हा ब्लॉग शोधा

प्रेम लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
प्रेम लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, २७ जून, २०१६

ताबा


इतक्या वर्षांनंतर
बरंच काही
बदलूनही
जणू नाहीच बदललं काही
अशीच करारी, जबाबदार
होतीस तू

आपलं अचानक
कुठल्याशा कार्यक्रमात भेटणंही
जणू आयुष्याच्या
इतर सर्व अव्ययांप्रमाणेच
असावं नियंत्रणात तुझ्या
(आणि
कधी मीही हवा होतो जसा)
तसं होतंही कदाचित्

ताठ मान
कधी न न पाहिलेल्या
श्रीमंतीचा रुबाब
नवऱ्याचा टाय मधेच
त्यालाही जाणीव होण्याआधीच
झपाट्यानं नीट करण्याची ढब
सर्व उमरावांमधे वावरण्याची
सफाईदार पद्धत

फक्त
चुकार पाखरासारखी
अचानक तुझा ताबा
सोडून धावणारी नजर
आणि त्या नजरेला
लगडलेलं
तेच जुनं मन
वगळता


- निलेश पंडित
२७ जून २०१६

बुधवार, १३ जानेवारी, २०१६

मार्ग


(वृत्त: विनोद)

संवाद संपल्याने
संपेल का दिलासा
का टाकतेस आता
तू आर्त हा उसासा

निःशब्दतेस आहे
ग्रासून राहिलेला
अंधार ह्या क्षणी मी
चरकून पाहिलेला

आहे कितीक वर्षे
निपचीत मौन जागे
त्यातील चेतना का
उरली न आज मागे?

आशाच संपल्याने
भेटू पुन्हा कधी ही
ऊर्जाच लोपली का
जगण्यातली तुझीही?

तो नेक मार्ग एक
समजून जो धरावा
बदलून हात वेडे
हातातला बघावा

शिकलो सदैव दोघे
प्रगतीत विश्व दडते
जावे पुढेच तेव्हा
आयुष्य रम्य घडते

त्यातून ऐक पुढचे
हातात हात नसता
मी नेहमी दिसेन
मागे वळून बघता


- निलेश पंडित
१४ जानेवारी २०१६

मंगळवार, २४ नोव्हेंबर, २०१५

स्थान


(एका चर्चेत माझ्या स्नेही डॉ. उत्तरा चौसाळकर ह्यांनी एक छान सुटसुटीत संकल्पना दिली व त्यावर कविता कशी लिहिली जाऊ शकेल ह्यावर आम्ही चर्चा करत राहिलो. त्या चर्चेतून लिहिली गेलेली कविता.)

कसे लिहू ते
पत्र तुला मी
जे लिहिताना
उरेल काही
जे उरल्यावर
तुला पत्र ते
मी पाठवणे
शक्यच नाही!

भले जरी मी
लिहिले सारे
सुप्त मनाचे
गूज रेशमी
तसेच आणिक
पाठवले तर
राहू नंतर
कशी स्वस्थ मी?

शरीरतेच्या
दोन पायऱ्या
ओलांडुन ह्या
खरेच काही
नुरेल का रे?
वाचुन तुजला
समजतील का
माझ्या आतिल
… खोल मनातिल …
तारे … वारे?

सल तो माझा
उरेल केवळ
माझ्यापाशी
होय … कदाचित
कायमचाही
ना लिहिता … ना
पाठवता जो
तनामनाला
तसा नेहमी
जाळत राही

एकच केवळ
मात्र जाणते
मी माझ्यातच
जळते आहे
तुला कळो वा
कधी न समजो
तुझे स्थान मज
कळते आहे

- निलेश पंडित
२४ नोव्हेंबर २०१५

सोमवार, २३ मार्च, २०१५

उसासा

(आल्फ्रेड ऑस्टिन यांच्या A fragment ह्या कवितेचा स्वैर भावानुवाद)

फिरणारा केसांत तुझ्या तो शुभ्र पांढ-या
थरथरणारा हातही प्रिये नसेल जेव्हा
मी नसताना
धुंद नशेतच तुझ्या रुपाच्या क्षीण ध्वनीही
असेल विरला अखेर माझा माझ्या मागे
तू असताना

स्मृतीत माझ्या तेव्हा एकच सोड उसासा
ऐकावा जो अन् मी यावे राखेमधुनी
तुझ्याचसाठी
पुन्हा एकदा बांधाव्या मी मुग्ध मनाने
तुझ्या रुपाने धुंद होउनी शब्द्फुलांच्या
रेशिमगाठी

भले त्वचेवर लक्ष सुरकुत्या, केस पांढरे
वार्धक्याची अतीव थरथर …. छबी असू दे
हीच रुपाची
माझ्याविण तू तुझ्याविना मी एक स्थिती ही
जिच्यात नांदे नित्य निरंतर ऊब आगळी
संकल्पाची

दोन जिवांना काळाने वेगळे करावे
परी अनामिक शाश्वत नाते त्यांत उरावे
योग हा असा
करील जीवित पुनश्च मजला ...  पुन्हापुन्हाही
… राख भरवसा - करील यौवन बहाल तुजला
तोच उसासा


- निलेश पंडित
२४ मार्च २०१५

मूळ कविता:

A Fragment

Should fickle hands in far-off days
No longer stroke thy hair,
And lips that once were proud to praise
Forget to call thee fair,
Sigh but my name, and though I be
Mute in the churchyard mould,
I will arise and come to thee,
And worship as of old.

And should I meet the wrinkled brow,
Or find the silver tress,
What were't to me, it would be thou,
I could not love thee less.
'Gainst love time wages bootless strife,
What now is would be then;
The cry that brought me back to life
Would make thee young again


- Alfred Austin

शनिवार, ११ ऑक्टोबर, २०१४

त्रिवेणी

(वृत्त: भूपति)

शब्दांस मिळे अर्थाचे मोहक अस्तर
अर्थात दडे भावांचा उत्कट पाझर
अन् त्रिवेणीत ह्या गुरफटलो जेव्हा मी
शब्दा-निःशब्दा मध्ये नुरले अंतर

स्वरसाज लाभला नंतर त्या शब्दांना
त्यातून अकल्पित छटा रंगल्या नाना
रंगा-शब्दा-नादात बहरला स्वर्ग
मज गुपित समजले जगण्याचे जगताना

हे शूभ्र केस वाटती रेशमी आता
मी रमतो कृश गालावर लाली बघता
क्षण सुखदुःखाचे वा दोन्ही नसलेले
कांचनमय झाले तुझ्यासवे मी जगता

हा पोत त्रिवेणी जगण्याचा अनमोल
जे शुष्क वाटले त्यात लाभली ओल
ये करू उर्वरित जगण्याचेही सोने
झेपावू संसाराच्या डोही खोल


- निलेश पंडित
१२ ऑक्टोबर २०१४

शनिवार, ९ नोव्हेंबर, २०१३

बेड्या

(वृत्त: लवंगलता)

फारा वर्षांनी जेव्हां ती पुन्हा एकदा दिसली
जखम पुन्हा प्रणयाची नकळत ठणक्याने ठसठसली

शब्दही न बोलता मनांना गूज मनींचे कळले
अपूर्ण स्वप्नांचे तांडे अन् भविष्याकडे वळले

हस्तांदोलन झाले आणिक तिथेच खिळले हात
पुन्हा एकदा गुंतत गेली हृदये परस्परांत

देह्मनाच्या कुचंबणेने पित्त खवळले माझे
समाजातल्या रूढींचे मग फक्त वाटले ओझे

परवा जेव्हा पतीस अवचित तिच्या लागली ढास
जीव तिचा अवघा तळमळला जणू लागला फास

अंतर्मुख झालो आम्ही भानावर तेव्हां आलो
मलम लावले जखमांना अन् घरपरतीस निघालो

पतंग रंगित मोहक त्याला कणा चार काड्यांचा
मुक्त भरारीलाही शोभे पाश जरा बेड्यांचा


- निलेश पंडित
१० नोव्हेंबर २०१३

बुधवार, २९ मे, २०१३

दगा

(जाती: नववधू)

का मनासारखा दिवस न ये?
जग रुक्ष मला वाटे सखये …

चांदीचे सजले जरि पेले
बहुमद्यांनी फसफसलेले
सुगंधीत अन रसरसलेले
…… ना मोहविती पण ती पेये (जग रुक्ष मला … )

स्वप्ने माझी आता नुरली
नको मला त्या सभा मैफिली
यशकिर्तीची हौसच फिटली
…… निष्प्रभ झाली सगळी वलये

मी कधीच नव्हतो संसारी
तू झेललीस दुःखे सारी
झिजलीस नेहमी परोपरी
…… नेत्री ठेवुन माझी ध्येये

तू दगा एक केलास परी
अवचित सोडुन मज संसारी
परतुन येशिल का तुझ्या घरी …
…… एकदा - फक्त एकदा प्रिये?


- निलेश पंडित
२९ मे २०१३


रविवार, ५ मे, २०१३

शैशव

(वृत्त: मनोरमा)

सर्वव्यापी शैशवाची
सूक्ष्मता अन् गूढ खोली
लाभल्याने वाळवंटी
रात्र थोडी … मात्र ओली

भग्नतेला भूत देई
डिंक खोट्या आर्द्रतेचा
त्या खऱ्या 'खोटे' पणातच
सूर लाभे एकतेचा

तोंड होते बोळके अन्
सुरकुत्या पडतात गाली
त्यांतही वार्धक्य बोले
बोबडी शृंगार बोली

मानवाच्या वृद्धतेला
मर्त्यतेची कृष्णरेषा
बाल्य भूतातील पेरी
त्यांतही समृद्ध भाषा


- निलेश पंडित
४ मे २०१३

गुरुवार, २१ फेब्रुवारी, २०१३

चोरी


आज अचानक
तुला भेटता
तुझी खुशाली
ऐकुन माझे
बळे बळे मी
सौख्य सांगता
कथिल्याविण ही
तरुण मनांच्या
सुखस्वप्नांचा
सडा सुगंधी
अवचित पडला

भले लपव तू
मी ही लपविन...
दोघांच्याही
ओठांवरती
एक अनावर
भाव आणखी
डोळ्यांमध्ये...
(अदृश्यच पण)
खोल मनातच
थबथबलेला
फक्त मूकसा
अश्रू अडला

मनात म्हटले
जे झाले ते
बरेच झाले...
प्रवास सारा
ऊर्जा दायी
नक्षत्राविण
पार पाडता
तुझ्या कपाळी
चिरसौख्याचा
शिक्का बसला...
सोबतीतली
फरफट टळली !!

...अन् मी जेव्हा
हाती माझ्या
हात घेतला
तळहाताच्या
शुष्क त्वचेवर
खरखरीतशा
ओरखड्यांचे
जाळे लागुन
मूकपणाने
तू केलेली
तीच नेमकी
चोरी कळली...

- निलेश पंडित
२१ फेब्रुवारी २०१२

शुक्रवार, २३ नोव्हेंबर, २०१२

दोघे


एका घरात दोघे जण
एक वृद्ध आणि वृद्धा
तासन् तास शांतता
सुसंवाद तरीसुद्धा...
आजोबा खोकतात
आजी वळतात
"काय झालं...!" बघण्यासाठी
सुरकुतल्या कपाळी
दिसते चिंतेची
एक आठी
आजोबांच्या जेवणाचं
आजींनाच जास्त भान
जणू कोणी मूल लहान
आणि त्याची
भूक तहान

निःशब्द शांततेत
निर्व्याज व्यापार
अस्तिस्त्वाच्या बदल्यात
ऊब...माया...अपार

वार्धक्याच्या वाळवंटी
नाती अशी सजतात
पाहता पाहता डोळ्यांच्या
कडा आपसुक भिजतात

- निलेश पंडित
६ मार्च २००८

गुरुवार, १५ नोव्हेंबर, २०१२

उशीर


नभ काळवंडले अन् अंधारल्या दिशाही, ऊर्जा मनात वसण्या आता उशीर झाला
घेऊन जा मला तू मंगल तुझ्या घराला, येथे निवास करण्या आता उशीर झाला

क्षण कोवळे सुखाचे, सहवास तो तपांचा अन् ...आठवी मला तो...संसार काळजांचा

गेलीस तू सुखाने, राही प्रवास माझा...स्वप्ने नवीन बघण्या आता उशीर झाला

आता पिलांस अपुल्या बघ पंख दिव्य फुटले, घेती नभी भरारी, माझ्यात चित्त कुठले!

उत्पत्ति लय स्थिती हे तर खेळ सावल्यांचे, माझी स्थिती निवडण्या आता उशीर झाला

होतो भ्रमिष्ट थोडा अन् कापतो जरासा...श्वासागणीक दमतो...मी...टाकतो उसासा

मी चेहरे विसरतो...विसरून नाव जातो; तपशील सर्व स्मरण्या आता उशीर झाला

ऐकू मला अचानक जी हाक गोड येते; यमदूत मारतो ती...तुझिया स्मृतीत नेते

होईल त्रास थोडा..होतील वेदना पण...मागे फिरून बघण्या...आता उशीर झाला

- निलेश पंडित

२२ ऑक्टोबर २०१२

रविवार, ११ नोव्हेंबर, २०१२

मैत्री

Henry David Thoreau ची एक कविता आणि त्या कवितेचा स्वैर भावानुवाद:

Friendship
I think awhile of Love, and while I think, 
Love is to me a world, 
Sole meat and sweetest drink, 
And close connecting link 
Tween heaven and earth. 
I only know it is, not how or why, 
My greatest happiness; 
However hard I try, 
Not if I were to die, 
Can I explain. 

I fain would ask my friend how it can be, 
But when the time arrives, 
Then Love is more lovely 
Than anything to me, 
And so I'm dumb. 

For if the truth were known, Love cannot speak, 
But only thinks and does; 
Though surely out 'twill leak 
Without the help of Greek, 
Or any tongue. 

A man may love the truth and practise it, 
Beauty he may admire, 
And goodness not omit, 
As much as may befit 
To reverence. 

But only when these three together meet, 
As they always incline, 
And make one soul the seat, 
And favorite retreat, 
Of loveliness; 

When under kindred shape, like loves and hates 
And a kindred nature, 
Proclaim us to be mates, 
Exposed to equal fates 
Eternally; 

And each may other help, and service do, 
Drawing Love's bands more tight, 
Service he ne'er shall rue 
While one and one make two, 
And two are one; 

In such case only doth man fully prove 
Fully as man can do, 
What power there is in Love 
His inmost soul to move 
Resistlessly. 
________________________________

Two sturdy oaks I mean, which side by side, 
Withstand the winter's storm, 
And spite of wind and tide, 
Grow up the meadow's pride, 
For both are strong 

Above they barely touch, but undermined 
Down to their deepest source, 
Admiring you shall find 
Their roots are intertwined 
Insep'rably.

- Henry David Thoreau
_______________

स्वैर भावानुवाद :

मैत्री

विचार येतो मनात माझ्या...नक्की प्रेमा काय म्हणावे?
प्रेमच वाटे अन्न नि पाणी, स्वर्ग-धरेचा बंध असावे !
एक जाणतो परंतु निश्चित का नि कसे ते ठाउक नाही
उत्कट प्रेमातील हर्ष हा अखेर शब्दातीत च राही

'प्रेम असे' अन् 'प्रेम तसे' मी मित्रांमध्ये भले बोलतो
मिळता संधी प्रेम परंतू निःशब्दा तच मी अनुभवतो
प्रेम भासते, प्रेम जाणते...फुलवित जाते आणिक फुलते
झरते आणिक पाझरते ही.....भाषेविण ते अंगी मुरते

सत्यावर अन् सौंदर्या वर ...हृदय मनाच्या विशालतेवर...
मनुष्य करतो प्रेम परंतू ...सारे निर्भर हे प्रेमावर !
दोन जिवांची होते जेव्हां अवचित मैत्री या पायावर
दोन जिवांचा एकच आत्मा घेइ भरारी चराचरावर

दोन वृक्ष  जणु उभे राहती तीव्र वादळे सोशित सारी
लोकां दिसते अंतर त्यांतिल उभे जरी दोघे शेजारी
केवळ वृक्षां माहित असते आंतरीक मैत्री जडलेली
भूमीखाली अदृश्यातच मुळे एकमेकां भिडलेली

- Henry David Thoreau
(स्वैर भावानुवाद : निलेश पंडित )
४ नोव्हेंबर २०१२

सोमवार, २२ ऑक्टोबर, २०१२

वणवा

आपण सर्व
लाकुडतोड्यांच्या वस्तीत राहणारे
कधी लावतो शेकोटी
पाहतो कधी वणवेही
अकस्मात पेटणारे

आज काय झालं
कळलंच नाही...
तू आलीस घेऊन
पणती तेवती
संधीप्रकाशात
मी स्वच्छ करताना
जुनी निस्तेज समई
आणि तुझ्या पणतीवर
प्रकाशमान केल्यास
माझ्या समईच्या दाही वाती
त्या दाही वातींनी
उजळले आपले दोघांचे चेहरे
उजळल्या दाही दिशा...
...उजळल्या
माझ्या घरातील सर्व भिंती

त्या भिंतींवर दिसल्या
भल्या मोठ्या सावल्या
आपल्याच...
...आपल्यालाच घाबरवणा-या

सांभाळ गं
वेळीच सांभाळ
तुझ्या पणतीने
पेटू शकतात
समया...
शेकोट्या...आणि
वणवेही...

- निलेश पंडित
२० ऑक्टोबर २०१२

मंगळवार, ९ ऑक्टोबर, २०१२

पालवी


दरवाजाच्या सूक्ष्म फटीतुन नेत्र पल्लवी व्हावी
दोन दिलांची गाठ पडावी सृष्टी हिरवी व्हावी

भले पुन्हा जा झिडकारुन तू ...वाट तुझी मी पाहिन
पुन्हा भेटण्या तुझी जुनी ती खेळी फसवी व्हावी

लोकांमध्ये अफवा होती, कोण फसवते कोणा
मला मिळावा आळ...वाटते...तुझी थोरवी व्हावी

अल्प क्षणांची साथ मिळावी...उरले क्षण जगण्याला
तुझी साथ वठल्या झाडाला जरा पालवी व्हावी

'पंडित' आता जरी आळवी राग रागिण्या सा-या
मैफिलीत माझ्या पण अंती तुझी भैरवी व्हावी

- निलेश पंडित
९ ऑक्टोबर २०१२

बुधवार, ३ ऑक्टोबर, २०१२

पणजोबा


प्रपौत्र दर्शन घेतानाही तुझी आठवण येते
अज्ञाताच्या धुरकट जगती मन तुज शोधत जाते

सप्तपदीतहि ठसे उमटले दोघांच्या पायांचे
घरकुल आपण मिळून रचले स्वप्नांचे सत्यांचे

पिले..नि झाली...पिले पिलांना...आता तर त्यांनाही!
या सर्वांतच भास तुझा पण वास तुझा का नाही!

सांगत गेलो टाळत अंधश्रद्धा नित्य जगावे
अता वाटते अर्भक रूपी हाती तूच असावे...


- निलेश पंडित
४ ऑक्टोबर २०१२

गुरुवार, ३० ऑगस्ट, २०१२

गद्य


दोन चार महिन्यांपूर्वी
कुठल्याशा लग्नात
चार मित्र
मला पाहताच चपापले
गप्प झाले
मग हळूच उद्गारले
"तुझ्यासमोर शांतताच बरी
आमचं ऐकशील
कवितेत लिहिशील!"

काल हिला
गजरा आणला
स्वतः च्या हातांनी
गेलो माळायला
मोहक लाजली
लगेच सावरली
हलकेच म्हणाली
"नको..माझा चेहरा पहाल..
लगेच कवितेत लिहाल!"

कहर झाला काल रात्री
काव्य प्रेरणा
आली स्वप्नात
त्राटिकेच्या वेषात
घेऊन जड शिळा हातात
संसारयज्ञात...
टाकायला
म्हणाली किती गोष्टी
नजरेतून सुटतात
लाज नाही वाटत तुला?

दचकून - जागा होऊन
सध्या जगतोय गद्यातून !


- निलेश पंडित
३० ऑगस्ट २०१२

गुरुवार, २ ऑगस्ट, २०१२

दाखले

येती तुझ्या घराला, ते मार्ग आखले मी
माझेच पण नकाशे हरवून टाकले मी

लटकाच राग थोडा, खोटीच अंतरे ती
...होते खरे इशारे...तेव्हा न ताडले मी

वळवून मान बघतो, आता तुझ्याकडे मी
होतीस तू समोरी, तेव्हा न जाणले मी

टाळावयास जेव्हा मी देशही बदलला
कळले इथे तुला पण स्वप्नात आणले मी

आता असा विरागी, "पंडित" जगात फिरतो
लोकांत देत जातो, माझेच दाखले मी

- निलेश पंडित
१ ऑगस्ट २०१२

शुक्रवार, २० जुलै, २०१२

विरह


वेदना या तुझ्या
यातना या तुझ्या
कशि रे सोसु आता?
कशि रे साहु आता?
...राजा

मृत्युची क्रूरता
देइ सा-या व्यथा
भाळावरी आभाळ फाटे

गर्द उरली अता
व्यर्थ ही शांतता
देहामध्ये आकांत दाटे

कशि रे सोसु आता?
वेदना या तुझ्या...

- निलेश पंडित
२६ मे २०१२

बुधवार, १८ जुलै, २०१२

सुरवंट

माझ्या पहिल्या प्रेमाचा पोत
नव्हताच कधी
अस्सल..जातिवंत...
गर्भरेशमी...
ढगांकडे बघून
आकाश पांढरं
समजलो मी...

वेड लावत
गेली जेव्हा
हिरवीगार निसर्गसृष्टी...
काळ्या मातीकडे कधी
वळली नाहीच दृष्टी...

रसनेला तृप्त करणाऱ्या
स्वादाचा लागला नाद...
तेव्हा त्या
पाककुशल हातांना
द्यायचीच राहिली दाद...

तृप्त करून गेले
सतारीचे गोड सूर
आणि नर्तकी
लयीत नाचणारी...
पण जाणिवेपासून
राहिली दूरच
ती तार
बोटांना काचणारी...

दिसत गेलं
तिथे प्रीत जडली
खोलाचा वेध घेताना
मात्र नजर अवघडली

झालं - गेलं - होउन गेलं
प्रेम केलं
रेशीम देणा-यावर...
आता मात्र मन जडलं
घाम गाळून
कोष फोडून
कष्टाने बाहेर येणा-यावर

- निलेश पंडित
१८ जुलै २०१२
फिदा
फिदाच होतो कधी तुझ्यावर, मुग्ध असे त्या हसण्यावरती
आता जडली प्रीत तुझ्या या...जगात माझ्या...असण्यावरती

आठवते ती छबी आजही, आठवतो तो अवखळ रुसवा
जीव गुंततो आज तुझ्या पण संसारी समरसण्यावरती

चोखंदळ तू...तुझ्या आवडी...हट्ट तुझे ते होते अवघड
परंतु आता तुला चाहतो, कुठेच त्रागा नसण्यावरती

लग्न गाठ मी बांधत असता, व्यवहाराला पक्का होतो
मी जिंकावे म्हणून आता, उदार तू का फसण्यावरती?

अवखळ प्रेमाची ती खळखळ, पहिल्या प्रेमातच विरघळली
सखोल आता प्रेम आपले, एकच होउन वसण्या वरती

- निलेश पंडित
१८ जुलै २०१२