हा ब्लॉग शोधा

मन लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
मन लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, १८ नोव्हेंबर, २०२३

क्षण

 

वियोग सोसे कुणीतरी अन्

संयोगातच कोणी थिजते

… समीप आपण अलिप्त आपण

जगे निखारा ज्वाला विझते


गैरसमज की समज न समजे

सतत बोचते मूक वेदना

… तीच रक्षिते तीच भक्षिते

थिजवितही राखते चेतना


डळमळता पण सळसळताही

ह्या साऱ्याचा एकच पाया

अवधी मागत अगम्यतेच्या

पडत राहणे हातापाया


आजकाल मग कुपीतले क्षण

निखाऱ्यातल्या जुन्या उबेचे

आठवताना पुन्हा अचानक

जग प्रकाशते नव्या उषेचे



- निलेश पंडित

१९ नोव्हेंबर २०२३

शुक्रवार, ३० जून, २०२३

आवेग

काहूर पसरते दृश्यातून मनात

स्फोटासम खळबळ आक्रंदे ह्रदयात

...  पडती ठिणग्या अन् आत पसरतो वणवा

दग्धता प्रखर उसळे रंध्रारंध्रात


भरती सरता तो प्रसंग केवळ सरतो

गाभ्यात ठसा पुसटसा मनोमन उरतो

... येताच उबळ गतस्मृती पुन्हा अवतरती

आवेग कमी पण जीव पुन्हा थरथरतो


साचते वाहते साकळते थिजतेही

जी अपार ऊर्जा क्षणोक्षणी ह्या देही

... मी तीच मी तशी माझीही ती म्हणतो

संपूर्ण मात्र ती कह्यात माझ्या नाही


पांथस्थ एक मी क्वचित कधी रुजणारा

मी पशू हिंस्त्र आदिमपणही जपणारा

... चालतो पुढे ठेवून पाश मी मागे

हा प्रवास आवेगासम ओसरणारा



- निलेश पंडित

१ जुलै २०२३

सोमवार, ३ एप्रिल, २०२३

व्यथा

 

लिहिता लिहिता थकलेले मन चुटपुटले

काफिले नकोसे हे शब्दांचे आता

हे केवळ निष्फळ काळाला चाचपणे

ओढणे व्यर्थ प्रत्यंचा ... रिताच भाता


वलयात देह देहात मनाची व्याधी

अतिअसाध्य आणिक सदैव ठसठसणारी

अदृश्य पोकळी खोल तीत अज्ञात

कष्टाज्ञानानेही न कधी भरणारी


झिजता झिजता फुलण्याची स्वप्ने जपणे

हा प्रयास केवळ एक विरोधाभास

जर दिशाच जर्जर अगम्य अंधाराची

का फुकाच तेजोवलयांचे आभास!


क्षणकालच टिकली उबळ व्यथेची माझ्या

अवचित जाणवला शब्दकळेचा महिमा

वैफल्य तरी ते शब्दांमधून कळले

शब्दांतच माझी मलाच दिसली प्रतिमा



- निलेश पंडित

३ एप्रिल २०२३


रविवार, ११ डिसेंबर, २०२२

गरज

 

गरजेची नाणी  |  गरजेच्या नोटा

घोर आटापिटा  |  गरजूंचा


कुणा काही कमी  |  कुणा ओसंडून

तफावतीतून  |  ओढाताण


गरज भासते  |  गरज भागते

तरीही उरते  |  अल्प काही


नव्याने जन्मती  |  अनेक आभास

नवस सायास  |  पुन्हापुन्हा 


गरजेचा भास  |  अक्राळविक्राळ

सुसाट वादळ  |  निर्मितसे


मग्न प्रवासात  |  प्रवाहपतित

नवजाता त्यात  |  ओढतात


सारेच यात्रिक  |  सारे अनामिक

त्यांसी नावे कैक  |  आम्ही दिली


तशाच आमच्या  | गरजा कल्पित

मात्र भागवित  |  जातो आम्ही


अस्थिर शरीर  |  मनही अस्थिर

गरजांचा भार  |  वर घोर


विरक्तीची जणू  |  गरज प्रेरणा

गरजेच्या वेणा  |  ह्याचसाठी


संदेह सशक्त  |  मनात ठेवून

त्रयस्थ होऊन  | पाहतो मी


क्षणोक्षणी जरा | तोल कधी जाता

पुन्हा सावरता | मिळे गती


अखेर उरते  |  गरज एकच

गरज काहीच  |  नसण्याची



- निलेश पंडित

११ डिसेंबर २०२२

गुरुवार, २० ऑक्टोबर, २०२२

तयारी

 वृत्त: प्रियलोचना


जी अनुभूती हवीहवीशी परमश्रमांनी लाभली

तिचीच प्रगती पुनरावृत्तीच्या बाजारी थांबली

... सुखकर निद्रेला दुःस्वप्नांची बाधा जडली जणू

इच्छापूर्ती विरळ तरी इच्छाशक्ती फोफावली


पुन्हापुन्हा ते तेच स्वप्न का, कसे मनोमन जागते?

जगणे केवळ अशक्य कोटीतील दान का मागते?

... स्थिर असण्याचा कंटाळा का देहमनाला ग्रासतो?

गती असावी सुखकर केवळ हीच आस का लागते?


मान वळे अवचित मागे पावले चार जाता पुढे

प्रतिमा उधार इच्छेमध्ये अनुभव पुढती रोकडे

... भूक लागते भूक भागते भूतकाळ होतो फिका

आणि न थांबे धावत जाते पुढेपुढे मन बापडे


संपणार हा प्रवास ह्याची सतत हीच नांदीच का?

सदानुरक्तीतून विरक्तीचीच तयारी हीच का?


- निलेश पंडित

२० आॅक्टोबर २०२२


गुरुवार, ४ ऑगस्ट, २०२२

जीर्ण

 

कोणती कुठे ही कशी चालते वारी

उजळून चेहरा आत जीर्ण आजारी

... कायेस शुष्क ग्रासते झिंग स्वप्नांची

तजवीज मोक्ष चारी मिळण्याची न्यारी


क्षणकाल थबकतो तिष्ठत पिंडापाशी

व्याकूळ भुकेला अगतिक त्रस्त अधाशी

... कावळा जाणतो भले बुरे जगताना

मानव घसरे भूवर बघता आकाशी


लाभली अपरिमित जरी कल्पनाशक्ती

निर्मिती तशी संहाराचीही वृत्ती

... भरघोस देत नियती जोखतसे पाणी

संस्कृती विकृती मधली अथांग व्याप्ती


ही निसर्गनिर्मित विचित्र जादू सारी

मूढता दडे सुज्ञतेत दाट विषारी



- निलेश पंडित

४ आॅगस्ट २०२२

शनिवार, ९ जुलै, २०२२

शस्त्र

 

भान असते काय केव्हा नेमके अन् कोणती असते नशा

जाणवेना हे तरीही अवतरे कोठूनशी मोहक दिशा

... भास जो त्या रूपरस अन् स्पर्शगंधाची पडावी मोहिनी

आणि अवचित समजते कैफात होती फक्त नटवी दुर्दशा 


धावतो एका प्रसंगातून मी दुसरीकडे अविरत जरी

जाणतो चढतो उतरतो तीच ती नकळत पुन्हा मी पायरी

... रोज वाटा वेगळ्या अन् वाटते मी कापले अंतर नवे

वर्तुळावर धावल्याची बोच अंती मात्र लागे अंतरी


स्वप्न सत्याऐवजी नकळत मनाला साद देता नेहमी

जन्मतो आभास क्षणभर वेदना दृढ मात्र उरते कायमी

... जसजसा भांबावतो ओशाळतो कळते पुन्हा माझे मला

आग्रहाने संपवावे मागणे माझ्याकडे माझेच मी


.. अन् उमगते आग्रहाने संपवावे मागणे हेही तसे

तोडते जे शस्त्र काही त्याच शस्त्रानेच ते जोडू कसे?



- निलेश पंडित

१० जून २०२२

शुक्रवार, १० जून, २०२२

मेळ

 

आवाका अथांग

सैरभैर जीव

जाणिवेस गूढ

ग्रासते उणीव


निमिष सुगंधी

वाऱ्यावर येती

श्वासाश्वासातून

उमलती नाती


आसमंत होतो

जादुई नक्षत्र

जीव मंत्रमुग्ध

तन्मय सर्वत्र


उतरता नशा

चाचपडे पुन्हा

तमात शोधतो

कोवळ्याशा उन्हा


ऊन सावलीच्या

पडे ह्या खेळात

तितिक्षेचे दान

मात्र पदरात


रंगून सरता

सावकाश खेळ

उणीवांचा लागे

जाणिवांशी मेळ



- निलेश पंडित

११ जून २०२२

रविवार, ३० जानेवारी, २०२२

वर्तुळ

 

मनात माझ्या धुके दाटता

ताल आतआतला डळमळे

गूढ अनामिक कसलेसे भय

भरे जुन्या ह्रदयात कोवळे


ठळक गूढ अज्ञात अनिश्चित

सतत जन्मता नवीन काही

तीचतीच ती दशा ... दिशाही

परंतु नसणे कधीच नाही


समतोलाचा प्रयास वरवर

मन लज्जित अथवा अभिमानी

केव्हा आनंदाचे भरते

कधी वेदना तीव्र तुफानी


अतर्क्य माझे विचित्र जग मी

माझ्यातच वसवून तोडतो

त्राग्याने झिडकारता कधी

सावरता जवळही ओढतो


बहुरंगी जग कित्येकांचे

त्यात रोज मी मिसळत जातो

कृष्णधवल दोनच रंगांच्या

विभागणीची शिकस्त करतो!


... धूसर जे ते स्पष्ट दिसावे

जसे जिथे नाही ते व्हावे

ह्या हट्टातच शोधत जातो

वर्तुळात मी उजवे डावे



- निलेश पंडित

३१ जानेवारी २०२२

सोमवार, १३ डिसेंबर, २०२१

खेळ

 

सततचे मोजमाप

मर्यादित चाकोरीचे

गती वाढते तरीही

स्वप्न एकांगी दिशेचे


वाढता वाढे शरीर

शब्द संपदाही वाढे

अर्थ सांधता वाटोळे

नित्य मर्माचे वावडे


रोज शोधता शोधता

काय शोधतो कळेना

सुंभ सदैव शाबूत

आणि पीळही जळेना


जिथे जिथे गुंते काही

तिथे गुंता लागे हाती

पळताना पुढे पुढे

पाश जुने मागे येती


लपविले सुंभ पीळ

तरी दृढ अटळ ते

तंतूंच्याही अस्तिवाशी

पीळ पडण्याचे नाते


मऊसूत खोल काही

धागे ह्यात रेशमाचे

सुप्त लुप्त जरी आत

ऊबदार स्पर्श त्यांचे


फारा वर्षांनी आताशा

मात्र उमगते हेही

नसे काही खरे खोटे

सुंभ नाही पीळ नाही


स्पर्श-जाणिवेचा खेळ

खेळताना नकळत

ऊब-दाह-हसू-आसू

झिरपती ओघळत




- निलेश पंडित

१४ डिसेंबर २०२१

शुक्रवार, १९ नोव्हेंबर, २०२१

पिच्छा

 

बोजड जगण्याचे अवघड समोर ओझे

गतकाळामधल्या फुटकळ असफल इच्छा

आशेची अविरत पखरण स्वप्नांवरती

पुरवते ... भूक भागताच ... लज्जत पिच्छा


एकटा स्वताला नकळत एक समजतो

तर कधी घटक कोणत्यातरी समुहाचा

त्यातही त्यास उपजत हा समज न समजे

अंतरंग आविष्कारच अदृश्याचा


भय आणि कुतूहल नवीन काही दिसता

बदलाच्या जोडीसच स्थैर्याची आशा

उमगणे न संभव अशी छबी जगताची

निपजते स्वताच्या नकळत आत निराशा


होकार नकारा मधे अडकलेला तो

त्याच्यात तसा जो तसाच तो माझ्यात

नाकारा स्वीकारा लपवा वा सजवा

हा दिसतो "मी", "तू", "ती", "तो" ह्या सर्वांत


- निलेश पंडित

२० नोव्हेंबर २०२१

सोमवार, ३१ मे, २०२१

जाण

 (वृत्त: भूपती)


मोहक स्वप्नांची रुंजी मनात चाले

वहिवाटीचे देहाच्या विश्व निराळे

... दोहोंच्या परस्परांशी अगम्य गाठी

आयुष्य खोलवर ह्यातच गुरफटलेले


क्षण पुढील वाटे नव्या दिशेची ग्वाही

स्थैर्याचा क्षणही जुना सोडवत नाही

... जन्मती व विरती भ्रमात सारी स्वप्ने

उमलून फुले जे ते कोमेजत जाई


हे उमजे पण स्वीकार न होतो ह्याचा

आपल्या जगाचा कपोलकल्पित साचा

... चाचपतो अन् मानतो हवा तो जो तो

अमृत वरवर अन् तळात गाळ विषाचा


दूरस्थपणे हे मनास सारे कळते

टाळून जाण ही मन जगण्यातच रुळते



- निलेश पंडित

३१ मे २०२१


शुक्रवार, १२ मार्च, २०२१

अंश

 (वृत्त: उद्धव)

दिसते रंगांची दुनिया

अन् भुरळ मनाला पडते

क्षणकाल मग्न मन होते

मग दीर्घ आठवण उरते


नेमक्या वाटती वाटा

एकेक पाहता वाट

हरवती अचानक वाटा

वाटांच्या जंजाळात


आनंद अंश जगण्याचा

पोकळी दीर्घ स्थावरशी

असण्यावर अटळच असते

नसण्याची अतूट सरशी


धुमसून भावनिक वणवा

शब्दांची खळबळ होते

काहींची रचना होते

काहींची अडगळ होते


... ह्यातून जन्मते काही

नाविन्य जणू अंकुरते

प्रगटतो अंश कवितेचा

अन् शेष मनातच मुरते




- निलेश पंडित

१३ मार्च २०२१


शुक्रवार, २९ जानेवारी, २०२१

संभव

 (वृत्त: विजया)

मद दंभ राग द्वेषाला मिळती स्मितहास्याची आवरणे

औदार्याखाली जपून लपून मी माझे मीपण जपणे

... मिसळत निर्ढावत जातो रुळतो जिथे राहतो तिथे असा

चाणाक्ष नम्र सोशिक कष्टाळू .... बिरुदे मिरवित वावरणे


काळेसे कप्पे अगम्यसे अंधारातच बुजबुजलेले

असतात नेहमी मनात माझ्या मात्र खोलवर दडलेले

... असते कोडे नेमका कधी कोणता उघड होईल कसा 

पडणे उघडे त्यांचे निश्चित हे सत्यच शाश्वत ठरलेले


इतरांसाठी अदृश्य जरी दिसतात मला उघडे पडता

अस्वस्थतेत मी धडपडतो काणाडोळा करण्याकरता

... टाळतो जरी चेहरा ठेवतो बेमालूम प्रसन्नच मी

ते केवळ बोचत डाचत जाती पोकळ वरकरणी जगता


पण त्याचबरोबर असतो आता पुरेपूर ओळखून मी

संभवते तळात कायकाय प्रत्येकाच्या अंतर्यामी



- निलेश पंडित

३० जानेवारी २०२१

सोमवार, २८ डिसेंबर, २०२०

दुय्यम

 वृत्त: मदनरंग


नरमादी ठळक सत्य अन् तशीच संतती

मायबाप पुत्रपौत्र कल्पनेत उतरती

... दगड स्पष्ट नैसर्गिक कोरण्यास आयुधे

शिल्पकार त्यातूनच कल्पशिल्प कोरती


चितारता कल्पनाच सत्य बने चित्र ते

अंशरूप घेत कल्पना खऱ्यात मावते

... मानवी मनात बीजरूप फक्त जी असे

मानवास ... मग मनास ... मग जगास व्यापते


जग झाले गडद गूढ मिश्रण फोफावता

सत्यासत्यात फरक उमजेना मिसळता

... मानव दुय्यम झाला देश, धर्म माजले

भीतीचे साम्राज्य नि बुद्धीची सांगता


बुद्धीने सहज सुखद स्वप्ने जी प्रसवली

स्वप्नांनी त्याच तिची कबर थेट खोदली



- निलेश पंडित

२९ डिसेंबर २०२०


शुक्रवार, २० नोव्हेंबर, २०२०

गतीज

 

उद्या पुढ्यात काय पाहणे अशक्य माणसा

अशांत विश्व दग्ध चित्त हाच रोजचा वसा

... तशातही सभोवती असंख्य मोह साचती

पिढीपिढीत चालतो जुनाच गूढ वारसा


नवाच जोम आगळा नवीन लाट आणते

सलील, उष्ण, सज्ज रक्त मोहते, सुखावते

... विरे फिरून लाट मंद मंद होत नेहमी

तरी तसेच फक्त हेच चक्र नित्य चालते


प्रदीर्घ काळ काळही दुरून वाट पाहतो

अखेर एक घाव खोल एकदाच घालतो

... जरी क्षणैक ग्रासते भयाण गूढ वेदना

त्वरेच सर्व संपते तसाच काळ संपतो


प्रवास तोच तोच जो हरेक वेगळा करे

फुले ... तसाच वेगळपणात जीव घाबरे

...गतीविना लयास फक्त जीवमात्र जातसे  

भलाबुरा असो गतीज जन्म राहणे बरे



- निलेश पंडित

२१ नोव्हेंबर २०२०


शुक्रवार, ३० ऑक्टोबर, २०२०

अविभाज्य

 

परतीच्या वाटा  |  होत जाता सुरू

कसे मी नाकारू  |  सामान्यत्व


आनंददायक  |  भासे खटाटोप

आणि समारोप  |  जीवघेणा


भासले जगता  |  हातातले क्षण

फक्त उधळण  |  क्षणाेक्षणी


असामान्य जे जे  |  वाटे वरवर

रिक्त खरोखर  |  जगताना


सरता आनंद  |  बोचली पोकळी

अजस्त्र मोकळी  |  खोलवर


आणि दुर्लक्षिता |  पोकळी सदैव

वसली जाणीव  |  समृध्दीची


क्षणिक टिकून  |  ऐशी ही जाणीव

अनंत उणीव  |  पुन्हा तीच


अशा चकव्यात  |  कळले न आधी

मृत्यू नसे व्याधी  |  कदापीही


असणे नसणे  |  ह्यांमधे वेदना

भयस्वप्ने नाना  |  देत गेली


क्षणमात्र तिला  |  थोडे विसरावे

आदिअंत व्हावे  |  अविभाज्य


मर्म हे नेमके  |  जाणता मी आज

प्रवास सहज  |  वाटे आता


सामान्यासामान्य  |  व्यर्थ अट्टाहास

संतत प्रवास  |  हेचि सत्य


लिप्त अलिप्त हा  |  वाद आता नुरे

अंती फक्त उरे  |  क्षणक्षण



- निलेश पंडित

३० आॅक्टोबर  २०२०


शनिवार, १९ सप्टेंबर, २०२०

संभ्रम

 

"वेगळेपण चेहर्‍यांचे एक आत्मा"

फक्त वाटे आत्मरंजक एक युक्ती

एक सामायिक गवसते तथ्य केवळ

संस्कृती जोपासते सक्तीत शक्ती


जाणिवेचा एक लपतो थर मधोमध 

आणि सवयीची वसे त्यावर अहंता

हास्यमुद्रा विलसती बाहेर दिसते

अन् तळाशी खोल फसफसते पशूता


ह्या थरांची बदलते घनता सदोदित

आपसातच युद्ध होते ह्या स्तरांचे

ढवळते संदिग्धता आतून सारे

अन् प्रदूषण भिनत जाता खोल मुरते


शोधते मन सूत्र ह्या सर्वांत काही

मात्र आढळते अनिश्चितताच संतत

रेखते फुटकळ मनोरंजक नकाशे

संभ्रमित मन भरकटे मग त्यांत नकळत


अटळ ठरता शेवटी संहार भीषण

स्फोट होता संपतो संभ्रम अचानक

कालपावेतो स्थिती जी बिकट होती

आज होते ती निरर्थक अन् विदारक


... जन्मते मग एक युक्ती नवयुगाची

पाहते जग हास्यमुद्रा बदललेल्या

हिंस्त्र लसलसते पशू निद्रिस्त होती

मांस अस्थींवर उमलते गंजलेल्या


- निलेश पंडित

२० सप्टेंबर २०२०

गुरुवार, ४ जून, २०२०

व्यर्थ


थांबवली ... शब्दांची व्यर्थ देवाणघेवाण.

तर्कानुमानाचा बुरखा पांघरून
दिसलं वावरताना द्वय
कल्पनाविलास आणि भावना ह्यांचं

काय आहे ह्याची जाणीव
अनपेक्षितपणे बदलताच
जरतर असेलनसेलचे
इमले बांधले जाताना पाहिले

जाणवला
त्या इमल्यांचा पाया
वर्षानुवर्षे घडलेला
घट्ट कडक टणक अभेद्य
भावनिकतेचा

बघितली
नैसर्गिकता आणि पशूता
तथाकथित उत्क्रांती आणि सुबुद्धता
ही पात्रं
बदलत्या गरजू गिऱ्हाइकांसमोर
सामाजिक कुंटणखान्यांमध्ये
शक्तीशाली क्रूर
निर्लज्ज भडव्यांच्या
हातातल्या बाहुल्या बनून
योग्यायोग्यतेच्या आणि औचित्यानौचित्याच्या
नटव्या व्याख्यांचे
लेप थापून
रंगरंगोटी करत बसलेली
स्वतःच्या चेहर्‍यांवर


अनुभवला
असत्य क्रौर्य भ्रष्टता
अन्याय हिंसा अनैतिकता
मुस्कटदाबी गुन्हेगारी दडपशाही
ह्यांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी
त्यांनाच समजावं साधन व
करावा त्यांचा वापर अधिकच ...
... तोही अधिक खुनशीपणाने ...
असा अनाकलनीय बुद्धीभ्रंश
जागोजागी
पुन्हापुन्हा

... जोखलं हे सारंच
त्यापासून
सुरक्षित अंतर ठेवणार्‍यांबरोबर
सुरक्षित अंतर ठेवून

म्हणूनच
थांबवली शब्दांची व्यर्थ देवाणघेवाण
मी माझी माझ्याबरोबरही



- निलेश पंडित
५ जून २०२०


बुधवार, १४ ऑगस्ट, २०१९

सुसूत्रता


असते सुसूत्रता ... जगरहाटी
असंच असतं सारं ... ते कसं बदलणार?
पण काहीतरी बदल करायलाच हवा

मनातला सुप्त पशू
आणि उत्क्रांत मानव
दोन्ही एकाच वेळी सांभाळत
मी ठरवत जातो
बरंवाईट ...
... नकळत ...


निर्णय देतो वेगवेगळे
झालं ते योग्यच की अयोग्य
ह्याहून वाईट कसं घडलं असतं
किंवा कसं चांगलं
हे सांगत असतो
माझ्यातील पशू कधी ... कधी मानव
सलगी कशाशी, कुणाशी
सुप्त प्रेरणा पाशवी की मानवी
त्यावरून .... नकळतच

मग कर्ता करविता पाहून मी देतो न्याय
चतुराई की लबाडी
नाकर्तेपणा की संयम
खोटेपणा की राजनीती
भ्रष्टता की अगतिकता
इतिहास महत्त्वाचा की वर्तमान
अप्पलपोटेपणा की व्यवहार
मालक की कुत्रा
गरज की हव्यास
खराब व कारणीभूत माणूस की परिस्थिती
... अशा असंख्य पैलूंवर
लावतो आंदोलनांची टोकं असावीत
तशी लेबलं
माझ्या सोयीनं
माझ्या नकळत ...
कण्हत म्हणत ...

"असंच असतं सारं ... ते कसं बदलणार?
पण काहीतरी बदल करायलाच हवा"


- निलेश पंडित
१५ आॅगस्ट २०१९