हा ब्लॉग शोधा

पूजनीय लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
पूजनीय लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, १९ जुलै, २०१४

कुसुमाग्रज

खोल मनाच्या गूढ तळाशी
पुन्हा पुन्हा विहरतो जसा मी
माझ्या अस्तित्वावर तुमची
छाप मला आढळे नेहमी

नाती आकलना पलिकडली
सहजसाध्य आम्हाला झाली
वहिवाटीची जीवनशैली
अकल्पिताचे पीयुष प्याली

अवचित झाल्या मनामनांच्या
अदृश्याच्या रेशिमगाठी
संज्ञांविण नात्यांनी केली
जन्मभराची जपणुक मोठी

गूढ त्यातही विशेष माझे
नाते माझ्याशी जडलेले
चार शब्द वाचताच तुमचे
निमूट अलगद उलगडलेले

उलगडुनीही असीम व्याप्ती
जाणवली … जाणवीत गेली
ओळख माझी माझ्याशी मग
अपूर्णतेनेही मोहरली

जन्मावे कांचन मातीतुन
अग्नीने वर त्या उजळावे
कविता फुलली तशीच तुमची
जिच्यात अवघे विश्व फुलावे

कुसुमाग्रज कवितेने तुमच्या
दिधली आम्हा जीवनदृष्टी
मिती लाभुनी किती अकल्पित
दिव्य जाहली पार्थिव सृष्टी

निःशब्दाचीही गुरुकिल्ली
शब्दांतुन अल्पशा गवसली
मूलतत्व जगण्याचे होउन
कविता तुमची हृदयी वसली

- निलेश पंडित
२० जुलै २०१४

बुधवार, ३ जुलै, २०१३

शारदे….

(वृत्त: मालिनी)

सुखद जगत जावे बेगडी स्वप्न होते
अवचित कळले जे नेहमी भग्न होते
अगणित प्रतिभेचा गर्व होता मनाला
उथळच लिहिण्याचा छंद होता जिवाला

नकळत क्षण तेव्हा यातनापूर्ण आला
ठसठस जखमांची मुक्त पेरून गेला
नजर प्रखर झाली वेदना स्पष्ट झाली
सुलभ समज आली वृत्तिही स्वच्छ झाली

अनुभव जमले जे तेच झाले शिदोरी
परवड मग माझी देत गेली उभारी
झरझर मग काव्ये लेखणीतून आली
परवड जगण्याची शब्दशृंगार ल्याली

अविरत तुज आता मागतो काव्यराशी
सतत मनन व्हावे हीच कांक्षा उराशी
तुजविण जगण्याची कल्पना व्यर्थ आहे
तुजसह जगण्याला नेमका अर्थ आहे!


- निलेश पंडित
३ जुलै २०१३

मंगळवार, ११ जून, २०१३

सिंधूताई

(वृत्त: पादाकुलक)

भले दिसो हा प्रवाह हिरवा
काष्ठ आतले जळते आहे
कशी चालते विश्वव्यवस्था
आता आता कळते आहे

प्रेताच्या टाळूवर लोणी
कुणा तृषार्ता मिळे न पाणी
राजा मरतो देशासाठी
बलिदानाने सजते राणी

मूलभूत गरजांना वंचित
घाम … रक्तही … कुणी गाळते
चरबीवर चरबीचे थर अन्
वाढवीत त्यां कुणी पाळते

क्षणोक्षणी प्रगतीचे वारे
फुलवत जाती किती निखारे
ऊब लाभण्या कुणास एका…
चटके सोसत जगती सारे

शरीर मन पोळून तरीही
तुझ्या अंतरी माया स्त्रवते
… सरे निराशा … भिजे पापणी
मन तेव्हा आशेने भरते !



- निलेश पंडित
१२ जून २०१३

बुधवार, २४ एप्रिल, २०१३

पणती

(वृत्त: पादाकुलक)

नकोत टेंभे नकोत पलिते
हवीहवीशी वाटे पणती
अखंड तेवे आवाजाविण
केवळ थोड्या तेलावरती

सणासुदीच्या दिवसांमध्ये
चालू असता आतषबाजी
कोपऱ्यात वा कठड्यावर ही
संतत जळण्या सदैव राजी

भले असो ती शांत एकटी
एकलकोंडी नसते पण ती
फुलबाज्या… शेकडो फटाके
हिच्यामुळे पेटती झळकती

थकलेले जग झोपी जाते
अंधाराचे राज्य पसरते
शेणाने सारवल्या भूवर
प्रज्वलीत ही प्रकाश धरते

हूं किंवा चूं कधी न करता
जळते आणिक विझते पणती
रात्र संपता सोडुन सर्वां
प्रकाशलेल्या सुरम्य जगती


- निलेश पंडित
२० एप्रिल २०१३

गुरुवार, २४ जानेवारी, २०१३

सौंदर्य


सौंदर्याची महती वर्णू किती आणि मी कशी?
सुरकुतलेली करपट कृश ती छबी भासते अशी !

हातांना पडलेले घट्टे...सुकलेली मनगटे
खप्पड गाल नि खळी नसे मग हास्य वसावे कुठे?

केवळ काळे मणी नि दोरा ओवुन मंगळसूत्र
नवरा मात्र निकामी असली नियती फार विचित्र

फरशा पुसते, धुणी नि भांडी करते अन् घर जपे
पापड आणि कधी कुरडया विकण्या संतत खपे

भले न फुलता मरण्या आली जन्माला ही कळी
डोळ्यांमध्ये तरळत असते चमक एक वेगळी

स्थैर्य मिळाले बरी नोकरी मिळून मोठ्या मुला
सुखे वसावी लेकही अशी आशा आहे तिला

हिच्यात दिसती मला देवता, रंभा अन् उर्वशी
सौंदर्याची महती वर्णू किती आणि मी कशी?

- निलेश पंडित
२४ जानेवारी २०१३

मंगळवार, २८ ऑगस्ट, २०१२

साधना


शून्यातून
जग निर्माण करणाऱ्यांची
चरित्रं वाचली - महती ऐकली होती
पण सुनिर्मित - सुशोभित जगातून
फक्त शून्य वेचणाऱ्यांची
कल्पना अशक्य होती तेव्हा...

कुतूहलाने
साधनेची - उपासनेची प्रतिमा
धुंडाळत गेलो

दिसली सतारीच्या तारा
काचलेली बोटं...
ऐकले तंबोऱ्याशी एकरूप झालेले
श्रमलेल्या, रुळलेल्या गळ्यातील सूर...
पाहिल्या मूर्ती घडवणाऱ्या हातांच्या
ताणलेल्या शिरा...
वाचल्या दिग्गजांच्या शब्दसामर्थ्याने
प्रकाशित कविता...
बघितले अवघ्या जगातील गोलाईशी
तादात्म्य पावणारे नृत्याविर्भाव...

...आणि या सगळ्यांमागे दिसत राहिला
दैदीप्यमान परिवेष
सर्वांना हवाहवासा वाटणारा

पण त्या कुतूहलास
पुरेसं खाद्य मिळालं नाही
----------
तुम्ही दिसलात
भेटलात
जपताना
आपल्या तथाकथित लेकीला...
केवळ साडेपाच महिन्यात जन्मलेल्या
तरी जगलेल्या बधीर जीवाला
देशाचा - परदेशाचा
प्रत्येक प्रवास टाळत...
प्रत्येक सुखाच्या दालनाचं दार
बाहेर राहून बंद करत

तुम्ही जगलात
त्या मांसाच्या गोळ्याला
सर्व सोपस्कारांसकट
पासष्ट वर्षं
निसर्गानं दिलेलं तिचं सर्वायुष्य जगवून
कटाक्षानं नंतर मरण्यासाठी...
लख्ख अंधारात
सर्व दालनांबाहेर
शुष्क बोचऱ्या जगात

तेव्हा साधना...उपासना
यांचे अर्थ कळले
कुतुहलाचं पोट भरलं
डोळेही भरले
आणि दिसली तुमची
काचलेली बोटं
सुरकुतलेले गळे
ओढलेल्या शिरा
आणि स्वत:शीही अव्यक्त औदासिन्याच्या परिवेषात
गुरफटलेली एक दैदिप्यमान कविता

- निलेश पंडित
२७ ऑगस्ट २०१२

शेवट थोडा संदिग्ध होता त्यातील संदिग्धता कमी करून संगती थोडी वाढवण्यात रणजीत पराडकर या माझ्या कवीमित्राची मोलाची मदत झाली - त्याबद्दल त्याचे मनापासून आभार.

गुरुवार, ५ जुलै, २०१२

पु. लं.

पु. लं. ...

श्रीमंतीची...समृद्धीची
बदललीत व्याख्या
दिपवलीत ...वाढवलीत ...
रसिकांची संख्या

शिकवलंत...
साठवावी कशी
कानी सुरांची श्रीमंती
अपूर्वाईने प्रवासातही
करावी मनांची भ्रमंती

"अति सर्वत्र वर्जयेत"
याची ठेवावी जाणीव कशी
अतिरेकी भपका टाळावा
टाळावी उणीव जशी

उकलावं सौंदर्य
कसं साध्या साध्या क्षणांत
वैचारिक आरोग्य कसं
रुजवीत जावं अंतर्मनात

तेजःपुंज माणसांचे
आवडीने गावेत गुण
व्यक्ती वल्ली गणगोताचे
कृतज्ञतेने मानीत ऋण

कोणालाही न दुखवता
दंभाची उडवावी खिल्ली
याच स्वच्छ गुणसत्वांनी
रसिकता महाराष्ट्री खुलली

काव्य सुरांवर, सर्व कलांवर
मनापासून प्रेम केलंत
स्वतःवरही केलेत विनोद
सामान्यत्वी खुलत खुलत

पु. लं....तुम्ही गेलात आणि
सौंदर्य यात्रा जरा थिजली
आवडीने गुण गाता तुमचे
...पापणी अश्रूंनी भिजली...

- निलेश पंडित
२८ जुलै २०११