हा ब्लॉग शोधा

आई लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
आई लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, ५ फेब्रुवारी, २०१६

नवलाई


एक कुठलीशी कोण
थंडी वाऱ्यांत ढगांत
वाट चाले अज्ञाताची
नजर दिगंतरात

चेहरामोहरा तिचा
कशाला तो … नाममात्र
सप्तरंगांची करते
पखरण अहोरात्र

वर्षाव ती स्वीकारून
कशाचाही माथ्यावर
तांनापिहिनिपाजाने
विश्व घडवी सुंदर

कृष्णवस्त्र त्यातही ती
ठेवते आपणापाशी
पृथ्वीवर वावरते
गूज मात्र आकाशाशी

साधेपणात निर्मिते
अनंत जी नवलाई
असणार दुजी कोण
कुणाचीतरी ती आई

- निलेश पंडित
६ फेब्रुवारी २०१६

गुरुवार, ४ ऑक्टोबर, २०१२

धांदल

आई माझी बाळखेळणी आणुन दे ना झाडाखाली
हात चिमुकले - खूप खेळणी...बघ ना माझी धांदल झाली

उशीर झाला...भरून दे ना वह्या पुस्तके दप्तरातली
बस ला दोनच मिनिटे उरली...बघ ना माझी धांदल झाली

मित्राची ही बहीण आई, गेल्या वर्षी प्रीती जडली
आज अचानक तू विचारता, माझी थोडी धांदल झाली

सुनबाईंच्या डोहाळ्यांची यादी झाली भली थोरली
कोडकौतुके...व्रतवैकल्ये...आई तुझीच धांदल झाली

नको करू तू चिंता आई, कळवत राहू सदा खुशाली
तू नसता पण परदेशी स्थायिक होताना धांदल झाली

आई....आई...

देवा...आई कुठे हरवली?.... नाही उरला कोणी वाली
पुन्हा एकदा आई दे ना...आयुष्याची धांदल झाली


- निलेश पंडित
५ ऑक्टोबर २०१२

मंगळवार, ३ जुलै, २०१२

आई - 3

आई

सूर्यास्ताचा मार्ग
धरतात सगळे
तसा तो तूही
धरलास आई
पण सगळ्यांची वाट
आपापली होती
तू मात्र
प्रत्येकाची वाट
चाललीस बाई !

सगळ्यांच्या होत्या
आवडी निवडी
तुझी निवड
फक्त उरल्या सुरल्याची
बाकीच्यांनी रचले
संसार आपापले
तुझी छबी फक्त
त्यांतच मुरल्याची

केलंस आम्हा तरबेज
काळोखातही चाचपडण्यास
पण घेऊन गेलीस
स्वतःबरोबर प्रकाश
तू असताना जे होतं
लखलखीत..स्वच्छ...निरभ्र
ते आता झालं अंधुक...
...आता अंधारलं आकाश

- निलेश पंडित
१४ मे २०१२

आई - 2

आई

खरखरीत हात तिचा
डोक्यावरून फिरला
प्रत्येक सुरकुतीचा स्पर्श
माझ्या सर्वांगात मुरला
खोलावलेले डोळे तिचे
प्रेमाश्रुंनी सजले
अंतिम अश्रूंनी तिच्या त्या
माझे आयुष्य भिजले
सारे जवळ असूनही
आता होती ती एकाकी
उरले होते काही क्षण
नुरले होते काही बाकी
आशिर्वादाचा हात तिचा
वर जाऊन थिजला
तो आशिर्वाद आता आमच्या
सर्वायुष्यात रुजला

आता बोलतो मी स्वतःशी
मौनात....माझ्यात....असते ती
स्वर्गी गेली...आशिर्वादात
आम्हा ठेवून स्वर्ग साती

- निलेश पंडित
९ जुलै २०११

आई

आई

वादळ, वारा, वीज, पाऊस
त्यात ढगांचा गडगडाट
आईची हाक कानी येते
स्वरांत काळजी काठोकाठ

"बाळा, पावलं जपून टाक
किडे, काटे, धोके पाहून
परमेशाचं नाव जप
मीत्व त्याला वाहून..
सूर्यप्रकाश पाठीराखा
खचितच तुला दिसेल
रोमारोमात आयुष्याच्या
ऊर्जा, ऊर्मी वसेल.
थांबू नकोस थकून मात्र
पावलं आपली टाकत राहा
काटेरी...पण सुगंधी...फुलं
मनस्वितेत हुंगून पाहा."

आईला जाऊन वर्षं लोटली
तरी मनी वसे रूप
आई...अशीच जवळ राहा
माया कर खूप....खूप....

- निलेश पंडित
३ एप्रिल २०१०