंधारी
मनी "ईश्वर...ईश्वर"


- निलेश पंडित
२१ नोव्हेंबर २०१२

सोमवार, १० डिसेंबर, २०१२

मखलाशी


माथ्यावर आकाश फुटावे
आम्हा नाही काही चिंता
केले ना तू मर्त्य अम्हाला?
घे दर्पोक्ती ऐकुन आता...

असे नसे की निर्भय झालो
अथवा झालो समर्थ आम्ही
कळले आता एक फक्त की
गूढा लोटांगणे निकामी

समोर आम्हा अनेक दिसती
तुला पूजिती परि तळमळती
बोटे मोडित नशिबाला मग
पूजेनंतर अश्रु ढाळती

म्हणून जाणुन घे मखलाशी
अम्हा मानवांना सुचलेली
आम्ही बनतो देव स्वघोषित
नाडाया जनता पिचलेली !


- निलेश पंडित
३१ ऑगस्ट २०१२

गुरुवार, २९ नोव्हेंबर, २०१२

आवाका


आयुष्याच्या आवाक्याचे अनेक कप्पे करीत जातो
कप्प्या कप्प्या च्या स्वरुपाचे वर्णन शब्दी भरीत जातो
शब्दांच्या गुच्छांनी बनती त-हेत-हेच्या अनेक कविता
अवचित होते खळखळती या कवितांमधुनी जीवनसरिता

पारा लावावा काचेला, पहात जावे मीच स्वताला
तसे काहिसे करतो - माझ्या मीच नियोजी व्यक्तित्वाला
जुळवुन तारा तंबो-याच्या शोधत जातो सूर आतला
चुके ...सापडे ...सूर ताल पण कैफ मिळे भरपूर त्यातला

दृश्यादृश्याचे द्वैताशी आता जाते उमगत नाते
देवत्वाची गूढ जाण या अनुभूतीतच  यथेच्छ न्हाते
परंपरा...रूढी...वादांची झटकुन आता सर्व जळमटे
शांत स्वस्थ मी अभेद्य बनतो ...अन जगण्याची उर्मी दाटे !!


- निलेश पंडित
३ नोव्हेंबर २०१२

मंगळवार, २७ नोव्हेंबर, २०१२

गाथा


चालावे विज्ञानाचे बंड अखंड
जरि इतिहासाचे माजे स्तोम प्रचंड
प्रत्येक युगाचे अंतिम क्षण येतील
हिरव्याची पिवळी पानेही होतील

ती रुढी सतीची बंदच झाली अंती
अन् गेले मांत्रिक...गेल्या मंत्र विभूती
प्रगती-उत्क्रांती एकच अनुभव स्पष्ट
मानवी श्रमांची गाथा अत्युत्कृष्ट

हे तर्क, निरीक्षण, प्रत्यय अन् अनुमान
मानवास करती सुसज्ज आणि सुजाण
यांतून जगाचे अमर मंत्र सुचतील
हिरवाई पुढच्या पिढ्या पुढे नेतील

- निलेश पंडित
२८ नोव्हेंबर २०१२

गुरुवार, १९ जुलै, २०१२

कलम

कलम

मनात माझ्या कलम लावतो आस्तिकतेवर नास्तिकतेचे
फळे राखण्या बांधित जातो पेटारे अन् सात्विकतेचे

विज्ञानाच्या विश्वामध्ये अज्ञानाची देतो ग्वाही
श्रद्धेच्या मार्गात राखतो निर्णय-क्षमता खुली प्रवाही

संस्कृत-प्राकृत समान आणिक विवेक मजला प्रधान वाटे
"शरणागत व्हा" कोणी म्हणता, संशय माझ्या चित्ती दाटे

परंतु करिता नामसाधना, सुखावतो मी नित्य जरासा
विचार मंथन होता जाचक, भक्ती देते स्वास्थ्य...दिलासा

सकस तसे हिणकस ही पैलू दोहोंमध्ये मज आढळती
कमतरता एकीत भासता, दुजीकडे मम डोळे वळती

देव नसो वा असो कसाही, बाह्य जगी मी शोधित नाही
अथांगता जी वसे अंतरी, गवसेना ती दिशांत दाही

- निलेश पंडित
१९ जुलै २०१२

रविवार, १५ जुलै, २०१२

विसर

सूर लागत जाती तसे
का रे गळा होतो क्षीण?
वस्त्र रुळत जाता अंगी
विरते आणि उसवे वीण?

तीळ तीळ तुटून जेव्हा
संसारात लागे जीव
तेव्हा होते सुरू झीज
ग्रासे एक एक उणीव

सौंदर्याचे मिळे ज्ञान
तेव्हा अधू होइ दृष्टी
हिरवाइची येता जाण
का रे झडे सत्य सृष्टी?

शक्ती देउन हातांना
बांधतोस माझे पाय...
विसरू नये तुलाच कधी
म्हणून हे करतोस काय?

- निलेश पंडित
१४ जुलै २०१२

रविवार, ८ जुलै, २०१२

प्रकाश

विज्ञानाच्या अथांगतेची
विस्तृत कक्षा माहित होती
त्यानंतरच्या अज्ञानाच्या
धूसरतेची जाणहि होती

तर्कशास्त्र अन् संतत प्रचिती...
सत्य, निरीक्षण अन् अनुभूती -
- या तत्वांशी अखंड बांधिल
आयुष्याची पद्धत होती

तरी हि होती हुरहुर काही
आंत वादळे स्वास्थ्य वरवर
टोले मारित छळीत होते
क्षणोक्षणींचे अनुभव खडतर

मनोमनी ना पटून सुद्धा
उपासनेची होय प्रेरणा
काळोखाचे राज्य संपले
दार उघडले प्रकाश किरणां

- निलेश पंडित
१० जानेवारी २०११