हा ब्लॉग शोधा

निराशा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
निराशा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, १८ जुलै, २०२५

क्लेश

 

मागे वळून पाहताना 

एखाद्या शिलालेखाप्रमाणे

अजरामर झालेले

आयुष्यातले 

आयुष्याला पुरून उरणारे

जीवघेणे क्रूर 

त्या वेळचे वेदनामय क्षण

होत जातात किंचित् अस्पष्ट 

टिकूनही खोल

दृढावून निबरलेले


वेदना संपली

तरी न जाणारे व्रण

धुळीने माखून होतात 

दृश्य राहूनही निर्जीव


वेदनेवर जिरेटोप चढवून

हारतुरे घालून

गोंजारून

तिचं प्रदर्शन करण्याचा काळ

जातो सरत

समुद्रकिनाऱ्यावरच्या

हातातून झरत निसटत जाणाऱ्या 

वाळूप्रमाणे


तसंच काहीसं अनुभवत 

उभा आहे मी एकटा

क्षितिजाच्या दिशेने

मावळत्या सूर्याकडे 

पहात


क्षणिक आशेने

येणाऱ्या जाणाऱ्या 

तुरळक होड्यांकडे बघत

आशाळभूत नजरेने


ढगांनी न आच्छादलेला

असा मावळता सूर्य 

बघत राहणं

असतं केवळ क्लेशकारक



- निलेश पंडित 

१९ जुलै २०२५

शनिवार, २९ मार्च, २०२५

अगोचर

 

संपणे अस्तित्व सर्वांचे भयंकर वाटते 

कल्पनेमधल्या भराऱ्या हेच उत्तर वाटते 


एकदोघांची खरी त्या नेत्रदीपक उन्नती 

वाढले पण बहुजनांपासून अंतर वाटते


भक्त रामाचा म्हणवतो देत आरोळी बडी

पाहता ते ध्यान त्याचे फक्त वानर वाटते


तेच ते असतात सगळे रूप केवळ बदलते

बोलणे प्रेषित महात्म्याचे अगोदर वाटते 


भासते वर जे सुवासिक दडविते दुर्गंध ते

वाहते साधेच पाणी स्वच्छ अत्तर वाटते


निर्मितीनंतर पुढे संहार अनपेक्षित घडे

माणसाला गवसलेलेही अगोचर वाटते


- निलेश पंडित 

३० मार्च २०२५


शुक्रवार, ९ ऑगस्ट, २०२४

अंत

 

मन घालत बसले रुंजी … असते असेच का हे

रेशमी क्षणांची भुरळ पडावी

लखलखत्या तेजाने आयुष्याच्या जावे मग दिपून कोणी

आणि भ्रमंती संपत यावी!


कोवळेपणाला निबरपणाची झालर जडता

जाते दडून कोमलता सारी

स्मित हास्य मावळे छद्मी घेते जागा त्याची क्रमाक्रमाने

अमृत बनते सुरा विखारी


लागते आस मग खास दिसे जेथे काही ते

मिळवून आपले माझे माझे … 

अन् केवळ माझे … म्हणत मनाशी अट्टाहासाने जपण्याची

लिप्तपणाचे … अवजड ओझे

………..


सुटताच हात एका क्षणात उमटली वेदना

जग धूसरले चेहरा उजळला 

पांगले सर्व थकलेले झाला अंत प्रतिक्षा ज्याची होती

जीव संपला … खर्च संपला!


- निलेश पंडित

९ ॲागस्ट २०२४

शुक्रवार, ८ डिसेंबर, २०२३

भयभीत

 

भरती ओहोटीचे आभास

सतत अव्याहत

सरत जाणारा काळ

येणारा एकेक क्षण

बाजूला सारत

जुने क्षण

मनोमन विसरत जाणारी तू

अचानक एका क्षणी विरलीस

तरी उरलीस

तुझ्या आवडत्या

तू चितारलेल्या

जास्वंदीच्या फुलात

तुझ्या आवडत्या

नादावलेल्या सनईच्या सुरात

आणि तुला खळखळून हसवणाऱ्या

आणि तुझ्या भ्रमिष्टावस्थेतल्या

तोडक्यामोडक्या भाषेत

दाद मिळवणाऱ्या

पु लंच्या सखाराम गटणेतही


ह्या सर्वांचा एक

उसवलेला जुनाट बटवा

कसाबसा 

माझ्या बोजड सामानात सांभाळत

मी क्षण दिवस मास मोजतोय

अंतर्मनात भयभीत होऊन

… मी तर उरण्याचीही 

शक्यता आधीच विरलीय!



- निलेश पंडित

९ डिसेंबर २०२३


बुधवार, २८ डिसेंबर, २०२२

वास्तू

 

स्वच्छ व सुंदर रंगविलेल्या भिंती

तलम व ताजी हिरवळ अवतीभवती

... रांगोळी रेखीव छान द्वाराशी

कणभर हळदी, कुंकू तिजवर सजती


अहोरात्र कसलीशी वर्दळ असते

मंदसुगंधी अत्तर हवेत तरते

... टाळ नि टाळ्यांचा रव पडतो कानी

गूढ अनामिक माया मोहित करते


सुखशांती समृद्धी शुचिता भक्ती 

पवित्र मंगल पुण्य मोक्ष वा मुक्ती

... रेलचेल शब्दांची मौलिक साऱ्या

अगतिकतेला शक्तीची आसक्ती


युगेयुगे ह्या वास्तूची ही महती

आत जरी किंकाळ्या दबती विरती



- निलेश पंडित

२९ डिसेंबर २०२२


शनिवार, १९ नोव्हेंबर, २०२२

उपाधी

 

शब्दार्थांचे अनेक फसवे वर डोलारे

निष्फळ स्वप्नांचे अगणित त्यांतच कंगोरे

... आत दडविते सत्य नेहमी खोल खोलवर

सत्यस्थितीवर दृश्य स्थितीचे वेष्टन न्यारे


हिंदू, मुस्लिम, बौद्ध व ख्रिश्चन ... आणि इतरही

भूक, जीव, उत्पत्ती तशीच ... आणि अस्तही

... आभासाखाली दडणारी दशा विदारक

त्यात अहिंसा असे ... म्हणे ... दिसते हिंसाही


मूढ जिवांना भूल पडतसे सत्यांशाची

नवीनवी लाभताच वस्त्रे वर संज्ञांची

... विकासपत्रे, हरिजन, भूषण आणि अस्मिता

जमीन माता, तसा देशही ... कथा युगांची


पंगू जग वापरते कुबडी अशा कथांची

अशीच आम्हा दिली उपाधी दिव्यांगांची



- निलेश पंडित

२० नोव्हेंबर २०२२


मंगळवार, ६ सप्टेंबर, २०२२

सत्य

 अदृश्य व दृढ

संस्कृतीचे रूप

सुप्त जाणिवेत

वसते अप्रूप


स्पीड लाइट हे

उल्लेख होतात

एनर्जी तात्काळ

येतसे मनात


गाॅडही आताशा

एक पार्टिकल

संज्ञेत दडते

मनाची उकल


प्रकाश नि गती

तेज व सद्गती

रुपे नकळत

अकस्मात होती


भाषेतून झरे

वृत्ती आपोआप

नव्यांच्या रक्तात

जुन्यांचेही पाप


वाटे जी उकल

तेच खरे कोडे

असहाय्य सत्य

असत्यात दडे


- निलेश पंडित

६ सप्टेंबर २०२२


गुरुवार, ४ ऑगस्ट, २०२२

जीर्ण

 

कोणती कुठे ही कशी चालते वारी

उजळून चेहरा आत जीर्ण आजारी

... कायेस शुष्क ग्रासते झिंग स्वप्नांची

तजवीज मोक्ष चारी मिळण्याची न्यारी


क्षणकाल थबकतो तिष्ठत पिंडापाशी

व्याकूळ भुकेला अगतिक त्रस्त अधाशी

... कावळा जाणतो भले बुरे जगताना

मानव घसरे भूवर बघता आकाशी


लाभली अपरिमित जरी कल्पनाशक्ती

निर्मिती तशी संहाराचीही वृत्ती

... भरघोस देत नियती जोखतसे पाणी

संस्कृती विकृती मधली अथांग व्याप्ती


ही निसर्गनिर्मित विचित्र जादू सारी

मूढता दडे सुज्ञतेत दाट विषारी



- निलेश पंडित

४ आॅगस्ट २०२२

गुरुवार, २४ मार्च, २०२२

राख

 

आपले आपण | रुजविता स्वप्न

त्यात होई मग्न | अंतर्मन ||


विश्वास आधार  |  विश्वास आचार

विश्वासाचा भार | सर्वथैव ||


शब्द शोधू जाता  |  कैक गवसती

शब्द फोफावती  |  अमर्याद ||


अदृश्य तरीही  |  मजबूत पाया

अन्य तर्क वाया  |  अर्थाअर्थी  ||


भावना भिजते  |  भावना रुजते

भावना थिजते  |  खोलवर ||


मात्र जाणवे ना | भावनेचा पाया

तर्क भ्रमवाया |  सिद्ध नित्य ||


शब्दाच्या जादूची | तर्कास झालर

युक्तिवाद थोर |  भासे सत्य ||


स्वतास स्वताचे  |  मन उमगेना

त्यात शब्द नाना  |  धुमसती ||


दडलेले हिंस्त्र  |  श्वापद जिवात

दबकत आत  |  वावरते ||


चाणाक्ष चतुर | राहतात धूर्त

फक्त निरखत | इतरांस ||


निरखूनी सारी  |  अदृश्य श्वापदे

एक एक प्यादे  |  हालविती ||


शब्दांच्या ठिणग्या | शब्दांचे इंधन

वेळीच टाकून | पेटविती ||


समाज घडती | समाज सडती

समाज जळती | यथाकाल ||


राख राखेवर | थरावर थर

दाह निरंतर | चालतोच ||


कुणीही काहीही | स्वप्न रुजविणे

इतकेच लेणे | जगण्याला ||



- निलेश पंडित

२४ मार्च २०२२


बुधवार, ५ जानेवारी, २०२२

सांगाती

 

नशा आशेत वसताना टिके आशा नशेपोटी

अशा आयुष्यभर बसतात अन् टिकतात निरगाठी


कधी छळछावणीच्या यातनेमध्ये टिके आशा

कुणाला थोडके अपयश पुरतसे शेवटासाठी


भले पुरती करे फसगत तरी उरते खुळी आशा

कितीही भंगली स्वप्ने तरीही झिंगण्यासाठी


कुणाला फक्त दुसऱ्याच्या निराशेची असे आशा

कुणी लपवी निराशा फक्त दुसऱ्याच्या सुखासाठी


सदोदित एकटा अन् हासरा संन्यस्त ही प्रतिमा

छुपी असते निराशा जीवघेणी मात्र सांगाती


प्रवासाला करावी नेहमी सुरुवात आशेने

निराशेच्या व आशेच्या पलिकडे पोचण्यासाठी 


- निलेश पंडित

६ जानेवारी २०२२

शनिवार, ३० ऑक्टोबर, २०२१

कैफ

 

शक्तीच नव्हे तर युक्तीही 

सतत वाढवत

त्याने कधी कातला कापूस

कधी लोंबकळण्यासाठी

वापरल्या पारंब्या 

कधी मुळांपासून तोडले वृक्ष

कधी जेवण्यासाठी केल्या पत्रावळी

तर कधी रचली

माणसांच्या चितांसाठी

लाकडांचीही चिता


तंतू तंतू एकत्र करून

भरड्या मजबूत

दोरखंडाचा मुबलक वाढीव वापर

रांगड्या आदिम वातावरणात

काहीही कसंही बांधण्यासाठी

करत राहिल्याने

त्याचा वाढत राहिला विश्वास

एकत्रीकरणाच्या क्षमतेवरचा


कधी माणसांना एकत्र करून

मारली जनावरं

कधी जनावरांचे तांडे, समूह, दळं

करून मारली माणसं.


... जसजसा ओसरला

शक्तीचा कैफ

तसतशी जागी होऊ लागली

अमर्याद जाणीव.


एकत्रीकरणाच्या आभासापोटी

त्याने साधलं होतं

युगानुयुगे

फक्त विघटन

आणि

स्वतःला अजेय समजत

तो झाला होता

सपशेल पराभूत



- निलेश पंडित

३१ आॅक्टोबर २०२१


गुरुवार, २२ जुलै, २०२१

चलती

 

कवचांवर कवचे अशी योजना ज्याची

पाठीस पाठ लावून सज्ज योद्ध्यांची

... तो चक्रव्यूह भेदणे न जमते विकलां

एकेकच जागा प्रवेशास टोकांची


विस्तार अकल्पित कैक योजने ह्याचा

वर्तुळाकृती अन् भरीव आकाराचा

... भीतीदायक, घनदाट, गूढ, विस्तीर्ण

बाह्यांगी लागे ठावही न केंद्राचा


रचती हा व्यूह असा जे व्यूहासम ते

चतुराई, शौर्य व शक्ती ठायी वसते

... अद्वितीय अनुभव दीर्घ त्यांस जोडीला

आचार्य प्रमुख ते ... त्यांना बंधन नसते


व्यूहांची ह्या दुनियेत आजही चलती

दुर्भाग्य ... त्यात सुकुमारच अजून मरती


- निलेश पंडित

२३ जुलै २०२१


शनिवार, २२ मे, २०२१

सत्यम् अप्रियम्


भारतात कोविडची दुसरी लाट चालू आहे. संसर्ग आणि मृत्यू जगभर थैमान घालत आहेत. भारताचा गेली काही वर्षे वार्षिक मृत्यूदर प्रतिसहस्त्र  ७.३ च्या आसपास होता. म्हणजेच जवळपास सरासरी प्रतिदिन २७००० मृत्यू. सध्या कोविडचा मृत्यूदर प्रतिदिन जास्तीत जास्त ४००० च्या आसपास जाहीर होतोय. सत्तावीस अधिक चार एकतीस हजार ... हा मृत्यूदर उपलब्‍ध स्मशानं, कबरस्तानं, फ्यूनरल होम्ससाठी फार जास्त नाही. स्मशानं म्हणजे दररोज शंभर टक्के क्षमतेवर चालणारे कारखाने नव्हेत. कामात पंधरावीस टक्के वाढ सहज हाताळता यावी अशा ह्या जागा.


परंतू प्रत्यक्षात जर आंतरराष्ट्रीय बातम्या तपासल्या तर लक्षात येईल की अनेक स्मशानं, कबरस्तानं आता पुरेशी नाहीत ... बाहेर रांगा आहेत. शेकडो चिता मैदानांवर शेजारीशेजारी सामुहिक अंत्यविधीच्या रूपात जळतायत. Google वर overflowing crematoriums in India सर्च करून बातम्या वाचल्या तर चक्रावून जातो माणूस. निरनिराळया प्रांतांमधे नदीत शेकडो, हजारो शवं सोडून दिल्याच्या बातम्या फोटो-तपशीलांसकट छापलेल्या आढळतात. सगळेच एकाच वेळी खोटं बोलणार नाहीत कारण जागा, तारीख, संदर्भ, तपशील, बातमीचं कारण सगळे पैलू इतके वेगवेगळे अाहेत की त्यामधे संघटीत फसवणूक शक्य नाही हे स्पष्ट दिसतं.


ह्याचाच अर्थ मृत्यूदर अमाप वाढलाय पण तो कोविड ह्या सदरात नोंदवला जात नाहीये इतकंच. कोविडचं निदान होण्याआधीच मृत्यूचं प्रमाण गणती शक्य नाही इतकं वाढलेलं आहे असा निष्कर्ष काढण्यावाचून पर्याय नाही. अशा अचानक बेलगाम वाढीचं इतर काहीही कारण संभवतही नाही.  ह्याचाच अर्थ बेसुमार वाढ झालेला कोविड आता तपशीलाबाहेर गेलेला आहे. 


... मात्र हे लोकांना वाचायला, ऐकायला नको अाहे. न आवडणं स्वाभाविकच आहे. परिस्थिती दारुण व शोचनीय आहे, पण ती नाकारणं हा त्यावर उपाय नाही. तरीही ती नकळतच नाकारली जाते. सातत्याने नाकारली जाते.


खरंतर आशावाद म्हणजे सत्याकडे कानाडोळा करणं किंवा सत्य लपवणं नव्हे. किंबहुना आशावादावर सखोल संशोधन करणारे मार्टिन सेलिग्मन हा धोका नेमका दाखवून आशावाद्यांनी ही चूक टाळायला हवी ह्यावर भर देतात. प्रत्यक्षात मात्र आशावाद आणि सकारत्मकतेच्या नावावर बेदरकारपणा आणि बेफिकिरी नांदताना दिसत आहेत.


आताशा ह्या भाबड्या आशावादाचा, उत्क्रांत तर सोडाच, आदिम भावनांशीही फारकत घेणारा विद्रुप अवतार पाहिला की अतीव निराशा जन्माला येते. माणूस उत्क्रांत आहे, सतत क्रमाक्रमाने अधिकाधिक उत्क्रांत होतोय ह्यावरचा विश्वास अद्याप ढळलेला नसला तरी ह्या प्रगतीचा वेग मात्र आता निराशाजनक वाटतो.


तर्क, कल्पना आणि भावना ह्या त्रिकुटाचा स्वतःच्याही नकळत खुबीनं वापर करून माणूस अक्षरशः कुठल्याही विषयाचा स्वतःला हवा तसा अर्थ लावू शकतो. इतकंच नव्हे तर प्रसंगी अत्यंत ध्येयनिष्ठ माणूस स्वतःचे प्राण पणाला लावावेत किंवा इतर कुणाचा, अगदी निर्दोष, निष्पाप लोकांचाही जीव घ्यावा ह्या थराला जाऊ शकतो हे उघड आहेच. अत्यंत काटेकोर तर्कानुमान वापरू शकणारे कुटील लोक चाणाक्षपणे अशा ध्येयनिष्ठ लोकांचा वापर करतात हेही पुरेसं स्पष्ट आहे. परंतू पुन्हापुन्हा असे लोक बहुसंख्य वर्गांमध्ये, देशांमध्ये, सामाजिक स्तरांमध्ये, प्रदेशांमध्ये सद्वर्तनी, सुजाण, सच्च्या लोकांपेक्षा कितीतरी अधिक शक्तीशाली होत जातात हे चिंताजनक आहे.


"अति सर्वत्र वर्जयेत्" असं एक सुवचन आहे. इंग्रजीत ह्या सुवचनाच्या सर्वात जवळ जाणारं सुवचन कदाचित् everything in moderation हे असावं. तर्क, कल्पना आणि भावना ह्यांचा सुयोग्य परिपाक जिथे साधला जातो तिथेच विवेक जन्माला येतो असा विश्वास मला वाटतो. ह्यातील कोणताही एक पैलू अव्याजवीपणे सूज यावी तसा वाढत गेला तर सुडौल विवेकाची जागा बेडौल अतिरेक घेऊ लागतो.


भावनिकतेतून रुजणारी शेकडो ... कदाचित् हजारो ...  परस्परविरोधी मानवी मूल्ये हाताळताना हा विवेकच व्यक्तीसापेक्ष बदलत जावा हे मात्र दुर्दैव आहे. ह्याची उदाहरणं दैनंदिन आयुष्यातही विखुरलेली दिसतात. ती केवळ राजकारणात अथवा समाजकारणातच दिसतात असं नाही.


देश ही मानवाला वसवण्यासाठी जन्मलेली संकल्पना खरं तर. गेल्या उण्यापुर्‍या दिडदोनशे वर्षांत अधिकाधिक नावारूपाला येऊन महायुद्धांमुळे अधिकाधिक काटेकोर होत गेलेली. मूल्यं परस्परविरोधी असतात व चर्चा किंवा निव्वळ शाब्दिक देवाणघेवाणीतून वैचारिक - भावनिक बैठक बदलू शकत नाही त्यामुळे चर्चा व्यर्थ आहे हे आता पुरेसं स्पष्ट झालेलं आहे. काही जण देश लोकांसाठी मानतात तर काही लोक देशासाठी. पण मूल्यांचा अतिरेक इतका व्हावा की लोकांच्या जीवाचंही महत्व वाटू नये हे चिंताजनक आहे.


हे पाहिलं की "आधी सुराज्य नंतर स्वराज्य" हाच विचार योग्य होता अशी जाणीव प्रबळ होऊ लागते. इतकंच नव्हे तर कितीही कंटाळवाणा, सुमार व अनाकर्षक विचार भासला तरी आज पेरलेलं बीज आपण पाहू शकणार नाही अशा वृक्षाला जन्म देईल व त्याची फळं येणाऱ्या पिढ्यांना मिळतील हाच आशावाद केवळ आपण सर्व योग्य ते विवेकानं केल्यानंतर उराशी बाळगावा हा विश्वास मनात शिल्लक राहतो. 


पर्यायच काही उरला जेव्हा नसे

मी सहज नि सोपे ... काय करावे .... कसे ... ?

... हा प्रश्न पडे अन् कठीण उत्तर स्फुरे

“करण्याजोगे सोपे ना काही उरे!"


शतकाशतकांची घट्ट सनातन घडी

साकळली जिच्यात मूढ मती भाबडी

कणखर बुद्धीला करून टाके लुळी

मेंदूत भरे वर स्वप्नांची पोकळी!


जो युगायुगांचा गाळ इथे साचला

पाहिजे तसा तो सावकाश काढला

कोणात कधी मी देवदूत पाहणे

हे पुन्हा पुन्हा गाळात रुतत राहणे!


- निलेश पंडित 

२३ मे २०२१

शनिवार, ८ मे, २०२१

कांगावा

 


"शेवटी ह्यातूनही होईल काही चांगले"

जे कुणी निवडून आले हेच केवळ बोलले


सुष्टदुष्टातील आता फरक कळतो नेमका

देव ते जे मारती अन् दैत्य ते जे मारले


'सर्व कर्तव्ये प्रजेची' तत्व हे आहे नवे

वापरे अधिकार सारे मात्र सत्ता आपले


सर्व खटले चालले साऱ्याच बाजूंचे इथे

फक्त त्यांनी मोजके साक्षीपुरावे दाबले


सूत्र न्यायाचे प्रभावी, स्पष्ट असते नेहमी

कोणते बाहेरचे अन् कोण आहे आतले


टीचभर जे लोक त्यांना माज येतो सारखा

हाच कांगावा करत बहुसंख्य सारे माजले


- निलेश पंडित

९ मे २०२१


शनिवार, १ मे, २०२१

दग्धता

 

फक्त सोयिस्कर तिथे नेत्यास अपुल्या आठवा

चांगले होईल ते नावास त्याच्या चिकटवा

... रंगवा इतिहास इतका की जणू आदर्श तो

वेदनामय वर्तमानी स्वप्न पुढचे दाखवा


रूपकाचे आणि उपमेचे करावे खेळणे

आहुती निष्पाप जीवांची तिच्यास्तव टाकणे

... खूप मोठे देव-धर्मा आणि देशाला करा

सहज ठरते माणसांनी माणसांना मारणे


संकटे, संहार, लय नसती कधीही कायमी

चांगले काहीतरी घडते कुठेही नेहमी

... भोळसट कोणी खुळे पडता बळी सगळीकडे

सूज्ञ देती चिरसुखाची मूढ लोकांना हमी


भान ठेवा सूज्ञतेचे ह्या व सोसा दग्धता

भोवताली पाहताना पेटत्या लाखो चिता

...  होरपळ झाली तरी सोसेल ती पुढली पिढी

आपले द्या प्राण पण मखरात ठेवा देवता



- निलेश पंडित

२ मे २०२१


शनिवार, २४ एप्रिल, २०२१

अटळ


रातकिड्यांची किरकिर वाढली आहे ... होती
भवताल अधिकाधिक काळवंडत आहे ... होता
अंधार ग्रासणार आहे ... होताच
दृष्टीचा विभ्रम मनोमन टिकूनही
दृष्टोलोप होणारच आहे ... होताच
त्यात पावसाची रिपरिप
पायाखाली संतत ओल वाढवणारी

विनाकारणच
अंतर्मन तरीही सांगत राहिलं
दैदिप्यमान सूर्य
कोणत्याही पहाटरंगांविना
अवतरेल अचानक

शक्तीशाली अधिकारी पूज्य सारे 
दाखवतही राहिले
नवनवीन काही
... आणि राहिले म्हणत
हीच नवी रूपं सूर्याची
प्रकाशाचीही
... दिव्यचक्षू प्राप्त होताच
उमगतील

त्यात नवनवीन संशोधनात गवसली
खात्रीदायक हमी
आदिम भावनांचा गाभाच
उत्क्रांत नाजुक भावना
धस लावून
ठिसूळ करत राहण्याची

अंधार अधिक गडद 
उत्तररात्रीचा की मध्यरात्रीचा
ह्यावर चर्चा रंगत गेली
अधिकाधिक उत्तरोत्तर 

दीर्घकालीन बदल
अनुभूतीनंतरही अतर्क्य अविश्वसनीय
स्वप्नरंजनात
क्षणार्धात सदैव साक्षात्काराचा
हव्यास

असह्य वर्तमान
अनाकलनीय भवितव्य म्हणून
हव्या त्या ... तितक्याच 
भूतकाळाकडे बघण्याचा
अगम्य अट्टाहास

... ह्या भरीव अमर्याद पोकळीनंतर
होता काही ... असतो काही?
पर्याय?
दुसरा पर्यायच नाही
असं म्हणून वाचाळ
तथाकथित सुजाणांना
धाकदपटशानं मुस्कटदाबीनं
सतत गप्प करत राहण्यावाचून?

दुर्लक्षित संततधार पावसानं
पायाशी इतकी दलदल झाली होती एव्हाना 
... की आता निरुपयोगी, निष्फळच काय 
अशक्यही होत्या
गारगोटी, ठिणग्या, शेकोट्या, समया, पणत्या, वाती

थोर संस्कृतींना 
मानवत नाहीत
असे संकुचित पर्याय!



- निलेश पंडित
२४ एप्रिल २०२१

सोमवार, २८ डिसेंबर, २०२०

दुय्यम

 वृत्त: मदनरंग


नरमादी ठळक सत्य अन् तशीच संतती

मायबाप पुत्रपौत्र कल्पनेत उतरती

... दगड स्पष्ट नैसर्गिक कोरण्यास आयुधे

शिल्पकार त्यातूनच कल्पशिल्प कोरती


चितारता कल्पनाच सत्य बने चित्र ते

अंशरूप घेत कल्पना खऱ्यात मावते

... मानवी मनात बीजरूप फक्त जी असे

मानवास ... मग मनास ... मग जगास व्यापते


जग झाले गडद गूढ मिश्रण फोफावता

सत्यासत्यात फरक उमजेना मिसळता

... मानव दुय्यम झाला देश, धर्म माजले

भीतीचे साम्राज्य नि बुद्धीची सांगता


बुद्धीने सहज सुखद स्वप्ने जी प्रसवली

स्वप्नांनी त्याच तिची कबर थेट खोदली



- निलेश पंडित

२९ डिसेंबर २०२०


शनिवार, १९ डिसेंबर, २०२०

दलित

 

वसुधैव कुटुंबकम् म्हणून 

अवघी पृथ्वीच परिवार मानणारी,

अहिंसा परमो धर्म:

अर्थात् अहिंसा हाच सर्वश्रेष्ठ धर्म 

अशी धारणा जपणारी, 

सत्यमेव जयते 

हे राष्ट्रीय आदर्श वाक्य 

जिच्यासाठी शिरोधार्य आहे ती, 

वाचिक, मौखिक तपाने 

वैचारिक औदात्त्य 

युगानुयुगे अखंड टिकवणारी 

प्राचीन व्यवस्था 

केवळ परिस्थितीत 

काहीही कधीच 

दीर्घकाल स्थैर्याने वा शाश्वतीने

न उतरल्यामुळे 

पौराणिक प्रतिमांमध्ये 

कोणत्याच वर्णामध्ये 

न गणल्या गेलेल्या 

व आजही बहुतांश 

दारिद्र्यात दबल्या पिचलेल्या 

वर्गाला 

नवयुगातील 

लोकशाहीत 

दुर्लक्षित कशी ठेवेल?


हा तर विवेकशून्यत्वाचा मासलाच


सर्व वंचनांमध्ये सर्वाधिक भेसूर 

आर्थिक असून 

कुणी कधी लिहिलंच तर 

विषमता निर्मूलनाच्या नाटकाचा 

सर्वांत मोठा अंक 

दारिद्र्यनिर्मूलनाचा असेल 

( ... आणि मोजावी लागेल 

कितीतरी अधिक किंमत

कर्तव्यभावनेनं ...)

हे न समजून 

सर्वांगीण उत्थानासाठी 

केवळ आर्थिक निकषाच्या 

उथळ वल्गनांचा 

निरर्थक पोकळ घोष 

करणाऱ्या समाजाच्या  

ह्या पायाभूत तथाकथित संस्कृतीत 

प्रत्येक वर्गातील 

प्रत्येक व्यक्तीचं 

अनन्यसाधारण एकमेवाद्वितीय 

महत्त्व जाणून व मान्य करून 

आजही त्यांना 

दिला जातोच मान 

- न्याय, स्वास्थ्य वा समृद्धीसाठी नाही तरी -

योग्य वेळी 

कोंबडी, बाटली आणि काही फुटकळ नोटांच्या 

मोबदल्यात मिळणाऱ्या मतांसाठी!



- निलेश पंडित 

२० डिसेंबर २०२०

शनिवार, १९ सप्टेंबर, २०२०

संभ्रम

 

"वेगळेपण चेहर्‍यांचे एक आत्मा"

फक्त वाटे आत्मरंजक एक युक्ती

एक सामायिक गवसते तथ्य केवळ

संस्कृती जोपासते सक्तीत शक्ती


जाणिवेचा एक लपतो थर मधोमध 

आणि सवयीची वसे त्यावर अहंता

हास्यमुद्रा विलसती बाहेर दिसते

अन् तळाशी खोल फसफसते पशूता


ह्या थरांची बदलते घनता सदोदित

आपसातच युद्ध होते ह्या स्तरांचे

ढवळते संदिग्धता आतून सारे

अन् प्रदूषण भिनत जाता खोल मुरते


शोधते मन सूत्र ह्या सर्वांत काही

मात्र आढळते अनिश्चितताच संतत

रेखते फुटकळ मनोरंजक नकाशे

संभ्रमित मन भरकटे मग त्यांत नकळत


अटळ ठरता शेवटी संहार भीषण

स्फोट होता संपतो संभ्रम अचानक

कालपावेतो स्थिती जी बिकट होती

आज होते ती निरर्थक अन् विदारक


... जन्मते मग एक युक्ती नवयुगाची

पाहते जग हास्यमुद्रा बदललेल्या

हिंस्त्र लसलसते पशू निद्रिस्त होती

मांस अस्थींवर उमलते गंजलेल्या


- निलेश पंडित

२० सप्टेंबर २०२०

शुक्रवार, २८ ऑगस्ट, २०२०

सूत्रधार


पावलोपावली क्षणोक्षणी

प्रत्येक आयुष्याला

काठोकाठ स्पर्श करत

सर्व जिवांचं

प्रत्यक्ष अप्रत्यक्ष नियंत्रण

करत असतो

निश्चितच 

कुणी 

हाडामांसारक्ताचा

खराखुरा

अदृश्य सूत्रधार

सर्वत्र


वावरत तुमच्या आमच्या सर्वांच्या 

दैनंदिन जगण्यातच

आपल्या नकळत


जो देतो रंगांना धर्म

धर्मांना रंग

भगवा हिरवा आणि इतरही

भाषांना भूगोल

प्रदेशाला अस्मिता

अस्मितेला प्रदेश


जागवतो

वर्णाची जाणीव

जाणिवेचा वर्ण

फडकवतो बावटे, झेंडे

लाल काळे रंगीबेरंगीही


... आणि स्वतः नांदत

ऐषोआरामात

नेमतो ...

पिढ्यान् पिढ्या

भीती अबाधित राखण्यासाठी

तथाकथित धर्म-देव-गंडस्थानांमध्ये

कपोलकल्पित कुठलासा

अदृश्य सूत्रधारही




- निलेश पंडित

२९ आॅगस्ट २०२०