हा ब्लॉग शोधा

शृंगार / प्रणय लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
शृंगार / प्रणय लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, २४ एप्रिल, २०२४

नोंद

 

खूप प्रत्यक्षात जगलो स्वप्नही पाहून बघ

फक्त मर्यादा जरा स्वप्नात ओलांडून बघ


आजही बोलावतो क्षण टाळला जो नेहमी

टाळ वा टाळू नको पण एकदा जवळून बघ


उचलले पाऊल तू होतेस जाताना तुझे

आज मागे घेत क्षणभर ये पुन्हा येऊन बघ


नोंद तू केलीस अन् जपल्यासही साऱ्या व्यथा

शेवटी ती डायरी आता तुझी जाळून बघ


स्पष्ट दिसतो सर्व पाचोळाच उरलेला इथे

त्यातही काही सुगंधी पाकळ्या शोधून बघ


तोडणे नाते हिरीरीने नसे सोपे जसे

शक्य नसते सांधणे केवळ पुन्हा जोडून बघ


लोक गर्दीने इथे बघतात माझी दुर्दशा

वाटले अवघड तुला तर तू जरा आडून बघ


- निलेश पंडित

२५ एप्रिल २०२४

सोमवार, २९ मार्च, २०२१

कविते

 

माझी ह्रदयस्थ प्रेरणा

मात्र फसवी आणि अज्ञात 

तरीही अस्तित्वात, दृश्य  

अंशतः बाह्यजगातही


कधी भावभावनांसहित

कधी भावशून्य

कधी केवळ गूढ जाणिवेतच

वेदनेचा वेष घेऊन कधी

तर कधी करुणेचा

वासनेचा, मोहाचा

दग्धतेचा, सर्वतेचा, शून्यतेचा

... तर कधी केवळ अगम्यतेचा


मी जिला जाणतो

ती अशी तू ...


जेव्हा अवतरलीस

मूर्तीमंत तिच्या रुपात

तेव्हा लुप्त होत गेले शब्द

एरवी उजेडात येणारे

ज्यांच्यामागे लपतात नेहमीच

अनेक न लिहिलेल्या

सदैव अव्यक्त छटाही

पण राहतं काही दृश्यही.


हरलीस तूही

तिच्यासमोर!



- निलेश पंडित
३० मार्च २०२१

गुरुवार, १८ फेब्रुवारी, २०२१

पाश

 

जिव्हारी लागते मी बोललो तर हे मला कळते

तुला जाणीव आहे का तुझी तर शांतता छळते?


तुझे हळुवार नकळत लाजणे केवळ क्षणासाठी

पुढे रात्रंदिवस धुमसून माझे रक्त सळसळते


जगाच्या कोपऱ्यांपासून मी सर्वत्र वावरतो

तरी मन सारखे माझे तुझ्या दाराकडे वळते


बरा जगण्यास स्वप्नांचा उतारा लाभला आता

गवसते जे न जगताना तिथे ते सर्व आढळते


जगाला भासते डोळ्यात माझ्या वाहते पाणी

उभे आयुष्य डोळ्यातून नकळत रोज ओघळते


तुझ्या पाशात जो उगवे दिवस तो रेशमी वाटे

तुझ्यावाचून आता फक्त खडतर रात्र मावळते



- निलेश पंडित

१९ फेब्रुवारी २०२१

गुरुवार, २९ ऑगस्ट, २०१९

अंतर्बाह्य


भाग अंतर्बाह्य तू आहेस माझा आजही
देत तू जातेस स्वप्ने मात्र नंतर जागही

स्पर्श होता नेहमी अवघड तुझी असते छबी
लाज गालांवर तरी डोळ्यांत थोडा रागही

जा नको बोलूस तू म्हणतेस रागाने मला
लागले माझ्याकडे असतात जेव्हा कानही

एकमेकांना म्हणालो विसरणे सारे बरे
राहिला स्मरणात मग तो आगळा संवादही

आठवू मी की नको झाला तुझा जो स्पर्श तो
आठवण रोमांच देते मांडते उच्छादही

- निलेश पंडित
३० आॅगस्ट २०१९

शनिवार, १६ जून, २०१८

भर

स्पर्श स्पर्शाला मिळावा
जीव अवघा मोहरावा

क्षण जुना क्षणभर गवसता
मूक अश्रू ओघळावा

आठवण यावी अचानक
त्याच वेळी फोन यावा

भास मग सहवास थोडा
लाभल्यानंतर उरावा

उष्णता अन् ऊब जपता
एक भडकाही उडावा

डायरीचा भाग कोरा
नेहमी माझा असावा

मी विरावे तू उरावे
भर स्मृतींचा ओसरावा


- निलेश पंडित
१७ जून २०१८

शुक्रवार, १६ फेब्रुवारी, २०१८

दाह

लगबगीने टाळ वा रंगून रेंगाळून जा
भेटताना टाळताना मात्र पडताळून जा

एकदा मनसोक्त भर काया सुगंधाने जरा
पाकळी अन् पाकळीने फूल चुरगाळून जा

नेहमी मी दाह वा भडका तरी सोसू किती
मोकळे सर्वांग कर पुरते मला जाळून जा

लोकलज्जेने किती वहिवाट घुसमट ही इथे
धाडसाची वाटही जगण्यात चोखाळून जा

आक्रमक मीही अचानक एकदा होईन बघ
त्या क्षणी तूही बदल लाजून ओशाळून जा

विखुरलो तुटलो नि जगलो थंड रक्ताने पुढे
दोन क्षण जुळवू पुन्हा आजन्म वाफाळून जा


- निलेश पंडित
१६ फेब्रुवारी २०१८

शुक्रवार, २८ जुलै, २०१७

हुबेहूब


प्रतिबिंब जणू हुबेहूब

हूरहूर, अस्वस्थता
अश्रू, थरथरते ओठ
आंतरिक संवेदना
उष्णता
विचारांची गर्दी
घुसमटलेली स्वप्नं
शब्दांच्या राशी
अस्ताव्यस्त
एखादी मधुर लकेर
काही दबलेले सूर
काही चुकलेलेही
रंग गंध
सजलेले थिजलेले विझलेले
मुरलेले विरलेले
विखुरलेले
अथांगता अगम्यता
अशांतता

नेमकं तेच सारं
तुझ्यातही ... माझ्यातही

दिसतं लख्ख
आरशात दिसावं तसं
फक्त तेव्हाच
जेव्हा असतं आपल्यात
माफक पण अटळ
अंतर


- निलेश पंडित
२९ जुलै २०१७

शुक्रवार, २१ जुलै, २०१७

निष्प्राण


नसतीस तू जगण्यात तर जगलो तसा असतो खरा
हे लिहित असताना कसा बघ हात झाला कापरा

ज्या ज्या ठिकाणी तू कधी वसलीस ते आता रिते
मी मात्र तेथे आजही दुसऱ्या कुणा ना आसरा

तू कोण अन् मी कोण ते सांगू कसे मी नेमके
काया प्रफुल्लित तू नि मी निष्प्राण केवळ चेहरा

वाटायची थंडी गुलाबी तू निकट असता मला
होताच मग मी एकटा झाला हिवाळा बोचरा

तेव्हा जवळ दिसताच तू उजळून रात्री यायच्या
निस्तेज आता दिवस असतो सूर्य निव्वळ पांढरा

होती गती होती नशा जगण्यात माझ्या नेहमी
माझा तरी माझ्या कधी हातात नव्हता कासरा


- निलेश पंडित
२२ जुलै २०१७

गुरुवार, १३ एप्रिल, २०१७

नाद

(Robert Browning यांच्या Meeting At Night ह्या कवितेचा स्वैर भावानुवाद)

(वृत्त: दासी)

दूरदूर लाटांवर राज्य तमाचे चढते
अस्ताला सूर्य जात चंद्रकोर अवतरते
... लाटांचा पुळणीशी चाले संवाद जणू
दिवसाच्या क्षितिजावर गूढ सांज फेसळते

घोंगावे वारा अन् ताड माड सळसळती
दूर कुठे लाटा खडकांवरही आदळती
... कोळ्यांच्या खोपटांत मिणमिणती शांत दिवे
परतीच्या वाटेवर तुरळक नावा दिसती

पोचताच किनाऱ्यास माझीही नाव तिथे
करकरते ... स्थिरावते ... नंतर वाळूत रुते
... दारावर अधीर मी देता हलकेच थाप
दिवा तेवताच हर्ष ... भीतीही जाणवते

ताड माड वारा वा ध्वनी आसमंताचा
भासे ह्यांहून स्पष्ट नाद दोन हृदयांचा


- निलेश पंडित
१४ एप्रिल २०१७

________________

मूळ कविता:

Meeting At Night

The grey sea and the long black land;
And the yellow half-moon large and low;
And the startled little waves that leap
In fiery ringlets from their sleep,
As I gain the cove with pushing prow,
And quench its speed i' the slushy sand.

Then a mile of warm sea-scented beach;
Three fields to cross till a farm appears;
A tap at the pane, the quick sharp scratch
And blue spurt of a lighted match,
And a voice less loud, thro' its joys and fears,
Than the two hearts beating each to each!

- Robert Browning (1812 - 1889)

शनिवार, १० सप्टेंबर, २०१६

कळेना


शाप की वरदान होते
हे कळेना नेमके ।।ध्रु ।।

दोन वेडे एक गाणे
उष्ण भेटींचे तराणे
लाभल्याविण का विरावे
आपले क्षण मोजके ...
... लाभले पण थोडके ...
लाभले ते ...
शाप की वरदान होते ... हे कळेना ...
हे कळेना नेमके ...

आठवांचा छंद माझा
सोडवेना सोडवेना
वेदनांचा दाह आता
सोसवेना सोसवेना
अल्प आयुष्यात माझ्या
अल्प जे सुख लाभले
त्या सुखाचे ...
त्या स्मृतींचे ...
दुःख आता पोरके

लाभलेले दुःख माझे
शाप की वरदान होते
ते कळेना नेमके
ते कळेना नेमके ...


- निलेश पंडित
१० सप्टेंबर २०१६

रविवार, २८ ऑगस्ट, २०१६

तपस्या

(वृत्त: स्रग्विणी)

शोभते का तुला हे असे वागणे?
मूक होकार अन् दूरही राहणे

जाणतो मी जुना सूक्ष्म कावा तुझा
मी तुला पाहता पाहणे टाळणे

त्रस्त मी अल्पसंतुष्ट तू नेहमी
सज्ज देण्यास मी तू न ते मागणे

वेदना सारख्या पद्धती वेगळ्या
स्वप्न मी पाहणे रात्र तू जागणे

सभ्यता पाळुनी आत अस्वस्थ तू
का अशी देत जातेस तू कारणे?

शक्य होते कशी ही तपस्या तुला
अल्पसे भोगता खूपसे त्यागणे

- निलेश पंडित
२८ आॅगस्ट २०१६

सोमवार, १६ मे, २०१६

विस्तार

काही न सांगताही तू सांगतेस सारे
म्हणतेस त्यात वरती "समजून घेत जा रे"

नात्यास गूढ आहे विस्तार लाभलेला
नाविन्य खास ह्याला नसती कुठे किनारे

स्मितहास्य नेहमीचे वर लाजणे जरासे
सारी अशीच भाषा सारे असे इशारे

हलकाच स्पर्श झाला तोही तुला न कळला
फुलवून मात्र नकळत गेलीस तू निखारे

लाजून मागताना लटके 'नको' कशाला
आणू कुठून असल्या डंखांस मी उतारे

उपचार बंधने तू जप वागण्यात सारी
ह्रदयांस जोडणारी खोदीत जा भुयारे

- निलेश पंडित
१६ मे २०१६

गुरुवार, १२ मे, २०१६

बंध

जरा तू अकस्मात लाजावे
पुन्हा मी अनिर्बंध वागावे

नको रे म्हणावेस खोटे तू
तुला जे हवे ते खरे व्हावे

तुझे नाव अन् गाव बदलू दे
करावे मला मी तुझ्या नावे

नजर अन् पदर सावरत जा तू
असे बंध मी मग झुगारावे

नवे सूर साऱ्या नव्या ताना
जुने तेच गाणे तरी गावे


- निलेश पंडित
१२ मे २०१६

गुरुवार, २८ जानेवारी, २०१६

स्पर्श

(वृत्त: हिरण्यकेशी)


मला समजते तुझी मनीषा कधी न लागो मला सुगावा
तुझ्याच नकळत कटाक्ष चोरून टाकणे तू ठरे पुरावा

निकोप साधी सदैव भाषा स्थिरावलेली विनम्र दृष्टी
धपापता श्वास सांगतो पण तुझा इरादा छुपा असावा

कुणी म्हणे ती अबोल आहे कुणी म्हणे लाजरी असावी
न बोलताही करीत जाते नियंत्रणाचा यथेच्छ कावा

दबून आहे मनात जे तेे तुफान देहासही घुसळते
नदी समुद्रात लोपण्याचा सुवर्णक्षण प्रत्ययास यावा

न भेटताही बरेच कळले बरेच भेटून स्पर्श नसता
अनुभव संपूर्ण जाणण्याचा अखेर स्पर्शातही वसावा


- निलेश पंडित
२९ जानेवारी २०१६

मंगळवार, ८ डिसेंबर, २०१५

जीव

("होता न साधा एवढा जो शब्द मी तुजला दिला" ह्या कै. सुरेश भट साहेबांच्या मिसऱ्यावर बेतलेली तरही गझल)

होता न साधा एवढा जो शब्द मी तुजला दिला
साधाच हा दावा कधी सांगू न शकलो मी तिला

श्वासात होते श्वास मुरले दोन क्षण केव्हातरी
तेव्हाच माझा जीवही अडकून तेथे राहिला

मोहात वा इष्कातही बहकू नये कोणी कधी
जातो अशांचा नेहमी मदिरालयाला काफिला

ना इश्श्य तू म्हटले कधी ना लाजली होतीस तू
पण लालसरसा रंग गालावर तुझ्या मी पाहिला

जपले तुला स्वप्नात पण बदल्यात ना काही दिले
मग 'पंडिता'ने शेवटी मक्ता तुला हा वाहिला


- निलेश पंडित
९ डिसेंबर २०१५

सोमवार, २३ नोव्हेंबर, २०१५

पसारा


नभाला कुणाचा निवारा कशाला
नदी सागराला पहारा कशाला

तुझे पाहणे जीवघेणे पुरेसे
छुप्या हासण्याचा इशारा कशाला

वियोगात मी स्वप्नही का न पाहू
नशेला विषाचा उतारा कशाला

तुझी फक्त चाहूल अस्वस्थ करते
सुगंधास ताज्या पुकारा कशाला

उबेनेच साधे जिथे स्वार्थ सारा
तिथे दहशतीचा शहारा कशाला

खुजे सौख्य माझे असो विस्मृतीचे
विरहवेदनेचा पसारा कशाला

- निलेश पंडित
२४ नोव्हेंबर २०१५

शनिवार, २७ जून, २०१५

शायरी

वाटले होते विचारातून स्फुरते शायरी
आज कळते फक्त जखमेतून झरते शायरी

पाहिजे आहे कुणाला मद्य इष्काची सजा
काय सांगू मात्र त्यातूनच बहरते शायरी

नीट आठवते तुझ्या प्रत्येक डंखाची त-हा
कोवळे सारे जुने क्षण का विसरते शायरी

जहर मी बिनधास्त प्यावे धुंद नजरेचे तुझ्या
नेमका त्यावर उतारा रोज ठरते शायरी

गझल मी लिहिण्यास बसता त्या क्षणी येतेस तू
ह्या अशा खेळात मग सपशेल हरते शायरी

- निलेश पंडित

शुक्रवार, २९ मे, २०१५

चूक

(वृत्त: चामर)

विझविलेस तू हवे इथे तिथे किती दिवे
करून बघ प्रयत्न चेतवावयासही नवे

टाळलेस तू मला असेलही खरे कधी
टाळलीस का खरेच मात्र सर्व आसवे

मांडला हिशेब तोडली समस्त बंधने
सोडले तिने तसेच का तिचे जुने दुवे

घार एकटीच हिंडते नभात नेहमी
कावळ्या नि पारव्यास मात्र लागती थवे

चूक फक्त एक मौन पाळले नको तिथे
आणि आज स्वप्न फोल व्यर्थ सर्व आर्जवे

- निलेश पंडित
३० मे २०१५

(पहिल्या शेरातला खयाल माझा नाही … एक हिंदी शेर वाचनात आला त्यातला … पण मूळ शायर दुर्दैवाने माहित नाही.)

शुक्रवार, ३ एप्रिल, २०१५

जाता जाता

ते जुने सगळेच आता माग जाता जाता
लावली आहेस वेडे आग जाता जाता

हासते अन् लाजते का हे मला समजेना
व्यक्त करताना तिचा ती राग जाता जाता

माळते ती फूल साधे मी दिलेले जेव्हा
फुलवते स्वप्नात माझ्या बाग जाता जाता

ही नव्हे तक्रार जाते देउनी चटका ती
ठेवते ती अटळ मोठा डाग जाता जाता

का पुढे गेलीस दृष्टी क्षीण झाली माझी
मी कसा काढू ठशांचा माग जाता जाता

रात्र येते मग जरा रेंगाळते अन् जाते
फक्त ह्याचा राग ... देते जाग जाता जाता


- निलेश पंडित
४ एप्रिल २०१५

गुरुवार, १९ फेब्रुवारी, २०१५

बहाणे

(वृत्त: मनोरमा)

उष्ण श्वासांचे तराणे
दोन पक्षी एक गाणे

शांततेला सूर मिळतो
गूढ नभरंगा प्रमाणे

शब्द सारे संपताना
शेष अर्थाचे उखाणे

दोन ह्रदये एक ऊर्मी
दोन बाजू एक नाणे

बंद डोळे आत स्वप्ने
अन् तिचे येऊन जाणे

पापण्या मिटताच माझ्या
मन सुरू करते बहाणे

- निलेश पंडित
१९ फेब्रुवारी २०१५