हा ब्लॉग शोधा

काव्य लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
काव्य लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, ३ एप्रिल, २०२३

व्यथा

 

लिहिता लिहिता थकलेले मन चुटपुटले

काफिले नकोसे हे शब्दांचे आता

हे केवळ निष्फळ काळाला चाचपणे

ओढणे व्यर्थ प्रत्यंचा ... रिताच भाता


वलयात देह देहात मनाची व्याधी

अतिअसाध्य आणिक सदैव ठसठसणारी

अदृश्य पोकळी खोल तीत अज्ञात

कष्टाज्ञानानेही न कधी भरणारी


झिजता झिजता फुलण्याची स्वप्ने जपणे

हा प्रयास केवळ एक विरोधाभास

जर दिशाच जर्जर अगम्य अंधाराची

का फुकाच तेजोवलयांचे आभास!


क्षणकालच टिकली उबळ व्यथेची माझ्या

अवचित जाणवला शब्दकळेचा महिमा

वैफल्य तरी ते शब्दांमधून कळले

शब्दांतच माझी मलाच दिसली प्रतिमा



- निलेश पंडित

३ एप्रिल २०२३


शुक्रवार, १२ मार्च, २०२१

अंश

 (वृत्त: उद्धव)

दिसते रंगांची दुनिया

अन् भुरळ मनाला पडते

क्षणकाल मग्न मन होते

मग दीर्घ आठवण उरते


नेमक्या वाटती वाटा

एकेक पाहता वाट

हरवती अचानक वाटा

वाटांच्या जंजाळात


आनंद अंश जगण्याचा

पोकळी दीर्घ स्थावरशी

असण्यावर अटळच असते

नसण्याची अतूट सरशी


धुमसून भावनिक वणवा

शब्दांची खळबळ होते

काहींची रचना होते

काहींची अडगळ होते


... ह्यातून जन्मते काही

नाविन्य जणू अंकुरते

प्रगटतो अंश कवितेचा

अन् शेष मनातच मुरते




- निलेश पंडित

१३ मार्च २०२१


बुधवार, १३ जानेवारी, २०२१

अपूर्वाई

 

अकल्पित गूढ स्वप्नांनी मनाला भारले होते 

असावा अर्थ शब्दांना असेही वाटले होते 

... जसे जे भासले त्याला दिली मी जोड कवितेची 

जगाचे भाव पण गाभ्यात काही वेगळे होते 


तळाशी खोल शब्दांच्या छुपीशी भावना वसते 

फुलाच्या कोवळ्या देठासही रक्तात रंगवते 

... मुखवटे बेगडी फसवे तशा शाब्दिक उलाढाली 

अधाशी हिंस्त्र श्वापद मानवी देहात वावरते 


असा कालापव्यय होतो ... अशी होते दिरंगाई 

अशी का वाटते नसतेच त्याचीही अपूर्वाई?

... खरे क्षण अन् खरे आयुष्य तर बंदिस्त आभासी 

कशाला कागदावर मी तरी सांडायची शाई?


परंतू मानतो मी हीच शाई आरसा माझा 

भले आता जगाशी स्नेह नाही फारसा माझा



- निलेश पंडित 

१४ जानेवारी २०२१


मंगळवार, २ ऑक्टोबर, २०१८

जागतिक महामंदी

Pantoum of the Great Depression

Our lives avoided tragedy
Simply by going on and on,
Without end and with little apparent meaning.
Oh, there were storms and small catastrophes.

Simply by going on and on
We managed. No need for the heroic.
Oh, there were storms and small catastrophes.
I don't remember all the particulars.

We managed. No need for the heroic.
There were the usual celebrations, the usual sorrows.
I don't remember all the particulars.
Across the fence, the neighbors were our chorus.

There were the usual celebrations, the usual sorrows.
Thank god no one said anything in verse.
The neighbors were our only chorus,
And if we suffered we kept quiet about it.

At no time did anyone say anything in verse.
It was the ordinary pities and fears consumed us,
And if we suffered we kept quiet about it.
No audience would ever know our story.

It was the ordinary pities and fears consumed us.
We gathered on porches; the moon rose; we were poor.
What audience would ever know our story?
Beyond our windows shone the actual world.

We gathered on porches; the moon rose; we were poor.
And time went by, drawn by slow horses.
Somewhere beyond our windows shone the world.
The Great Depression had entered our souls like fog.

And time went by, drawn by slow horses.
We did not ourselves know what the end was.
The Great Depression had entered our souls like fog.
We had our flaws, perhaps a few private virtues.

But we did not ourselves know what the end was.
People like us simply go on.
We have our flaws, perhaps a few private virtues,
But it is by blind chance only that we escape tragedy.

And there is no plot in that; it is devoid of poetry.

- Donald Justice
_______________________________________________________________________
(Donald Justice ह्यांच्या The Pantoum of the Great Depression ह्या कवितेचा स्वैर भावानुवाद)


ध्येय नव्हते सूत्र नव्हते अर्थही नव्हता कुठे
फक्त टाकित पावले आम्ही सदोदित चाललो
मात्र होती वादळे, काटेकुटे अन् संकटे
टाळल्या शोकांतिका अन् जगत आम्ही राहिलो

फक्त टाकित पावले आम्ही सदोदित चाललो
फारसे कर्तृत्व नव्हते आणि श्रमही थोडके
वादळे, काटेकुटे अन् संकटांनी गांजलो
स्मरतही नाहीत आता बारकावे नेमके

फारसे कर्तृत्व नव्हते आणि श्रमही थोडके
तेच ते उत्सव कधी अन् नेहमीचे शोकही
स्मरतही नाहीत आता बारकावे नेमके
सर्व मंगल सूर गाई आमचा शेजारही

तेच ते उत्सव कधी अन् नेहमीचे शोकही
हे बरे त्यांवर नसे कविता कधी लिहिली कुणी
सर्व मंगल सूर गाई आमचा शेजारही
खाजगी होती परंतू यातनांची मोजणी

हे बरे त्यांवर नसे कविता कधी लिहिली कुणी
कीव पदरातील थोडी आणि भीती सर्वथा
खाजगी होती जरी ती यातनांची मोजणी
आमची कोणासही कळली न जगण्याची कथा

कीव पदरातील थोडी आणि भीती सर्वथा
वळचणीला नेहमी आम्हां गरीबां आसरा
आमची कोणास सांगावी कुणी कसली कथा !
सूक्ष्मसाही अंश जगण्यातील नव्हता साजरा

वळचणीला नेहमी आम्हां गरीबां आसरा
कालचक्राची गती धीमीच संतत राहिली
सूक्ष्मसाही अंश जगण्यातील नव्हता साजरा
काळजांमध्ये महामंदी धुक्यासम दाटली

कालचक्राची गती धीमीच संतत राहिली
ज्ञान नव्हते काय असते ह्यात अंती व्हायचे
काळजांमध्ये महामंदी धुक्यासम दाटली
अल्पसे असतीलही गुणदोष काही आमचे

ज्ञान नसते काय असते ह्यात अंती व्हायचे
ज्ञात असते फक्त आम्हां नेहमी चालायचे
अल्पसे असतीलही गुणदोष काही आमचे
दैवयोगानेच संकट यायचे अन् जायचे

थांबले नाही तरीही आमचे जगणे थिटे
ना कुठे आराखडा अन् ह्यांत ना कविता कुठे
... ह्यांत ना आराखडा अन् ह्यांत ना कविता कुठे


- निलेश पंडित
२ ऑक्टोबर २०१८

शनिवार, २५ नोव्हेंबर, २०१७

हव्यास




शाई हा द्रव वेगळाच
रक्त, घाम, अश्रू
ह्यांहून
तशीच वेगळी जाणीव
अवलोकनातून आलेली
अनुभूतीतून जन्मलेल्या
अस्सल संवेदनेहून

बघणं, मांडणं, चितारणं
अठराविश्वे दारिद्र्य
रंगवणं उद्रेक
नटवणं दु:खिता शोषिताचा चेहरा
वातानुकुलित स्वच्छ आडोसा
सांभाळून
आणि तेच
पण वेदना हृदयाच्या मुळाशी
सोसून पोसून जोपासून
ह्यात तफावत
जमीनअस्मानाची

हे समर्थपणे
त्याच्याही नकळत लिहिणाऱ्या
स्वत:च्याच अनुभूतीच्या
स्वत:नेच केलेल्या
अवलोकनातून फुललेल्या
त्या कुण्या अज्ञात आगंतुक कवीच्या
लेखणीचा खोल घाव
जेव्हा झाला माझ्या मनावर
एकदाच पण नेमका

तेव्हापासून फसफसून भडभडून
विसर्जित करावंसं वाटतं
फोलपण
अक्षर-शब्दांच्या
चौकटी चौकटीतल्या
नक्षीदार कंगोऱ्यांचं
ज्यांना समजलो कधी मी
सौंदर्य, मूल्य वगैरे

... आणि निर्माण होणाऱ्या रिक्ततेत
रुजवावी निर्भेळ जाणीव
जिला नसावा मुलामा
अभिव्यक्तीच्या हव्यासाचा


- निलेश पंडित
२६ नोव्हेंबर २०१७

शुक्रवार, ७ जुलै, २०१७

सीमा

(वृत्त: शार्दूल विक्रीडित)

आशंका ह्रदयात गूढ वसती ज्या शक्य ना सांगणे
चिंता नित्य मनास ग्रासत असे आजन्म जी पोसणे
भीती क्रोध विकार सुप्त करिती वस्ती तळाशी मनी
ऐसे अस्थिर क्षुद्र चंचल जिणे मी रोज चोखाळणे

केव्हा दूर अथांग दिव्य दिसते जादू नभाची निळी
देहातून प्रसन्न चित्त उसळी घेते कधी आगळी
एखादा सुमधूर सूर भिडता लागे समाधी जणू
एखादी भुलवे अचानक खळी रेखीवशी कोवळी

विश्वातील समग्र ज्ञान असुनी ते ज्ञान भासे फिके
जेथे सूर्यप्रकाश बाष्प वसती तेथे दिसावे धुके
अभ्यासू इतिहास चोख सगळा सूक्ष्मातिसूक्ष्मातला
काळाच्या उदरात काय वसते हे कोण जाणू शके

शब्दांचे अधिराज्य सीमित ठरे नि:शब्दता जागते
त्या सीमेवर दीर्घकाळ कविता माझी मुरू लागते


- निलेश पंडित
७ जुलै २०१७

शनिवार, २९ एप्रिल, २०१७

तळमळ

(वृत्त: लवंगलता)

शब्दांवरती शब्दांचे थर टाकत जातो कोणी
लयीत रचतो यमकयुक्त पण निव्वळ स्पष्ट कहाणी
लय-यमकाविण खंड पाडते कोणी अर्धेमुर्धे
ढोबळ लय-यमकही वापरे कुणी लिखाणामध्ये

लिहिती काही मनात जे येईल तसे ते फक्त
उपासना साधना व्यर्थ हा विचार ठरतो मुक्त
टाळी कशी मिळावी अन् आवडते काय कुणास
विचारात कित्येक ह्याच राहतात तासन् तास

मुशायरा संमेलन बैठक वलये तऱ्हेतऱ्हेची
चटक लागते प्रत्येकाला नकळत सुप्त नशेची
कुणी पुस्तके छापत बसते एकामागुनि एक
विचित्र विरळा कुणी टाळतो वलयांचा अतिरेक

पदोपदी जगणे मरणे श्रीमंत करे जी कविता
तीच नेमकी तळमळते जन्मून उमलण्याकरिता


- निलेश पंडित
२९ एप्रिल २०१७

बुधवार, ३० नोव्हेंबर, २०१६

औषध

वृत्त: मनमोहिनी

विचारात एखाद्या मिळावे असे काही
जिथे शब्द संपावे नुरावी नि भाषाही
... तरी चक्र चालावे रसांचे व भावांचे
कवीची अहंता ना उरो औषधालाही

खुल्या स्वच्छ श्वासाने नभाचा वसा घ्यावा
निळाईत विश्वाच्या उभा देह दाटावा
... सुरांच्या मुळाशी जी असे शुद्ध ती शांती
शरीरात साचावी ... नवा जन्म भासावा

कवी मी असा राही प्रयासात मायावी
उरी घेउनी स्वप्ने कधी जी न संपावी
.... जरी जागतो येथे अनंती असे डेरा
जणू सुज्ञ कोणाही समाधीच वाटावी

जरा थांबता गाडी ... भिकारी कुणी येतो
अहंता टळेना ती मला नेमकी देतो


- निलेश पंडित
३० नोव्हेंबर २०१६

शनिवार, २४ सप्टेंबर, २०१६

व्यूह



आनंदाचे दोन क्षण । मिळविण्या वणवण
छोटे रोप मोठे तण । गुंता ऐसा

क्षितिजापल्याड दृष्टी । तिजमुळे व्हावे कष्टी
वर्तमानी अनावृष्टी । ऐसे जिणे

स्वप्नग्रस्तशी जागृती । जगण्यात स्वप्ने अति
मितींना मिती छेदती । गोंधळात

त्यात साचे अहंकार । दिसो येई सदाचार
आत भेदक विखार । दंभ नित्य

रचूनिया शब्द शब्द । मिळवावी मुक्त दाद
तीत होत जावे बद्ध । व्यूह गूढ

हृदय तगमगता । व्यूह भेदण्याकरिता
दृष्टीपल्ल्यात पाहता । दिसे न काही

तिथे थांबते लेखणी । शब्द, ज्ञान, उक्ती, वाणी
पडे अहंता उताणी । थिजे बुद्धी

येतसे हा क्षण तेव्हा । अनामिक काही ठेवा
चित्तास ये अनुभवा । अचानक

जणू नवी पायवाट । जंगलात घनदाट
होत असता पहाट । गवसावी

मग सांगते शारदा । नव्या जोमाने कैकदा
तुझी नवी ही संपदा । लिहीत जा

ठेव ध्यानात परंतू । घुटमळू नयेस तू
लिहिण्यात जुने किंतू । टाळत जा


- निलेश पंडित
२४ सप्टेंबर २०१६

रविवार, २५ ऑक्टोबर, २०१५

शब्दरूप


क्षणोक्षणी पदोपदी
मागे वळून बघून
तसंच आता
जगता जगता
एकच अटळ सत्य कळतं
मिळवण्याच्या सोसानं
बरंच मिळतं
मात्र शेष ... बाकी
काहीतरी उरतं

एकमेकांकडे
वळवून पाठ
स्मृती भरून मनात
काठोकाठ
निघालो कधी न भेटण्यासाठी

मी जातही राहतो पुढेच
मन मागे वळतं
अजुन काही मिळवतं
विणतं नवे धागे
यमक अथवा निर्यमक
शब्दांच्या बांधणीत
लयीत अथवा मुक्त
अव्यक्ताशी दोन हात करत
पदरात काही शब्दधन पडताना
सुखावत पुन्हा येऊन भेटतं
खूप दूर आलेल्या मला
आणि चालतं काही पावलं
माझ्यासोबत
हे समजण्याआधी
की पुन्हा शब्दांत
न बांधलेलं काही
शेष उरतं
... सदैव सलतं
जे नेहमीच वाट
पहात राहील
शब्दरूप मिळण्याची


- निलेश पंडित
२५ आॅक्टोबर २०१५

शनिवार, १९ जुलै, २०१४

कुसुमाग्रज

खोल मनाच्या गूढ तळाशी
पुन्हा पुन्हा विहरतो जसा मी
माझ्या अस्तित्वावर तुमची
छाप मला आढळे नेहमी

नाती आकलना पलिकडली
सहजसाध्य आम्हाला झाली
वहिवाटीची जीवनशैली
अकल्पिताचे पीयुष प्याली

अवचित झाल्या मनामनांच्या
अदृश्याच्या रेशिमगाठी
संज्ञांविण नात्यांनी केली
जन्मभराची जपणुक मोठी

गूढ त्यातही विशेष माझे
नाते माझ्याशी जडलेले
चार शब्द वाचताच तुमचे
निमूट अलगद उलगडलेले

उलगडुनीही असीम व्याप्ती
जाणवली … जाणवीत गेली
ओळख माझी माझ्याशी मग
अपूर्णतेनेही मोहरली

जन्मावे कांचन मातीतुन
अग्नीने वर त्या उजळावे
कविता फुलली तशीच तुमची
जिच्यात अवघे विश्व फुलावे

कुसुमाग्रज कवितेने तुमच्या
दिधली आम्हा जीवनदृष्टी
मिती लाभुनी किती अकल्पित
दिव्य जाहली पार्थिव सृष्टी

निःशब्दाचीही गुरुकिल्ली
शब्दांतुन अल्पशा गवसली
मूलतत्व जगण्याचे होउन
कविता तुमची हृदयी वसली

- निलेश पंडित
२० जुलै २०१४

गुरुवार, १२ जून, २०१४

कुपी


माझी अत्तराची कुपी
तीत गूढार्थाचा गंध
आणि भावनांना करी
शब्दार्थाशी एकसंध

कधी शब्दांना ती देई
नव्या अर्थाचा सुवास
कधी रुंजी घालणारा
दरवळे अनुप्रास

क्वचितच उग्र दर्प
लाभे त्याला झोंबणारा
बाकी निशिगंध मंद
रात्र रात्र लांबणारा

आहे शारदेचा ठेवा
माझी अत्तराची कुपी
माझ्या मनोविश्वा करी
सावकाश सर्वव्यापी

माझा श्वास माझा भास
कुपी जतन करेल
शब्दांच्या कस्तुरीतून
पीयूष गंध उरेल


- निलेश पंडित
१२ जून २०१४

रविवार, १८ मे, २०१४

प्रस्तुती

(वृत्त: कालगंगा)

प्रस्तुती ना राहिली आता जुगारांसारखी
एक टाळी वाजते येथे हजारांसारखी

धबधबा नाही तसा गोंगाटही नाही जिथे
खेळवूया या तिथे प्रतिभा तुषारांसारखी

एककल्ली, एकसूत्री बंधने टाळू जरा
दाद देऊ मुक्तकंठाने उदारांसारखी

तोच तो आशय नसावा यंत्रवत् कविता नको
विविधता ठेवू - नको वृत्ती सुमारांसारखी 

गोठवावी वेदना जखमेतली माझ्या जुन्या
शायरी त्यातून यावी तीक्ष्ण वारांसारखी

पाहिली ज्यांनी व्यथा त्यांनाच उत्सव पाहु दे
चेतना नाही दुजी उमद्या विचारांसारखी

- निलेश पंडित
१८ मे २०१४

शुक्रवार, ३१ जानेवारी, २०१४

कविता


मोहात जीर्ण वेडा
स्वप्नात अर्थ थोडा
बघतो आहे

रक्तातला शहारा
स्वप्नातही पहारा
करतो आहे

आयुष्य जीवघेणे
भूतातले तराणे
गाते आहे

आशाळभूत वृत्ती
भवितव्यतेत चित्ती
न्हाते आहे

क्षण एक एक सारे
मृत्यूत मावणारे
थिजते आहे

थिजण्यात मात्र त्याची
कविता युगायुगांची
रुजते आहे


- निलेश पंडित
१ फेब्रुवारी २०१४

शुक्रवार, २६ जुलै, २०१३

शूळ

(वृत्त: स्त्रग्धरा)

भावांच्या शब्दमाला अमित रचित मी प्राप्त केली प्रसिद्धी
वृत्ते सारी शिकूनी अविरत लिहिता लाभल्या शब्द सिद्धी
वैविध्यातून काव्ये बहुरसमय जी नित्य साधीत गेलो
जे भावे वाचकांना सतत श्रमत मी त्यांत बांधीत गेलो

अश्रू मोठे बघावे ... रुदन बघत ते काव्य निर्मीत जावे
आनंदाच्या क्षणीही समरसत स्वतः हास्य शब्दी भरावे
शौर्याच्या थोर गाथा सळसळ रुधिरी जागवीती विराट
आकांताच्या तशा त्या खळबळ हृदयी माजवीती अफाट

साहित्याच्या सभांना नियमित असणे नेहमी शक्य केले
उच्चश्रेणी जनांचे बहुमत मिळणे नेमके साध्य झाले
कष्टाने प्राप्त झाली सुखमय वलये सौख्य संपत्ति सारी
झालो ऐसा यशस्वी जन मज म्हणती "थोर गाढा विचारी"

लोकांच्या भावनांची घुसमट बघणे शुष्कसा खेळ झाला
आनंदे हासता मी अवचित हृदयी तीक्ष्णसा शूळ आला


- निलेश पंडित
२७ जुलै २०१३

बुधवार, ३ जुलै, २०१३

शारदे….

(वृत्त: मालिनी)

सुखद जगत जावे बेगडी स्वप्न होते
अवचित कळले जे नेहमी भग्न होते
अगणित प्रतिभेचा गर्व होता मनाला
उथळच लिहिण्याचा छंद होता जिवाला

नकळत क्षण तेव्हा यातनापूर्ण आला
ठसठस जखमांची मुक्त पेरून गेला
नजर प्रखर झाली वेदना स्पष्ट झाली
सुलभ समज आली वृत्तिही स्वच्छ झाली

अनुभव जमले जे तेच झाले शिदोरी
परवड मग माझी देत गेली उभारी
झरझर मग काव्ये लेखणीतून आली
परवड जगण्याची शब्दशृंगार ल्याली

अविरत तुज आता मागतो काव्यराशी
सतत मनन व्हावे हीच कांक्षा उराशी
तुजविण जगण्याची कल्पना व्यर्थ आहे
तुजसह जगण्याला नेमका अर्थ आहे!


- निलेश पंडित
३ जुलै २०१३

गुरुवार, ३० ऑगस्ट, २०१२

गद्य


दोन चार महिन्यांपूर्वी
कुठल्याशा लग्नात
चार मित्र
मला पाहताच चपापले
गप्प झाले
मग हळूच उद्गारले
"तुझ्यासमोर शांतताच बरी
आमचं ऐकशील
कवितेत लिहिशील!"

काल हिला
गजरा आणला
स्वतः च्या हातांनी
गेलो माळायला
मोहक लाजली
लगेच सावरली
हलकेच म्हणाली
"नको..माझा चेहरा पहाल..
लगेच कवितेत लिहाल!"

कहर झाला काल रात्री
काव्य प्रेरणा
आली स्वप्नात
त्राटिकेच्या वेषात
घेऊन जड शिळा हातात
संसारयज्ञात...
टाकायला
म्हणाली किती गोष्टी
नजरेतून सुटतात
लाज नाही वाटत तुला?

दचकून - जागा होऊन
सध्या जगतोय गद्यातून !


- निलेश पंडित
३० ऑगस्ट २०१२

रविवार, २२ जुलै, २०१२

कविते...


तू आलिस अन् माझ्या जिवनी
सुवर्ण मोहर सजला
रसरसले क्षण दुःखाचे ही
गूढ उकलले मजला

अव्यक्तातिल, भाव मनातिल
अलगद शब्दी रुजले
खळखळुनी कधी हसलो आणिक
नेत्र एरवी भिजले

आई...पत्नी...यांसम तूही
झालीस माझी...माझी...
परंतु वाढत जाशि जशी तू
होसी सुंदर...ताजी...!

आज कळे ही का म्हणते तुज
"सवत जशी ही माझी"!
असो कसेही अससी जोवर
माझी असण्या राजी!

- निलेश पंडित
२६ जून २०१२

शुक्रवार, २० जुलै, २०१२

गर्दी


आता गर्दी श्रोत्यांची तशि सदैव गर्दी वक्त्यांचीही
आता जंत्री घेत्यांची तशि अफाट संख्या दात्यांचीही!

ऐकण्यास हो तोबा गर्दी हे तो सारे जाणुन होतो
आता दिसते व्यासपिठावर तुंबळ गर्दी गात्यांचीही!

मशागतीचा स्वभाव नाही, ना साधन ना उपासनाही
आता होते गर्दित फरफट छोट्यान्संगे मोठ्यांचीही!

पीठ संपते, संपति दाणे, बागायत हो कोरडवाहू
फुकाच बडबड?....का मग केवळ घरघर पोकळ जात्यांची ही?

गुणग्राहकता नुरली आता...ज्याचा त्याचा नेता त्राता
खरेच शाही लोकांची का मदांध सत्ता कोत्यांची ही?

गुणवन्तांची छाटू डोकी, बरोबरी करण्या उंचीची
त्यायोगे मग चालवु "पंडित" परंपरा जगजेत्यांचीही!

- निलेश पंडित
३० मे २०१२

दाद


दाद असावी खुली...प्रवाही...
रसिकत्वाचा जणू धबधबा
निर्मलतेने करीत जावी
कलाकृतीची द्विगुणित शोभा

दाद असावी स्पष्ट नेमकी
कलाकृतीची पुढिल पायरी
सूर, रंग वा क्रिडा असो...वा
अन्य कशाची लज्जत न्यारी

जशी कोठल्या रत्ना कोंदण
दाद दिसावी कृतीभोवती
कलाकारही सुखे फुलावा
अधिक स्फुरावी कलानिर्मिती

दाद नसावी वरवर...व्हावी
सुखावणारी अंतरातही
कृतकृत्य हो कलाकार पण...
उजळविणारी रसिकत्वाही !

- निलेश पंडित
२८ मे २०१२