हा ब्लॉग शोधा

आशावाद लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
आशावाद लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, १ ऑगस्ट, २०२६

धून

 

शब्दांच्या विस्फोटी   शांततेचा ध्वनी

झिरपता कानी   गुंगवितो


आभासी अस्तित्व  कल्पनेचा सोस

संतत सायास   अर्थहीन


आकृती लौकिक  आकर्षक वाटे

सत्य उफराटे    प्रत्यया ये


चालताना अशी   एकाकी माणसे

टाकती उसासे   समांतर


गुंफती हातात   आधाराचे हात

घेतात देतात   आधारही


भुसभुशीतशी   पायातळी माती

अल्पजीवी नाती   सर्वमान्य


अवकाशी अशा   मीही अधांतरी

दिव्य काहीतरी  शोधू जातो


भांबावतो होता  शोध तो निष्फळ

निराशा केवळ   ग्रासतसे


माथ्यावर एक   लुकलुके क्षण

देत आमंत्रण   स्थिरतेचे


सामावता खोल  हातीच्या क्षणात

लाभे अवचित   सर्वार्थांश


विरते शांतता  विस्फोटही नुरे

मंजुळशी धून  कानी उरे


- निलेश पंडित 

२ ॲागस्ट २०२६




















शुक्रवार, ७ नोव्हेंबर, २०२५

पारंगत

 

अनिच्छा चेहऱ्याला ग्रासण्याआधीच ओसरते

जरी प्रत्येक टप्प्यावर नव्याने वेदना वसते

… तिच्या रात्रीत रुजती यातना दिवसा ठणकती ज्या

पुढे त्या वाढण्यासाठी नवी तारीख अवतरते


जिवाची होत असते रुक्ष शब्दांनी जरी लाही

दिलाशाचा नसे लवलेशही … रात्री व दिवसाही

… विषारी डंख शब्दांचा तसा स्पर्शातही लपतो

सहन करण्यात पारंगत तिला तो जाणवत नाही 


तिच्या ह्या घोर दिव्यातून ती काहीतरी लिहिते

जसे लिहिते तसे त्यातून मोहक स्वप्न अवतरते

… कधी ते अल्पजीवी तर कधी उत्तुंग अजरामर 

अशा स्वप्नांमधे विसरून जगणे रोज ती जगते


कधी स्वप्नात भुरभुरते सुगंधी रेशमी जावळ

स्मृतीतिल आपल्याशा माणसांची भोवती वर्दळ

… जरा येताच भानावर कधी ते स्वप्न हे कळते

असा जाईल हाही काळ ही ती बांधते अटकळ


चिरंतन स्वप्न ठरते यातनेवर नेमके औषध

असावे वास्तवापासून थोडे दूर बेसावध

… सरावा काळ आनंदात खोट्या मात्र मौजेने

पुढे येतोच अवचित आपली करण्यास तो पारध



- निलेश पंडित 

८ नोव्हेंबर २०२५


शनिवार, २१ जून, २०२५

दुहेरी

 (वृत्तः भूपतिवैभव)

समजलो ज्यास मी महाल बळकट माझा 

ते केवळ होते नाजुक छोटे घरटे

आगळा मानले कल्पवृक्ष मी ज्याला

तो झुडूप होता एक रानटी खुरटे


मिळताच मला संकेत राजमार्गाचे

मी माझे त्याच दिशेला पाय वळवले

अज्ञात नागमोडी वाटेवरती त्या

वळणा-चकव्यांनी हातोहात फसवले


गेले फुंकत आयुष्य शंख युद्धाचे

मी ऐकत गेलो क्षणोक्षणी रणभेरी

चलबिचल मनाची सदैव लपवित गेलो

भीती-ईर्षेचे व्रत घेऊन दुहेरी 


रेशीमस्पर्श हातास तुझ्या हाताचा

होताच वाटते घरटे महाल सुंदर

पायवाट ठरते राजमार्ग लढण्याचा

अन् ईर्षा करते कुरघोडी भीतीवर



- निलेश पंडित

२२ जून २०२५


शुक्रवार, ६ जून, २०२५

चौकट

 (वृत्तः लवंगलता)


तहान काही घोटांची तर खोल डोह पाण्याचा

का मारावा सूर कशाला ध्यास खोल जाण्याचा?


तरंगात वरवरती प्रतिबिंबे परिचितशी दिसता

काठावर सहवास आपला त्या प्रतिबिंबांपुरता


ओंगळ जलचर गाळ तळाशी असोतही असलेले

आपण पाहू काठावरती फूल फक्त फुललेले 


जसा डोह बाहेर तसा वसतसे आतही एक

तुला मला ठाऊक त्यातही जलचर गूढ अनेक


आपलाच आपल्यात गहिरा अनोळखी पण तोही

कधी शांत निर्मोही सुखकर कधी भयंकर द्रोही


ह्या डोहाचे त्या डोहाशी नाते हवे कशाला?

स्पष्ट सपाटीवर घावांचा का आगंतुक घाला?


असे डोह अन् गाळ असा हे असेच सगळे असते

जपायचे अन् असेच फुलवायचे आगळे नाते


… स्वीकारत हे हात घेत हातात असे बघताना

क्षण येती अद्वितीय काही चौकटीत जगताना


क्षणभर मात्र दिसे स्फटिकासम स्वच्छ तळाशी पाणी

अवचित मग नकळतही स्फुरती परिपूर्तीची गाणी


परिपूर्ती नसतेच निरंतर गाळ स्वच्छ पाणीही

नसे शांतता वा कोलाहल अन् नसती गाणीही


- निलेश पंडित 

७ जून २०२५

शुक्रवार, ६ सप्टेंबर, २०२४

लाटा

 

हे असेच असते प्रवाहात वाहून जायचे नसते

वाहून लुप्त होण्याआधीही मुक्त व्हायचे असते

… भिववितो जसा भवताल तसा नेहमीच मोहवितोही

त्या सवे न जाता केवळ तो पाहून जायचे असते

(हे असेच …)


जायचे न माहित कुठे कधी वेगात किती कोणाला

क्षण वर्तमान जगतानाही ह्रदयी स्वप्नांची माला

… आशा स्फुरते घुसमट होते ह्या लाटा अटळच माथी

लाटेत तरंगत … कधी कधी पोहून जायचे असते

(हे असेच …)


प्रत्येक लाट संपते मात्र पदरात टाकते काही

जन्मणेच घडते पुन्हा पुन्हा मिळतात नव्या कक्षाही

… अश्रूंनी ओथंबित हास्याचे अद्भुत क्षण जगताना

नवनव्या उमलत्या अर्थांवर मोहून जायचे असते

(हे असेच …)


रेघांची रूपे वेगवेगळी रेघा अवतीभवती

कायमी ठळक अवतरती काही काळ्या दगडावरती

… मातीत अल्पजीवी रेघोट्या तशा विजा लखलखत्या

ह्यांमधे न गुरफटता केवळ राहून जायचे असते

(हे असेच …)



- निलेश पंडित

७ सप्टेंबर २०२४






मंगळवार, २१ मे, २०२४

औषध

 


भूतकाळाच्या दिशेने धावते मन

जीव भवितव्याकडे झेपावताना

निसरडा रस्ता, नकाशा फाटलेला

आणि चकवे भुलविती दाही दिशांना


हात इतरांचे गवसता आणि सुटता

स्वप्न सत्यातील सीमा विरत जाते

भासते जे जे निरंतर अन् चिरंतन

तेच ठरते अल्पजीवी एक नाते


नाइलाजानेच बघता ही भ्रमंती

नाइलाजाचेच दिसते राज्य सारे

नाइलाजाने उन्हातान्हात फिरणे

नाइलाजाने वसवलेले निवारे


सूक्ष्मसे दडतात ह्यातच मात्र मोहक

क्षण इलाजाचे विसाव्याचे निनावी

अन् पराकाष्ठा असे क्षण शोधण्याची

हेच औषध नाइलाजावर प्रभावी


- निलेश पंडित

२१ मे २०२४








शुक्रवार, १९ एप्रिल, २०२४

कात

 

उजेडातल्या सावल्या विरता अंधारात

क्षितिजावरती दूरवर प्रकाश टाके कात


मणी माळतो मोजतो क्षणोक्षणी आशेत

संध्याकाळी गोठतो गूढाच्या छायेत


सूर मधुरसे सोबती रंगांची बरसात

अवघड काळी शांतता जरी खोल ह्रदयात


शांततेतही आगळी मल्हाराची धून

तेज सूक्ष्मसे छेदते तमास उदरातून


दाह ग्रासता खोलवर देहमनाला बोच

सहन करत ती वेदना … आनंदितही तोच



- निलेश पंडित

२० एप्रिल २०२४







शनिवार, १६ मार्च, २०२४

प्रपात

 

जीव रमे तुटे  ।  दशके लोटली

विरून उरली  ।  सहवासी


जाणिवेचा सोस  ।  एकला विद्यार्थी

जग अर्थाअर्थी  ।  शिकतो मी


हपापतो जीव  ।  सहवासासाठी

धाव गर्दीपाठी  ।  हकनाक


शोधण्यात सगा  ।  दुरावले सगे

व्यर्थ आगेमागे  ।  जाचे गर्दी


आजन्म पाखरू  ।  व्यग्र भिरभिरे

परके सोयरे  ।  फुलांसम


त्यात होते स्वप्न । व्यर्थ धूसरसे

मन वेडे पिसे  । जन्मभर


खुणावे संतत  ।  काही आसपास

केवळ आभास  । असूनही 


दूर वा निकट  ।  अमूर्त वा मूर्त

श्वास ह्या श्वासात  ।  उष्ण तिचा


रेशमी गुंफण  ।  असे नसे त्याची

गूढ आनंदाची  ।  पायवाट


पथिक एकटा  ।  उरलो मी आज

समाप्तीचे तेज  ।  पाहतो मी


सल जाच खोच  ।  तक्रार काहीही

सुतराम नाही  ।  मनोमन


तेवणारी वात  ।  विरणारी ज्योत

काळाचा प्रपात  ।  मावळू द्या



- निलेश पंडित

१७ मार्च २०२४

शुक्रवार, २ फेब्रुवारी, २०२४

शोध

(वृत्तः रुचिरवदना)

बाहेर स्वस्थ मात्र आत त्रस्त नेहमी

सोसून वंचना सदैव लाभता कमी

… मी रोजरोज तेच जगत फक्त राहिलो

अज्ञात गूढ नकळत नेमका कोण मी


गोंगाट पाळण्यात गमावून शांतता

वाटेवर इतरांच्या सक्तीत चालता

… मी मला खुद्द विसरलो … दुरावलो मला

भीती मनात मुरत दावणीस बांधता


… केवळ म्हणून परतलो स्वताकडे जसा

वाटलो मूळ मीच मला अपरिचित तसा

… भांबावलो अपात्र भासलो जगापुढे

एकाकी मी … जाणला जगायचा वसा


उमगले समुद्रातलेच बेट सर्वही

आपलाच आपल्यास शोध गर्दीतही


- निलेश पंडित

३ फेब्रुवारी २०२४











शनिवार, १८ नोव्हेंबर, २०२३

क्षण

 

वियोग सोसे कुणीतरी अन्

संयोगातच कोणी थिजते

… समीप आपण अलिप्त आपण

जगे निखारा ज्वाला विझते


गैरसमज की समज न समजे

सतत बोचते मूक वेदना

… तीच रक्षिते तीच भक्षिते

थिजवितही राखते चेतना


डळमळता पण सळसळताही

ह्या साऱ्याचा एकच पाया

अवधी मागत अगम्यतेच्या

पडत राहणे हातापाया


आजकाल मग कुपीतले क्षण

निखाऱ्यातल्या जुन्या उबेचे

आठवताना पुन्हा अचानक

जग प्रकाशते नव्या उषेचे



- निलेश पंडित

१९ नोव्हेंबर २०२३

शनिवार, १५ जुलै, २०२३

परिपूर्ती

 (वृत्तः वसंततिलका)

उत्स्फूर्त वर्तन कुणी लिलयाच केले

मौनात केवळ कुणी रममाण झाले

... कोणी सदैव रमले सृजनात त्यांच्या

सारेच मात्र झिजले, विलयास गेले


भासे जरी बदलले सगळे जगी या

भूमीत नित्य लपला अविभाज्य पाया

… बाह्यांग निर्मळ दिसे ह्रदयात गुंता

निर्माण होत फुलता विरतात काया


संदिग्ध धूसर दिशा घनदाट झाडी

कोडीच हे न कळता उरतात कोडी

… त्यातूनही निपजतेच अतूट इच्छा

आजन्म घाट चढता … पथ नागमोडी


आहेत मात्र पदरी अनमोल काही

भाषा व कल्पकतेसम साधनेही

… योजून यत्न करता प्रगती युगांची

साधून अंत - गवसे परिपूर्णताही



- निलेश पंडित

१६ जुलै २०२३

सोमवार, २२ मे, २०२३

जाळी

 

सर्व सरले विरले तरी पोकळी उरते

दीर्घ विसर पडता तेच नव्याने स्मरते


जीर्ण लुप्त झाले त्याची आगळीच नवलाई

पूर्वी घडले त्याचीच आज वाटे अपूर्वाई!


मागे वळून पाहता दिसे वेगळीच सृष्टी

सारा भूतकाळ तोच माझी निराळीच दृष्टी


सुप्त अंकुरते आहे मात्र जाणीव नवीन

वरवर पाहिले ते खोल उमगे आतून


स्थिती गती तेव्हा होती तशी आजही असे ती

तेच अभेद्य खडक तीच काळीशार माती


संकटांच्या कवचांचे नव्हते जीवास भान

ऊबदार स्वप्नांनाही तीव्र नशेची तहान


जे जे भासले अनिष्ट तेच झाले वरदान

जाळी पिंपळपानाची स्मृतीगाथेतले पान



- निलेश पंडित

२३ मे २०२३

गुरुवार, २७ एप्रिल, २०२३

शिरस्ता

 

फुलत राहतो कुणी एकटा

अंधारातच थिजता वेडा

मलीन वस्त्रे लक्तरलेली

तरी जपतसे मुकुट भाबडा


त्यास वेगळा रस्ता दिसतो

पायवाटही नसते जेथे

तोच सहज चोखाळत जातो

विश्व गवसते अद्भुत तेथे


... आणि फक्त त्यालाच लाभते

तेजोमय मोहिनी अनामिक

अंधारातच मग गुरफटतो

प्रकाशातला विचित्र यात्रिक


ही न कसोटी त्याची ही तर

धुवट जगाची एक परीक्षा

जुनेपणाला वहिवाटीच्या

नवमार्गाची अमूल्य दिक्षा


नसलेली ती पायवाट मग

रुजत रुजत बनते हमरस्ता

जगभर साऱ्या हमरस्त्यांचा

शतवर्षांचा हाच शिरस्ता



- निलेश पंडित

२८ एप्रिल २०२३

शनिवार, १२ नोव्हेंबर, २०२२

जोड

 

भिजविता घामात माती

होय अमृत मानवी

शुष्कता वितळून फुटता

कोवळीशी पालवी


सुरकुत्या वा नितळ काया

हे नसे बंधन तिथे

आजही दूषित जगी या

चेतना गवसे जिथे


नग्न सत्याला दडवते

स्वप्न सुंदर रेशमी

आणि वर आयुष्यभर

करते सुखाची बेगमी


कल्पनेची लाभल्याने

जोड जगण्याला अशी

वाट काटेरी क्षणांची

जाचते ना फारशी



- निलेश पंडित

१३ नोव्हेंबर २०२२


शुक्रवार, १० जून, २०२२

मेळ

 

आवाका अथांग

सैरभैर जीव

जाणिवेस गूढ

ग्रासते उणीव


निमिष सुगंधी

वाऱ्यावर येती

श्वासाश्वासातून

उमलती नाती


आसमंत होतो

जादुई नक्षत्र

जीव मंत्रमुग्ध

तन्मय सर्वत्र


उतरता नशा

चाचपडे पुन्हा

तमात शोधतो

कोवळ्याशा उन्हा


ऊन सावलीच्या

पडे ह्या खेळात

तितिक्षेचे दान

मात्र पदरात


रंगून सरता

सावकाश खेळ

उणीवांचा लागे

जाणिवांशी मेळ



- निलेश पंडित

११ जून २०२२

शनिवार, १४ मे, २०२२

चिन्ह


तो जीव पुरातन कोणी

अश्मावर ठशात वसतो

नेहमी मला आताशा

माझ्यात मनोमन दिसतो


उसळून अचानक येते

रेखीव स्मृतींचे भरते

सरलेले पूर्वी काही

अजरामर अवचित ठरते


झरणारी वाळू झरते

लाटाही मागे फिरती

पण रिती न उरते मूठ

जाणिवा पुढेही उरती


जे मर्त्य अपूर्ण म्हणावे

ते तसे खरे तर नाही

नसण्यात स्मृती वसल्याची

इतिहास देतसे ग्वाही


चिरचिन्ह भाग्ययोगाचे

सलतसे भलेही क्षणभर

अस्तित्वाच्या अंतीही

उरतात ठसे अश्मांवर


- निलेश पंडित

१५ मे २०२२


शुक्रवार, २२ एप्रिल, २०२२

गती


दीर्घकाल वारंवार वापरल्याने

सुरकुतलेली शय्या

काहीशी जीर्ण झालेली चादर

शिळ्या ताज्या 

थोडा घरातल्या - थोडा परसातल्या

फुलांचा

रात्रीपासून पहाटेपर्यंत 

कोंदटलेल्या खोलीत दरवळणारा

तोचतो शिळपट मंद सुगंध


अंतर्बाह्य 

एकटेपण


अंगणात मळलेली वाट

आतबाहेर

जाणाऱ्या येणाऱ्या

असंख्य पावलांचे

काही स्पष्ट

काही फिकट पुसट

ठसे


बाहेेर सूर्योदय

आतल्या अंधारलेल्या

जुनाट छोट्या खोपटामधे

कसेबसे शिरू पाहणारे 

चारदोन प्रकाशकिरण 

बंदिस्त अस्ताव्यस्त

कोपऱ्यात चुलीमधे

शिळावलेले विझलेले कोळसे


अशा जीवघेण्या

चौकटीतही बसते उठून

देवघरात निरांजन लावायला

रोज ती

कण्हत म्हणत

... करीन जमेल तसं

जोपर्यंत हातापायात आहे गती


तेथे ... तेथे

कर माझे जुळती



- निलेश पंडित

२३ एप्रिल २०२२

गुरुवार, १४ एप्रिल, २०२२

वणवण

 

रस्ते अगणित एक न सोपा

अभेद्य भिंती अवतीभवती

खिंडार दिसे एखादीला

बाकी तटबंदीसम दिसती


कुठे कवडसा कुठे झोतही

मधेच बुजबुज अंधाराची

वैराग्याची पळभर कांक्षा

अविरत धडपड शृंगाराची


गती अनामिक आणि अकल्पित

साऱ्या कल्लोळातच मिळते

बिऱ्हाड थाटावे म्हटले तर

छप्पर कुठूनसे कोसळते


तरी रंगते ह्यात सुरावट

अन् जोडीला रंगसंगती

युगायुगांची ओंगळ दु:खे

क्षणोक्षणीच्या सुखात विरती


मी आताशा शोधत फिरतो

ठेवणीत जपतो मंजुळ क्षण

नृत्यासम लयदार भासते

अभेद्य भिंतींमधील वणवण



- निलेश पंडित

१५ एप्रिल २०२२


शनिवार, २२ मे, २०२१

सत्यम् अप्रियम्


भारतात कोविडची दुसरी लाट चालू आहे. संसर्ग आणि मृत्यू जगभर थैमान घालत आहेत. भारताचा गेली काही वर्षे वार्षिक मृत्यूदर प्रतिसहस्त्र  ७.३ च्या आसपास होता. म्हणजेच जवळपास सरासरी प्रतिदिन २७००० मृत्यू. सध्या कोविडचा मृत्यूदर प्रतिदिन जास्तीत जास्त ४००० च्या आसपास जाहीर होतोय. सत्तावीस अधिक चार एकतीस हजार ... हा मृत्यूदर उपलब्‍ध स्मशानं, कबरस्तानं, फ्यूनरल होम्ससाठी फार जास्त नाही. स्मशानं म्हणजे दररोज शंभर टक्के क्षमतेवर चालणारे कारखाने नव्हेत. कामात पंधरावीस टक्के वाढ सहज हाताळता यावी अशा ह्या जागा.


परंतू प्रत्यक्षात जर आंतरराष्ट्रीय बातम्या तपासल्या तर लक्षात येईल की अनेक स्मशानं, कबरस्तानं आता पुरेशी नाहीत ... बाहेर रांगा आहेत. शेकडो चिता मैदानांवर शेजारीशेजारी सामुहिक अंत्यविधीच्या रूपात जळतायत. Google वर overflowing crematoriums in India सर्च करून बातम्या वाचल्या तर चक्रावून जातो माणूस. निरनिराळया प्रांतांमधे नदीत शेकडो, हजारो शवं सोडून दिल्याच्या बातम्या फोटो-तपशीलांसकट छापलेल्या आढळतात. सगळेच एकाच वेळी खोटं बोलणार नाहीत कारण जागा, तारीख, संदर्भ, तपशील, बातमीचं कारण सगळे पैलू इतके वेगवेगळे अाहेत की त्यामधे संघटीत फसवणूक शक्य नाही हे स्पष्ट दिसतं.


ह्याचाच अर्थ मृत्यूदर अमाप वाढलाय पण तो कोविड ह्या सदरात नोंदवला जात नाहीये इतकंच. कोविडचं निदान होण्याआधीच मृत्यूचं प्रमाण गणती शक्य नाही इतकं वाढलेलं आहे असा निष्कर्ष काढण्यावाचून पर्याय नाही. अशा अचानक बेलगाम वाढीचं इतर काहीही कारण संभवतही नाही.  ह्याचाच अर्थ बेसुमार वाढ झालेला कोविड आता तपशीलाबाहेर गेलेला आहे. 


... मात्र हे लोकांना वाचायला, ऐकायला नको अाहे. न आवडणं स्वाभाविकच आहे. परिस्थिती दारुण व शोचनीय आहे, पण ती नाकारणं हा त्यावर उपाय नाही. तरीही ती नकळतच नाकारली जाते. सातत्याने नाकारली जाते.


खरंतर आशावाद म्हणजे सत्याकडे कानाडोळा करणं किंवा सत्य लपवणं नव्हे. किंबहुना आशावादावर सखोल संशोधन करणारे मार्टिन सेलिग्मन हा धोका नेमका दाखवून आशावाद्यांनी ही चूक टाळायला हवी ह्यावर भर देतात. प्रत्यक्षात मात्र आशावाद आणि सकारत्मकतेच्या नावावर बेदरकारपणा आणि बेफिकिरी नांदताना दिसत आहेत.


आताशा ह्या भाबड्या आशावादाचा, उत्क्रांत तर सोडाच, आदिम भावनांशीही फारकत घेणारा विद्रुप अवतार पाहिला की अतीव निराशा जन्माला येते. माणूस उत्क्रांत आहे, सतत क्रमाक्रमाने अधिकाधिक उत्क्रांत होतोय ह्यावरचा विश्वास अद्याप ढळलेला नसला तरी ह्या प्रगतीचा वेग मात्र आता निराशाजनक वाटतो.


तर्क, कल्पना आणि भावना ह्या त्रिकुटाचा स्वतःच्याही नकळत खुबीनं वापर करून माणूस अक्षरशः कुठल्याही विषयाचा स्वतःला हवा तसा अर्थ लावू शकतो. इतकंच नव्हे तर प्रसंगी अत्यंत ध्येयनिष्ठ माणूस स्वतःचे प्राण पणाला लावावेत किंवा इतर कुणाचा, अगदी निर्दोष, निष्पाप लोकांचाही जीव घ्यावा ह्या थराला जाऊ शकतो हे उघड आहेच. अत्यंत काटेकोर तर्कानुमान वापरू शकणारे कुटील लोक चाणाक्षपणे अशा ध्येयनिष्ठ लोकांचा वापर करतात हेही पुरेसं स्पष्ट आहे. परंतू पुन्हापुन्हा असे लोक बहुसंख्य वर्गांमध्ये, देशांमध्ये, सामाजिक स्तरांमध्ये, प्रदेशांमध्ये सद्वर्तनी, सुजाण, सच्च्या लोकांपेक्षा कितीतरी अधिक शक्तीशाली होत जातात हे चिंताजनक आहे.


"अति सर्वत्र वर्जयेत्" असं एक सुवचन आहे. इंग्रजीत ह्या सुवचनाच्या सर्वात जवळ जाणारं सुवचन कदाचित् everything in moderation हे असावं. तर्क, कल्पना आणि भावना ह्यांचा सुयोग्य परिपाक जिथे साधला जातो तिथेच विवेक जन्माला येतो असा विश्वास मला वाटतो. ह्यातील कोणताही एक पैलू अव्याजवीपणे सूज यावी तसा वाढत गेला तर सुडौल विवेकाची जागा बेडौल अतिरेक घेऊ लागतो.


भावनिकतेतून रुजणारी शेकडो ... कदाचित् हजारो ...  परस्परविरोधी मानवी मूल्ये हाताळताना हा विवेकच व्यक्तीसापेक्ष बदलत जावा हे मात्र दुर्दैव आहे. ह्याची उदाहरणं दैनंदिन आयुष्यातही विखुरलेली दिसतात. ती केवळ राजकारणात अथवा समाजकारणातच दिसतात असं नाही.


देश ही मानवाला वसवण्यासाठी जन्मलेली संकल्पना खरं तर. गेल्या उण्यापुर्‍या दिडदोनशे वर्षांत अधिकाधिक नावारूपाला येऊन महायुद्धांमुळे अधिकाधिक काटेकोर होत गेलेली. मूल्यं परस्परविरोधी असतात व चर्चा किंवा निव्वळ शाब्दिक देवाणघेवाणीतून वैचारिक - भावनिक बैठक बदलू शकत नाही त्यामुळे चर्चा व्यर्थ आहे हे आता पुरेसं स्पष्ट झालेलं आहे. काही जण देश लोकांसाठी मानतात तर काही लोक देशासाठी. पण मूल्यांचा अतिरेक इतका व्हावा की लोकांच्या जीवाचंही महत्व वाटू नये हे चिंताजनक आहे.


हे पाहिलं की "आधी सुराज्य नंतर स्वराज्य" हाच विचार योग्य होता अशी जाणीव प्रबळ होऊ लागते. इतकंच नव्हे तर कितीही कंटाळवाणा, सुमार व अनाकर्षक विचार भासला तरी आज पेरलेलं बीज आपण पाहू शकणार नाही अशा वृक्षाला जन्म देईल व त्याची फळं येणाऱ्या पिढ्यांना मिळतील हाच आशावाद केवळ आपण सर्व योग्य ते विवेकानं केल्यानंतर उराशी बाळगावा हा विश्वास मनात शिल्लक राहतो. 


पर्यायच काही उरला जेव्हा नसे

मी सहज नि सोपे ... काय करावे .... कसे ... ?

... हा प्रश्न पडे अन् कठीण उत्तर स्फुरे

“करण्याजोगे सोपे ना काही उरे!"


शतकाशतकांची घट्ट सनातन घडी

साकळली जिच्यात मूढ मती भाबडी

कणखर बुद्धीला करून टाके लुळी

मेंदूत भरे वर स्वप्नांची पोकळी!


जो युगायुगांचा गाळ इथे साचला

पाहिजे तसा तो सावकाश काढला

कोणात कधी मी देवदूत पाहणे

हे पुन्हा पुन्हा गाळात रुतत राहणे!


- निलेश पंडित 

२३ मे २०२१

शुक्रवार, १२ मार्च, २०२१

अंश

 (वृत्त: उद्धव)

दिसते रंगांची दुनिया

अन् भुरळ मनाला पडते

क्षणकाल मग्न मन होते

मग दीर्घ आठवण उरते


नेमक्या वाटती वाटा

एकेक पाहता वाट

हरवती अचानक वाटा

वाटांच्या जंजाळात


आनंद अंश जगण्याचा

पोकळी दीर्घ स्थावरशी

असण्यावर अटळच असते

नसण्याची अतूट सरशी


धुमसून भावनिक वणवा

शब्दांची खळबळ होते

काहींची रचना होते

काहींची अडगळ होते


... ह्यातून जन्मते काही

नाविन्य जणू अंकुरते

प्रगटतो अंश कवितेचा

अन् शेष मनातच मुरते




- निलेश पंडित

१३ मार्च २०२१