हा ब्लॉग शोधा

अंधश्रद्धा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
अंधश्रद्धा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, २८ डिसेंबर, २०२२

वास्तू

 

स्वच्छ व सुंदर रंगविलेल्या भिंती

तलम व ताजी हिरवळ अवतीभवती

... रांगोळी रेखीव छान द्वाराशी

कणभर हळदी, कुंकू तिजवर सजती


अहोरात्र कसलीशी वर्दळ असते

मंदसुगंधी अत्तर हवेत तरते

... टाळ नि टाळ्यांचा रव पडतो कानी

गूढ अनामिक माया मोहित करते


सुखशांती समृद्धी शुचिता भक्ती 

पवित्र मंगल पुण्य मोक्ष वा मुक्ती

... रेलचेल शब्दांची मौलिक साऱ्या

अगतिकतेला शक्तीची आसक्ती


युगेयुगे ह्या वास्तूची ही महती

आत जरी किंकाळ्या दबती विरती



- निलेश पंडित

२९ डिसेंबर २०२२


गुरुवार, ४ ऑगस्ट, २०२२

जीर्ण

 

कोणती कुठे ही कशी चालते वारी

उजळून चेहरा आत जीर्ण आजारी

... कायेस शुष्क ग्रासते झिंग स्वप्नांची

तजवीज मोक्ष चारी मिळण्याची न्यारी


क्षणकाल थबकतो तिष्ठत पिंडापाशी

व्याकूळ भुकेला अगतिक त्रस्त अधाशी

... कावळा जाणतो भले बुरे जगताना

मानव घसरे भूवर बघता आकाशी


लाभली अपरिमित जरी कल्पनाशक्ती

निर्मिती तशी संहाराचीही वृत्ती

... भरघोस देत नियती जोखतसे पाणी

संस्कृती विकृती मधली अथांग व्याप्ती


ही निसर्गनिर्मित विचित्र जादू सारी

मूढता दडे सुज्ञतेत दाट विषारी



- निलेश पंडित

४ आॅगस्ट २०२२

बुधवार, ५ जानेवारी, २०२२

सांगाती

 

नशा आशेत वसताना टिके आशा नशेपोटी

अशा आयुष्यभर बसतात अन् टिकतात निरगाठी


कधी छळछावणीच्या यातनेमध्ये टिके आशा

कुणाला थोडके अपयश पुरतसे शेवटासाठी


भले पुरती करे फसगत तरी उरते खुळी आशा

कितीही भंगली स्वप्ने तरीही झिंगण्यासाठी


कुणाला फक्त दुसऱ्याच्या निराशेची असे आशा

कुणी लपवी निराशा फक्त दुसऱ्याच्या सुखासाठी


सदोदित एकटा अन् हासरा संन्यस्त ही प्रतिमा

छुपी असते निराशा जीवघेणी मात्र सांगाती


प्रवासाला करावी नेहमी सुरुवात आशेने

निराशेच्या व आशेच्या पलिकडे पोचण्यासाठी 


- निलेश पंडित

६ जानेवारी २०२२

शनिवार, २२ मे, २०२१

सत्यम् अप्रियम्


भारतात कोविडची दुसरी लाट चालू आहे. संसर्ग आणि मृत्यू जगभर थैमान घालत आहेत. भारताचा गेली काही वर्षे वार्षिक मृत्यूदर प्रतिसहस्त्र  ७.३ च्या आसपास होता. म्हणजेच जवळपास सरासरी प्रतिदिन २७००० मृत्यू. सध्या कोविडचा मृत्यूदर प्रतिदिन जास्तीत जास्त ४००० च्या आसपास जाहीर होतोय. सत्तावीस अधिक चार एकतीस हजार ... हा मृत्यूदर उपलब्‍ध स्मशानं, कबरस्तानं, फ्यूनरल होम्ससाठी फार जास्त नाही. स्मशानं म्हणजे दररोज शंभर टक्के क्षमतेवर चालणारे कारखाने नव्हेत. कामात पंधरावीस टक्के वाढ सहज हाताळता यावी अशा ह्या जागा.


परंतू प्रत्यक्षात जर आंतरराष्ट्रीय बातम्या तपासल्या तर लक्षात येईल की अनेक स्मशानं, कबरस्तानं आता पुरेशी नाहीत ... बाहेर रांगा आहेत. शेकडो चिता मैदानांवर शेजारीशेजारी सामुहिक अंत्यविधीच्या रूपात जळतायत. Google वर overflowing crematoriums in India सर्च करून बातम्या वाचल्या तर चक्रावून जातो माणूस. निरनिराळया प्रांतांमधे नदीत शेकडो, हजारो शवं सोडून दिल्याच्या बातम्या फोटो-तपशीलांसकट छापलेल्या आढळतात. सगळेच एकाच वेळी खोटं बोलणार नाहीत कारण जागा, तारीख, संदर्भ, तपशील, बातमीचं कारण सगळे पैलू इतके वेगवेगळे अाहेत की त्यामधे संघटीत फसवणूक शक्य नाही हे स्पष्ट दिसतं.


ह्याचाच अर्थ मृत्यूदर अमाप वाढलाय पण तो कोविड ह्या सदरात नोंदवला जात नाहीये इतकंच. कोविडचं निदान होण्याआधीच मृत्यूचं प्रमाण गणती शक्य नाही इतकं वाढलेलं आहे असा निष्कर्ष काढण्यावाचून पर्याय नाही. अशा अचानक बेलगाम वाढीचं इतर काहीही कारण संभवतही नाही.  ह्याचाच अर्थ बेसुमार वाढ झालेला कोविड आता तपशीलाबाहेर गेलेला आहे. 


... मात्र हे लोकांना वाचायला, ऐकायला नको अाहे. न आवडणं स्वाभाविकच आहे. परिस्थिती दारुण व शोचनीय आहे, पण ती नाकारणं हा त्यावर उपाय नाही. तरीही ती नकळतच नाकारली जाते. सातत्याने नाकारली जाते.


खरंतर आशावाद म्हणजे सत्याकडे कानाडोळा करणं किंवा सत्य लपवणं नव्हे. किंबहुना आशावादावर सखोल संशोधन करणारे मार्टिन सेलिग्मन हा धोका नेमका दाखवून आशावाद्यांनी ही चूक टाळायला हवी ह्यावर भर देतात. प्रत्यक्षात मात्र आशावाद आणि सकारत्मकतेच्या नावावर बेदरकारपणा आणि बेफिकिरी नांदताना दिसत आहेत.


आताशा ह्या भाबड्या आशावादाचा, उत्क्रांत तर सोडाच, आदिम भावनांशीही फारकत घेणारा विद्रुप अवतार पाहिला की अतीव निराशा जन्माला येते. माणूस उत्क्रांत आहे, सतत क्रमाक्रमाने अधिकाधिक उत्क्रांत होतोय ह्यावरचा विश्वास अद्याप ढळलेला नसला तरी ह्या प्रगतीचा वेग मात्र आता निराशाजनक वाटतो.


तर्क, कल्पना आणि भावना ह्या त्रिकुटाचा स्वतःच्याही नकळत खुबीनं वापर करून माणूस अक्षरशः कुठल्याही विषयाचा स्वतःला हवा तसा अर्थ लावू शकतो. इतकंच नव्हे तर प्रसंगी अत्यंत ध्येयनिष्ठ माणूस स्वतःचे प्राण पणाला लावावेत किंवा इतर कुणाचा, अगदी निर्दोष, निष्पाप लोकांचाही जीव घ्यावा ह्या थराला जाऊ शकतो हे उघड आहेच. अत्यंत काटेकोर तर्कानुमान वापरू शकणारे कुटील लोक चाणाक्षपणे अशा ध्येयनिष्ठ लोकांचा वापर करतात हेही पुरेसं स्पष्ट आहे. परंतू पुन्हापुन्हा असे लोक बहुसंख्य वर्गांमध्ये, देशांमध्ये, सामाजिक स्तरांमध्ये, प्रदेशांमध्ये सद्वर्तनी, सुजाण, सच्च्या लोकांपेक्षा कितीतरी अधिक शक्तीशाली होत जातात हे चिंताजनक आहे.


"अति सर्वत्र वर्जयेत्" असं एक सुवचन आहे. इंग्रजीत ह्या सुवचनाच्या सर्वात जवळ जाणारं सुवचन कदाचित् everything in moderation हे असावं. तर्क, कल्पना आणि भावना ह्यांचा सुयोग्य परिपाक जिथे साधला जातो तिथेच विवेक जन्माला येतो असा विश्वास मला वाटतो. ह्यातील कोणताही एक पैलू अव्याजवीपणे सूज यावी तसा वाढत गेला तर सुडौल विवेकाची जागा बेडौल अतिरेक घेऊ लागतो.


भावनिकतेतून रुजणारी शेकडो ... कदाचित् हजारो ...  परस्परविरोधी मानवी मूल्ये हाताळताना हा विवेकच व्यक्तीसापेक्ष बदलत जावा हे मात्र दुर्दैव आहे. ह्याची उदाहरणं दैनंदिन आयुष्यातही विखुरलेली दिसतात. ती केवळ राजकारणात अथवा समाजकारणातच दिसतात असं नाही.


देश ही मानवाला वसवण्यासाठी जन्मलेली संकल्पना खरं तर. गेल्या उण्यापुर्‍या दिडदोनशे वर्षांत अधिकाधिक नावारूपाला येऊन महायुद्धांमुळे अधिकाधिक काटेकोर होत गेलेली. मूल्यं परस्परविरोधी असतात व चर्चा किंवा निव्वळ शाब्दिक देवाणघेवाणीतून वैचारिक - भावनिक बैठक बदलू शकत नाही त्यामुळे चर्चा व्यर्थ आहे हे आता पुरेसं स्पष्ट झालेलं आहे. काही जण देश लोकांसाठी मानतात तर काही लोक देशासाठी. पण मूल्यांचा अतिरेक इतका व्हावा की लोकांच्या जीवाचंही महत्व वाटू नये हे चिंताजनक आहे.


हे पाहिलं की "आधी सुराज्य नंतर स्वराज्य" हाच विचार योग्य होता अशी जाणीव प्रबळ होऊ लागते. इतकंच नव्हे तर कितीही कंटाळवाणा, सुमार व अनाकर्षक विचार भासला तरी आज पेरलेलं बीज आपण पाहू शकणार नाही अशा वृक्षाला जन्म देईल व त्याची फळं येणाऱ्या पिढ्यांना मिळतील हाच आशावाद केवळ आपण सर्व योग्य ते विवेकानं केल्यानंतर उराशी बाळगावा हा विश्वास मनात शिल्लक राहतो. 


पर्यायच काही उरला जेव्हा नसे

मी सहज नि सोपे ... काय करावे .... कसे ... ?

... हा प्रश्न पडे अन् कठीण उत्तर स्फुरे

“करण्याजोगे सोपे ना काही उरे!"


शतकाशतकांची घट्ट सनातन घडी

साकळली जिच्यात मूढ मती भाबडी

कणखर बुद्धीला करून टाके लुळी

मेंदूत भरे वर स्वप्नांची पोकळी!


जो युगायुगांचा गाळ इथे साचला

पाहिजे तसा तो सावकाश काढला

कोणात कधी मी देवदूत पाहणे

हे पुन्हा पुन्हा गाळात रुतत राहणे!


- निलेश पंडित 

२३ मे २०२१

शनिवार, २० डिसेंबर, २०१४

मंत्र

(वृत्त: वनहरिणी)

मनात माझ्या सुप्त अपेक्षा चमत्कृतींची सदैव उरते
बालपणापासून नेहमी कुठेतरी कोपऱ्यात मुरते
संकटकाळी अथवा दिसता पुढ्यात माझ्या दुर्मिळ संधी
प्रार्थनेत, श्रद्धेत डुंबते तर्कशुद्धता अर्धी मुर्धी

मनुष्यत्व शापात नांदते अज्ञानाच्या भले नेहमी
आत्मविकासाची त्याला परि खुबी लाभली आहे नामी
ढाल खुबीची हातामध्ये अज्ञाताची हृदयी भीती
अशा दुहेरी तजवीजीने लढत जात जगण्याची नीती

दैव प्रयत्नाची समिकरणे ठरती अगम्य नित्य परंतू
हरेक किरणाला आशेच्या लगडे अंधाराचा किंतू
धडपडीत ह्या संतत आता गुपित स्पष्ट जाणवे आगळे
जुने जाउ द्या मरणालागुन मंतरलेले मंत्र वेगळे
…. …. मंतरलेले मंत्र वेगळे


- निलेश पंडित
२१ डिसेंबर २०१४

रविवार, २८ सप्टेंबर, २०१४

निशाणी


चला गाउया एकविसाव्या शतकाची गाणी
खरी नि खोटी वाजवून पाहू सारी नाणी ।। धृ ।।

विज्ञानाची कास धरूया
तर्काचा अवलंब करूया
अनुमानाची जाण ठेवुया
वैज्ञानिकतेची यशदायी स्मरुया नित्य कहाणी ।। १ ।।
…. चला गाउया …

पहा आपुल्या अवतीभवती
परिश्रमांची अमाप महती
संतत उज्ज्वल अमोल प्रगती
जिच्यात दिसते क्षणोक्षणी विज्ञानाचीच निशाणी ।। २ ।।

अज्ञाता अज्ञात म्हणावे
शरण कुणा त्यास्तव ना जावे
फसवणुकींचे बळी न व्हावे
नष्ट करुया हरेक अंधश्रद्धा जुनी पुराणी ।। ३ ।।


- निलेश पंडित
२८ सप्टेंबर २०१४

शनिवार, १६ ऑगस्ट, २०१४

बुरशी

(वृत्त: मंदाकिनी)

का ग्रासते, फोफावते भरलेपणाला पोकळी
अज्ञात अन् गूढासही आनंद का जातो बळी

ही कोणती बुरशी अशी स्थैर्यास ही जी लागते
पेरून भीती कायमी आयुष्य अवघे मागते

आंजारते, गोंजारते … मग वाढते अन् जाळते
देवत्व शोधायास नंतर हीनता चोखाळते

दुर्लक्षिते खडतर विवेकाची चिकित्सा नेहमी
निर्बुद्धतेशी जोडते सुख आणि शांतीची हमी

शरणागती ना मागता बुरशी कुणी काढेल का
अज्ञात अन् गूढासवेही स्थैर्य मग लाभेल का

- निलेश पंडित
१७ ऑगस्ट २०१४

शुक्रवार, २७ जून, २०१४

वस्ती

(वृत्त: लवंगलता)

सतत वाढत्या वस्तीमधली नित्याचीच सकाळ
कडकड हाडांमधून वाजे घामट तेच गुऱ्हाळ
गालावर शेंबुड सुकलेला वर अश्रुंचे डाग
गोणपाट पत्र्यांना येते पुन्हा नव्याने जाग

मलमूत्राचे ओढे त्यातच पेपर, प्लास्टिक, पाणी
खडखड लोकल शेजारी शौचालय आणिक न्हाणी
नाल्यावर नाहतात पोरे, खरूजलेली कुत्री
भडक चेहरा पुसून झोपे कुणी जागुनी रात्री

भीक मागण्या कोणी, कचरा कुणी उपसण्या निघते
कुणास प्यारी पाकिटमारी कुणी खोपडी विकते
ह्या सर्वांचा दोष हाच की आले जन्माला हे
जबाबदारी जगण्याची अन् ज्याची त्याची आहे

लोक थोर जे देती ह्यांना परंपरेची ग्वाही
पुन्हा पुन्हा सांगती 'संस्कृती यासम दुसरी नाही'
धर्म, पंथ, जातींची येथे रुजवित जाती महती
अन् मग महिमा इतिहासाचा मिळून सारे गाती


- निलेश पंडित
२८ जून २०१४

शुक्रवार, ११ ऑक्टोबर, २०१३

बंध


नाही विसरता येत
जबाबदारीचा बंध
सारे आहे अस्तित्वाशी
जोडलेले एकसंध

अल्पकाल स्वप्नावस्था
देई सौख्य आणि नशा
उधळावे का आयुष्य
अनिश्चित मार्गी अशा?

उपमांच्या मिश्रणाला
शब्द्सौन्दर्याची जोड
मोघम संदिग्ध बोल
सूज्ञतेशी काडीमोड

मना पडते भुरळ
अलौकिकतेची फार
तेव्हा परजतो मीच
विवेकाची शस्त्रे चार

परी त्यातही आताशा
जीव होतो अर्धामुर्धा
अंधश्रद्धा नष्ट होते
हीच ठरे अंधश्रद्धा !

नाही नाही नाही नाही …
नाही विसरता येत
अज्ञानाच्या खांद्यावर
दिसते बुद्धीचे प्रेत


- निलेश पंडित
११ ऑक्टोबर २०१३

शनिवार, २२ जून, २०१३

ऊर्मि

सारी रात्र …
भयाण भुयारातून
चिखला - दलदलीतून
मार्ग काढून
(कुणास ठाऊक कसला!)
झिजवली थकवली गात्रं

पोहोचलो - थिजलो
अंधारलेल्या निबीड अरण्यात
सांगत समजावत
सर्वांना, स्वतःला, अंतर्मनाला
जलचरांची वळवळ
पायांवरचे वळ
न सोसणारी कळ
या सर्वांतच वसतो
मार्ग निखळ निर्मळ

कुठूनशा आलेल्या
क्रूर कोणी
होतं नव्हतं ते लुटून
दोरखंडांनी बांधून
फेकलं मला बाहेर काढून
लख्ख प्रकाशात
… अनवधानानं

रात्र आता संपली आहे
दोरखंडही सैलावत आहेत
मोकळा श्वास
निरभ्र आकाश
…….
……. तरीही ही ऊर्मि का ……
परत जाण्याची
अंधारात …. भुयारात?


- निलेश पंडित
२२ जून २०१३

गुरुवार, २८ मार्च, २०१३

परमेश्वर

(वृत्त: लवंगलता)

माझ्यातून वजा करता "मी" केवळ तो उरतो
अंतर मंतरतो...त्याला मी परमेश्वर म्हणतो

सूर्य किरण होऊन सकाळी काया चेतवतो
भक्तीरस ओसंडत भैरव कानी रुणझुणतो
....उभ्या दिसाचे कोष्टक मांडुन कष्टवितो मजला....
ऊर्जा बनतो रक्ता घामा मधून सळसळतो

माध्यान्हीला पोटामध्ये वैश्वानर होतो
जिजीविषेचे जणू प्राथमिक कारण दर्शवतो
....रसरशीत रसना तृप्तीचे मोह चार देई....
पूर्णब्रह्म भासतो जसा मी कवळ वदनि घेतो

पोटासाठी घाम गाळण्या मज तो झगडवतो
दोन चार मग घोट नशेचे मंजूर हि करतो
....उफाळता सैतानी वृत्ती क्लेश चोख देई....
परिस्थिती बिघडवतो आणिक नतमस्तक करतो

संध्या समयी दिवस भराचा प्रकाश ओसरतो
डुगडुगत्या मानेला रस्ता अंतिम आढळतो
....यमपाशी ग्रासता वेदना...वाटाड्या होई....
त्याच्यावर सोपवता सारे मार्ग पार पडतो

अज्ञाताच्या नियोजनाचे माध्यम तो असतो
तर्क-चिकित्सा-अनुमानाचा पुरस्कार करतो
....अज्ञातच अन अज्ञाताचे मूर्त रूप होई....
वैज्ञानिकता विचारांत तो सदैव जागवतो

स्वस्वरुपाच्या कुरूपतेने कधी त्रस्त होतो
प्रामाणिक नास्तिकता माझी जपतो वाढवतो
...."मी-तो" अंतर टाकुन मग तो रमतो अद्वैती....
अन परमेश्वर माझ्या लेखी बाह्य जगी नुरतो !


- निलेश पंडित
२९ मार्च २०१३

मंगळवार, २६ मार्च, २०१३

दुकान

(वृत्त: हरिभगिनी)

या हो या...या सारे या...स्वप्नांच्या बाजारा या
स्वप्न विका अन् यश मिळवा - जमवा मग भक्कम माया

बाजाराच्या नियमांची जगावेगळी घडण इथे
कंत्राटाची गरज नसे, तर्काचेही स्थान थिटे

दुकानात येणा-याला नको "गि-हाइक"..."भक्त" म्हणा
गंडा बांधा अन झुकवा, तोडा त्याचा ताठ कणा

"स्वप्नांची पूर्ती होते...पुढल्या जन्मी" हे सांगा
लागतील तुमच्या दारी, तिष्ठत भ्रमणा-या रांगा

भाषेवरती जोर हवा, सात्विकतेची छबी हवी
सांगावी शिष्यांकरवी, दिव्यकथा मग नवी नवी

निश्चित उत्तर टाळत जा, प्रश्नावरती प्रश्न करा
आधाराला जाडासा, बगलेमध्ये ग्रंथ धरा

एकवटा सारी गात्रे, अन् गात्रांना फोल म्हणा
संपताच शस्त्रे काढा, क्रोधाचा फुत्कारफणा

युगा युगांची पेठ खरी, या धंद्या बरकत न्यारी
सहज यशाचा मार्ग भला, दंशच पेरू अंधारी !


- निलेश पंडित
४ ऑगस्ट २०१२

मंगळवार, ५ मार्च, २०१३

समाज

गर्व परंतू विवेक नाही..विचार नाही
समाज येथे बघेल पण बोलणार नाही

रक्त सांडते पाण्याच्या मोलाने येथे
रक्त शोषकां विरुद्ध पण तापणार नाही

पुराणकाळातील यशांचा वाचे पाढा
वर्तमान पण सूज्ञ पणे मापणार नाही

जेथे तेथे गहाण टाकुन टेके डोके
बदली त्याच्या काय मिळे मोजणार नाही

करीत जातो घोष यशाचा...स्वातंत्र्याचा
अंधपणाचे पाश कधी तोडणार नाही

परमेशाच्या अवतारांचे ऐके कीर्तन
राक्षस वाढीची सत्ये मानणार नाही

- निलेश पंडित
६ मार्च २०१३

शनिवार, १५ डिसेंबर, २०१२

विरोधाभास


काळ्या पांढ-याचा खेळ
त्यात उष्ण शीत मेळ
कुणा आजन्म दारिद्र्य
कुणा श्रीमंती निर्भेळ

कुठे घट्ट गाठ-साथ
दुष्काळाला भूकंपाची
क्रूर शक्तींना लाभते
खाण सोन्याची रुप्याची

सा-या सा-यात समान
विरोधाचा हा पदर
काय किमया रे तुझी !
द्वैती अद्वैत सुंदर !

रिझवतो मीच माझ्या
जरा मनाला माफक
आणि समाधाने गातो
देव दानव रूपक

समजावतो स्वतःला
सारे मिथ्या नि नश्वर
डोळयांसमोर अंधारी
मनी "ईश्वर...ईश्वर"


- निलेश पंडित
२१ नोव्हेंबर २०१२

सोमवार, १० डिसेंबर, २०१२

मखलाशी


माथ्यावर आकाश फुटावे
आम्हा नाही काही चिंता
केले ना तू मर्त्य अम्हाला?
घे दर्पोक्ती ऐकुन आता...

असे नसे की निर्भय झालो
अथवा झालो समर्थ आम्ही
कळले आता एक फक्त की
गूढा लोटांगणे निकामी

समोर आम्हा अनेक दिसती
तुला पूजिती परि तळमळती
बोटे मोडित नशिबाला मग
पूजेनंतर अश्रु ढाळती

म्हणून जाणुन घे मखलाशी
अम्हा मानवांना सुचलेली
आम्ही बनतो देव स्वघोषित
नाडाया जनता पिचलेली !


- निलेश पंडित
३१ ऑगस्ट २०१२

मंगळवार, २७ नोव्हेंबर, २०१२

गाथा


चालावे विज्ञानाचे बंड अखंड
जरि इतिहासाचे माजे स्तोम प्रचंड
प्रत्येक युगाचे अंतिम क्षण येतील
हिरव्याची पिवळी पानेही होतील

ती रुढी सतीची बंदच झाली अंती
अन् गेले मांत्रिक...गेल्या मंत्र विभूती
प्रगती-उत्क्रांती एकच अनुभव स्पष्ट
मानवी श्रमांची गाथा अत्युत्कृष्ट

हे तर्क, निरीक्षण, प्रत्यय अन् अनुमान
मानवास करती सुसज्ज आणि सुजाण
यांतून जगाचे अमर मंत्र सुचतील
हिरवाई पुढच्या पिढ्या पुढे नेतील

- निलेश पंडित
२८ नोव्हेंबर २०१२

शनिवार, २१ जुलै, २०१२

संस्कृती

संस्कृतीचे गोडवे हे
तेच ते सगळीकडे
वाघ कोणी, सिंह कोणी
बाकि सारी माकडे !

माहितीचे वय किती हे
पाहुनी मग ठरविती
योग्यता त्या माहितीची
बाकि सारे तोकडे !

केस ज्याचे शुभ्र त्याची
योग्यता मोठी ठरे
मार्ग त्याचे सरळ आणिक
बाकिच्यांचे वाकडे !

माणसांचे वर्ग पडती
धर्म अन् जाती किती
ऊब कोणा राजवाडी
कोण उघडा कुडकुडे !

हरघडी कोणी कलंदर
जगविती आशा तरी
पकडुनी सा-या समाजा
वळविती सूर्याकडे !

- निलेश पंडित
३० जून २०११

मंगळवार, ३ जुलै, २०१२

निर्णय

निर्णय

फार वर्षांपूर्वी गणपती बाप्पा दूध प्यायले
पण आजही...
मायक्रोवेव्ह मधील पाण्याने झाडं मरतात...
कांद्याचे उरलेले तुकडे विषारी होतात...
युनेस्को भारताचं राष्ट्रगीत सर्वोत्कृष्ट ठरवते...
व्हायरस ची साथ ज्ञानविध्वंस..संहार...करते...
कुठलेसे तीन हिरे भारतास सर्वाधिक श्रीमंत करतात...
Toilet seat खालील कोळी चावून अनेक माणसं मरतात...

...यांवर लोक विश्वास ठेवतात
बातम्या घोंगावतात
वादळं उठतात
Emails चे तर पहाड फुटतात

अखेरीस...
थोडी जाग येते
विरळाच...
पण कुठे संशोधनं होतात

सोयीची चिकित्सा पडताच मागे
तथाकथित चिकित्सकही बदलतात पवित्रा
चिकित्सा आणि तर्काचा आणणारे आव
आता म्हणतात..."योग्य...श्रद्धा आणि भाव""
...म्हणतात..."अयोग्य...चिकित्सा...संशोधनाचा प्रस्ताव"

कोणतीतरी अदृश्य मरगळ
तर्कानुमान मागे खेचते
कमकुवत...सोपी भावना
निराधार निर्णयास पोचते

निलेश पंडित
- १९ मे २०१२