हा ब्लॉग शोधा

गझल किंवा गझलेचा आकृतीबंध लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
गझल किंवा गझलेचा आकृतीबंध लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, २० सप्टेंबर, २०२५

दुरावा

 

हात शेवटच्या क्षणी कोणीतरी अलगद धरावा

संपता भर वेदनेचा चेहरा हसरा असावा 


जय पराजय भासले जे ते तसे नव्हते कधीही

झुंज ज्यांनी लावली त्यांचा असे तो फक्त कावा


परतते आली तशी ती भेटताना हासतेही

जीवघेणा वाटतो तक्रार नसल्याने दुरावा


पाहिल्या कित्येक मूर्त्या हार समया मेणबत्त्या

माणसासाठी कधी माणूस केवळ अवतरावा


राहतो स्थिर चेहरा अस्वस्थता नजरेत दिसते

सोडते ती चेहऱ्यावर नेहमी नकळत पुरावा


वाटले जे जे सुसंगत तो विरोधाभास होता 

राहिलो मी रोज धावत घ्यायला क्षणभर विसावा


- निलेश पंडित 

२१ सप्टेंबर २०२५

शनिवार, २९ मार्च, २०२५

अगोचर

 

संपणे अस्तित्व सर्वांचे भयंकर वाटते 

कल्पनेमधल्या भराऱ्या हेच उत्तर वाटते 


एकदोघांची खरी त्या नेत्रदीपक उन्नती 

वाढले पण बहुजनांपासून अंतर वाटते


भक्त रामाचा म्हणवतो देत आरोळी बडी

पाहता ते ध्यान त्याचे फक्त वानर वाटते


तेच ते असतात सगळे रूप केवळ बदलते

बोलणे प्रेषित महात्म्याचे अगोदर वाटते 


भासते वर जे सुवासिक दडविते दुर्गंध ते

वाहते साधेच पाणी स्वच्छ अत्तर वाटते


निर्मितीनंतर पुढे संहार अनपेक्षित घडे

माणसाला गवसलेलेही अगोचर वाटते


- निलेश पंडित 

३० मार्च २०२५


शुक्रवार, २८ मार्च, २०२५

हुलकावणी

 

मनापासून थोडे वेगळे वागायचे होते

मला माझ्या मनाचे सांगणे ऐकायचे होते


जरी मी चारचौघांसारखा होतो समाधानी

मला तू सोसलेले दुःखही सोसायचे होते


कधी जर भेटलो नसतोच तर झाले बरे असते

असो हे व्हायचे होते जसे ते व्हायचे होते


सदोदित येत वरचेवर पुन्हा स्वप्नात ती गेली  

तिला जाऊनही माझ्याकडे परतायचे होते 


मनाच्या मत्त वारूने उधळणे सोडले नाही

जरासे थांबणे अन् चालणे जमवायचे होते


दिली हुलकावणी प्रत्येक टप्प्यावर मला त्याने 

नशीबाला जणू काहीतरी सुचवायचे होते



- निलेश पंडित 

२९ मार्च २०२५

मंगळवार, ११ मार्च, २०२५

जथा

 

तुझी माझीच नाही हीच सर्वांची कथा आहे

जरासे वेगळे नसणेच सर्वांची व्यथा आहे


विलसतो चेहऱ्यावर नेहमी उत्साह सर्वांच्या 

तरीही आत लपलेली सदोदित भयकथा आहे


नद्या सर्वत्र आता वाहती श्रद्धा नि भक्तीच्या

इथे तर्काविवेकाचा घडाही पालथा आहे


शिखर गाठायला जातात तुरळक पालखीमधले

नशीबी सर्व भोयांच्या पुढेही पायथा आहे


विखुरलेलेच दिसती नेहमी सारे जथे येथे

तरी एकाच मार्गावर जथ्यांचाही जथा आहे


- निलेश पंडित

१२ मार्च २०२५

शुक्रवार, १४ फेब्रुवारी, २०२५

खंत


लाट येते आणि जाते दोन क्षण टिकतो ठसा

मी किनाऱ्यासारखा उरतो जसा होतो तसा


सूत्र असते एक केवळ सर्व जगण्याचे इथे

कष्ट दुःखातून सुख अन् आठवे मग अवदसा


जन्मभर ऐकून सर्वांचे सदोदित वागलो

समजले नाही कधी मी नेमका आहे कसा


गुंतलो नाही स्वताच्या वर्तुळाबाहेर मी

चूक झाली आतही गेलोच नाही फारसा


नेहमी कुरवाळली माझी कथा माझी व्यथा 

आज कळते शेवटी गेलो उगाळत कोळसा


मी मला बघतो असा की मी जणू नवखा कुणी

वाटते माझा मला उरला नसावा भरवसा 


बांधल्या कित्येक भिंती भोवती माझ्याच मी

लावणे राहून गेले पण कुठेही आरसा



- निलेश पंडित 

१५ फेब्रुवारी २०२५

गुरुवार, २३ जानेवारी, २०२५

आशय

संकटांचा करत बसतो नवनवा संचय पुन्हा

त्यात लिहिण्याला गवसतो आगळा आशय पुन्हा 


काळ सरतो जसजसा मीही तसा निर्ढावतो

काळही होतो नव्याने क्रूर अन् निर्दय पुन्हा


भरजरी असतो कधी हिणकस निपजतो क्षण कधी

रोज काळाचाच होतो नेहमी अपव्यय पुन्हा


हारतो लढतो तसा तो संपतो अंधारता

दिवस पुढचा उगवताना रुजवतो निश्चय पुन्हा 


जिंकण्यासाठी पुन्हा मी डाव संपवलास तू

कोणता आता पराजय आणि कुठला जय पुन्हा 


त्याच त्या असती लढाया सुष्टदुष्टांच्या इथे

तेचते कोट्यावधी धृतराष्ट्र अन् संजय पुन्हा 


प्राप्त झाले अर्थ आता निर्भयाला नवनवे

शेवटी होईल का कोणी खरा निर्भय पुन्हा?


- निलेश पंडित 

२४ जानेवारी २०२५

मंगळवार, १४ जानेवारी, २०२५

स्वर्ग

एक छंद फक्त त्यास कुशल ज्यात खास तो

एरवी रिकामटेकडा उदास भासतो


तो निघे जिथून पोचतो तिथेच शेवटी

दूर वाटतो प्रवास मात्र आसपास तो


क्षेत्र आपलेच थोर विश्व वाटते खरे

चिखल उथळ मात्र दिव्य स्वर्ग बेडकास तो


मिरवितो यशास आपल्या जुन्याच नेहमी

काम काय त्यापुढे विचारताच त्रासतो


कंठ फुटतसे समोर चार लोक ऐकता

शांततेत मात्र म्लान चेहरा भकास तो


पाहती दुरून लोक आणि दूर राहती

जाणती नजीक सर्व कार्यभाग नासतो


शेवटी कृती हरेक फक्त एक विकृती

मानतो विकास जो ठरे अखेर ऱ्हास तो


- निलेश पंडित 

१५ जानेवारी २०२५

शुक्रवार, १० जानेवारी, २०२५

तान

 

संयमाने वाढला सन्मानही

अन् जगाचे येत गेले भानही


तेवणारी ज्योत होतो फक्त मी

मात्र पेटवले अचानक रानही


फक्त जुळले सूर आधी नेमके

खुलत आपोआप गेली तानही


मी मरातब आणि वलये विसरलो

आपसुक मग विसरलो अपमानही


सर्व मोफत रोज वाया जातसे

का कुणी येथे करावे दानही!


शांत रात्री भुंकला तो एकटा

लाळ सुकता संपले अवसानही


न्यून हे तो दोष त्याचा समजतो

हास्य साधे समजतो अवमानही


परतले ते एकटे आले तसे

मग समर्थांचे परतले श्वानही


- निलेश पंडित 

११ जानेवारी २०२५

शनिवार, १४ डिसेंबर, २०२४

कौल


कुणी शब्दात सांगावे कशाला अन् कसे काही?

मनोमन भावनांची कास जर सोडायची नाही?


कधी मी हासतो वा राहतो केवळ तुझे ऐकत

तुझ्याशी वाद नसल्याचा तुझा का वाद, त्रागाही?


बदललो आजही नाही पटो वा ना पटो ओळख

विसरली फक्त तू आहेस काही आणि जागाही


पुन्हा भेटू कधीकाळी नव्याने ओळखी देऊ

तुझ्या माझ्याच वाटांनी पुन्हा शोधू दिशा दाही


अचानक थांबलो अर्ध्याच रस्त्यावर कुठे नकळत?

ठरवता आपले आपण अशी अस्वस्थता का ही?


यशामागे सदोदित धावलो आपण शरीराने

जरासा कौल वाटे आज घ्यावासा मनाचाही



- निलेश पंडित 

१५ डिसेंबर २०२४

सोमवार, ३० सप्टेंबर, २०२४

दुही

 


जसा मी एकटा असतो तसा त्यांच्यातही असतो

सदोदित कोणत्या ना कोणत्या कळपात आढळतो


मला अभिमान ज्याचा ते जगाला सांगतो सारे

खजिल व्हावे शरम वाटून तेथे वेड पांघरतो


मिसळतो नेहमी आवाज मीही घोषणांमध्ये

तरी स्पर्धेत माझे वेगळेपण चोख मी जपतो


मला जो वाटतो नेता मिळे त्यालाच बांधिलकी

धुळीला तो कधी मिळताच मी दुसऱ्याकडे वळतो


जसा गर्दीत मी असतो तशी डोक्यात माझ्या ती

मला ती फक्त वापरता तिला मी फक्त वापरतो


दुही अज्ञात आहे आत माझ्या खोल लपलेली

कधी माझ्यात मी वसतो कधी कळपात मी वसतो



- निलेश पंडित

१ अॅाक्टोबर २०२४

शनिवार, १५ जून, २०२४

आरसे

 

गायली जल्लोषगीते एकजूटीने कधी

भाबड्या कृश चेहऱ्यांवर स्मित झळकले छानसे

पेटल्या होत्या मशाली किर्र काळोखातही

सर्व ते विझले निखारे आणि उरले कोळसे


नेहमीचे बोलणे अन् हासणेही मोजके

भावना, संवेदना अन् शब्द चोख व नेमके

औषधेही शक्तिशाली ठेवणीतच ठेवणे

दीर्घ आयुर्मान पण जगणे न उरले फारसे


ओळखी, जवळीकही जाती तिथे जपतात ही

राहती गर्दीत अन् फोफावती गर्दीत ही

मात्र सारे भ्यायलेले गांजलेले मत्सरी

आपल्या समुहातही एकेकटी ही माणसे


पाहिल्या ज्या पायवाटा गर्द हिरव्या मी कधी

दिसतही नव्हते जिथे शोधूनही तेव्हा कुणी

डांबरी रस्ते तिथे अन् रुक्ष वर्दळही दिसे

आज दिसते सूज जेथे काल होते बाळसे


काय बोलावे कसे कोणास मी केव्हा कुठे

लोक आता ठरविती अज्ञात कोणी जन्मभर

चेहरे, आवाज, शब्द व भावना मुबलक तरी

सर्व भिंती … पाहिजे असतात जेथे आरसे



- निलेश पंडित

१६ जून २०२४

बुधवार, २४ एप्रिल, २०२४

नोंद

 

खूप प्रत्यक्षात जगलो स्वप्नही पाहून बघ

फक्त मर्यादा जरा स्वप्नात ओलांडून बघ


आजही बोलावतो क्षण टाळला जो नेहमी

टाळ वा टाळू नको पण एकदा जवळून बघ


उचलले पाऊल तू होतेस जाताना तुझे

आज मागे घेत क्षणभर ये पुन्हा येऊन बघ


नोंद तू केलीस अन् जपल्यासही साऱ्या व्यथा

शेवटी ती डायरी आता तुझी जाळून बघ


स्पष्ट दिसतो सर्व पाचोळाच उरलेला इथे

त्यातही काही सुगंधी पाकळ्या शोधून बघ


तोडणे नाते हिरीरीने नसे सोपे जसे

शक्य नसते सांधणे केवळ पुन्हा जोडून बघ


लोक गर्दीने इथे बघतात माझी दुर्दशा

वाटले अवघड तुला तर तू जरा आडून बघ


- निलेश पंडित

२५ एप्रिल २०२४

शनिवार, २८ ऑक्टोबर, २०२३

बेगमी

 

दैव गेले करत रोजच संकटांची बेगमी

संकटांनी त्या दिले जगण्यास कारण नेहमी


काल होतो आज आहे अन् उद्या मी वेगळा

शोधण्यातच जन्म गेला त्यात नक्की कोण मी


शब्द वापरण्यात वाकबगार झालो नेमके

रोज अंतर्मुख तरीही होत गेलो मात्र मी


पाहिली संधी जिथे मी कष्ट तेथे ओतले

अडथळे आयुष्य गेले देत खडतर कायमी


काय खोटे वा खरे ह्याची कशाला काळजी

भुरळ जी पाडून जाते तीच उत्तम बातमी


न्याय अन्यायात गुरफटलो सदोदित जन्मभर

विसरलो शक्ती यशाची नेहमी देते हमी



- निलेश पंडित

२९ अॅाक्टोबर २०२३

शुक्रवार, २२ सप्टेंबर, २०२३

विश्वास

 

कधी चिंता, कधी त्रागा, कधी हव्यास आहे

मला माझाच माझ्या वागण्याचा त्रास आहे


चपळ आहे तसा तो रोज आहे चालतोही

गवसणी घालतो काळास मी हा भास आहे


जरा अनवट वळण घेऊन माझे पाय थकले

असो रस्ता कसाही शेवटी संन्यास आहे


बिरुद मिरवून मी बदलूनही टाकीत गेलो

जणू निष्पर्ण वृक्षाच्या तळाशी रास आहे


उभा मी ठाम आहे एकटा आहे तरीही

बिगुल वाजेल सुटकेचाच हा विश्वास आहे



- निलेश पंडित

२३ सप्टेंबर २०२३

मंगळवार, ६ जून, २०२३

वाया

 

किती चालून आलो अन् किती चालायचे आहे

कमी मोजायचे असते अधिक सोसायचे आहे


धुवट वहिवाट दुनियेची पुरेशी रोज अनुभवली

जरा मर्जीप्रमाणे आपल्या वागायचे आहे


जशी स्वप्ने पुरी जगण्यातली होतात आताशा

तसे काहीतरी नंतर समजते व्हायचे आहे


सदोदित मौन मी जोपासले कित्येक वर्षांचे

कसे वायाच जाते ते इथे सांगायचे आहे


इथे दिसताच सगळे सूज्ञ मी भांबावतो आता

कुणी बोलायचे आहे ... कुणी ऐकायचे आहे?


जसे चालायला शिकलो तसा मी राहिलो चालत

विसरलो भान मी केव्हातरी परतायचे आहे



- निलेश पंडित

७ जून २०२३

शुक्रवार, १७ मार्च, २०२३

दिव्य

 

दिव्य नाही ज्यात काही तेच जगणे दिव्य ठरले

कैक वर्षे कैक महिने फक्त अवतरले व सरले


मोहिनी कित्येक स्वप्नांचीच सत्यावर पसरली

देह दु:खाशी झगडला, मन नशेवर रोज तरले


वाटले जगण्यात माझ्या तथ्य थोडे आढळावे

पथ्य तथ्याचेच जडले आणि हे जगणे बिथरले


फक्त गेला तो विचारत प्रश्न अवघड रोज त्यांना

संपल्यावर उत्तरे ते थेट धमकीवर उतरले


वाटली केव्हा कुणाला फक्त अनुकंपा कुणाची?

थोडका थरकाप, नंतर हायसे, नंतर विसरले



- निलेश पंडित

१८ मार्च २०२३


रविवार, ६ फेब्रुवारी, २०२२

इरादा

 

इरादा मी इथे घेऊन आलो फक्त वसतीचा

कधी झाला सुरू कळलेच नाही मार्ग परतीचा


कधीही अन् कुठेही पाहिजे स्पर्धा इथे आता

कुणाचे पाय खाली खेचणे हा मार्ग बढतीचा


असावी वाढली येथे गरीबी आणि बेकारी

पुन्हा फतवा इथे आहे निघाला सैन्यभरतीचा


मने काबीज पूर्वापार केली सर्व नेत्यांनी

विसर पडला प्रजेला मात्र अतिसामान्य कुवतीचा


सदोदित लाभले परके व नंतर आपले सारे

कधी संपेल का हा शोषणाचा खेळ नियतीचा!


- निलेश पंडित

७ फेब्रुवारी २०२२


बुधवार, ५ जानेवारी, २०२२

सांगाती

 

नशा आशेत वसताना टिके आशा नशेपोटी

अशा आयुष्यभर बसतात अन् टिकतात निरगाठी


कधी छळछावणीच्या यातनेमध्ये टिके आशा

कुणाला थोडके अपयश पुरतसे शेवटासाठी


भले पुरती करे फसगत तरी उरते खुळी आशा

कितीही भंगली स्वप्ने तरीही झिंगण्यासाठी


कुणाला फक्त दुसऱ्याच्या निराशेची असे आशा

कुणी लपवी निराशा फक्त दुसऱ्याच्या सुखासाठी


सदोदित एकटा अन् हासरा संन्यस्त ही प्रतिमा

छुपी असते निराशा जीवघेणी मात्र सांगाती


प्रवासाला करावी नेहमी सुरुवात आशेने

निराशेच्या व आशेच्या पलिकडे पोचण्यासाठी 


- निलेश पंडित

६ जानेवारी २०२२

शनिवार, ४ सप्टेंबर, २०२१

काफिले

 

बेगडी सौख्यात सारे माणसांचे काफिले

थोडके गेले पुढे, बहुतेक मागे राहिले


वाटती मोठेपणाची वर्णने सगळी खरी

जन्म ह्यावर काढणारे मूढ लाखो पाहिले


गर्जले ते बरसले नाहीत केव्हाही कुणी

नेहमी सर्वस्व त्यांना मात्र आम्ही वाहिले


घोषणा त्याची असे आता घराणी संपवा

घोषणा त्याची विसरली नेमकी त्याची पिले


झाकला कोणीतरी त्याच्यातला कोल्हा जरा

माणसांनी नेहमी मग देवपण त्याला दिले


धाडसी जाहीर केल्या योजना त्यांनी नव्या

बेत फसल्याचे जुने तपशील सारे लपविले


ठेवतो मन तो म्हणे त्याचे खुले भक्तीतही

आंधळा करतो जणू निर्जीव डोळे किलकिले



- निलेश पंडित

५ सप्टेंबर २०२१

शनिवार, ३ जुलै, २०२१

स्थान

 

वेळ तर येणार आहे, वेदनाही अटळ आहे

त्यात मोठे गूढ असते दूर ती की जवळ आहे!


जगत जाणे भाग आहे कारणे नसताच कुठली

थांबणे केव्हातरी इतकेच कारण सबळ आहे


भेडसावत रोज जातो मार्ग खडतर चालताना

संपता यात्रा पुढे अज्ञातसा पण सरळ आहे


लाघवी तो हासतो हळुवार साधे बोलतोही

मात्र नंतर समजते ह्रदयात त्याच्या गरळ आहे


वाटते तर्कानुमानानेच केवळ बोलतो तो

पण मुळाशी कल्पनेची भावनेवर भुरळ आहे


शोध गूढाचाच आम्हीही सदोदित घेत जातो

संशयाचे स्थान शोधाच्या मुळाशी अढळ आहे


- निलेश पंडित

४ जुलै २०२१