हा ब्लॉग शोधा

शनिवार, १९ नोव्हेंबर, २०२२

उपाधी

 

शब्दार्थांचे अनेक फसवे वर डोलारे

निष्फळ स्वप्नांचे अगणित त्यांतच कंगोरे

... आत दडविते सत्य नेहमी खोल खोलवर

सत्यस्थितीवर दृश्य स्थितीचे वेष्टन न्यारे


हिंदू, मुस्लिम, बौद्ध व ख्रिश्चन ... आणि इतरही

भूक, जीव, उत्पत्ती तशीच ... आणि अस्तही

... आभासाखाली दडणारी दशा विदारक

त्यात अहिंसा असे ... म्हणे ... दिसते हिंसाही


मूढ जिवांना भूल पडतसे सत्यांशाची

नवीनवी लाभताच वस्त्रे वर संज्ञांची

... विकासपत्रे, हरिजन, भूषण आणि अस्मिता

जमीन माता, तसा देशही ... कथा युगांची


पंगू जग वापरते कुबडी अशा कथांची

अशीच आम्हा दिली उपाधी दिव्यांगांची- निलेश पंडित

२० नोव्हेंबर २०२२


शनिवार, १२ नोव्हेंबर, २०२२

जोड

 

भिजविता घामात माती

होय अमृत मानवी

शुष्कता वितळून फुटता

कोवळीशी पालवी


सुरकुत्या वा नितळ काया

हे नसे बंधन तिथे

आजही दूषित जगी या

चेतना गवसे जिथे


नग्न सत्याला दडवते

स्वप्न सुंदर रेशमी

आणि वर आयुष्यभर

करते सुखाची बेगमी


कल्पनेची लाभल्याने

जोड जगण्याला अशी

वाट काटेरी क्षणांची

जाचते ना फारशी- निलेश पंडित

१३ नोव्हेंबर २०२२


गुरुवार, २० ऑक्टोबर, २०२२

तयारी

 वृत्त: प्रियलोचना


जी अनुभूती हवीहवीशी परमश्रमांनी लाभली

तिचीच प्रगती पुनरावृत्तीच्या बाजारी थांबली

... सुखकर निद्रेला दुःस्वप्नांची बाधा जडली जणू

इच्छापूर्ती विरळ तरी इच्छाशक्ती फोफावली


पुन्हापुन्हा ते तेच स्वप्न का, कसे मनोमन जागते?

जगणे केवळ अशक्य कोटीतील दान का मागते?

... स्थिर असण्याचा कंटाळा का देहमनाला ग्रासतो?

गती असावी सुखकर केवळ हीच आस का लागते?


मान वळे अवचित मागे पावले चार जाता पुढे

प्रतिमा उधार इच्छेमध्ये अनुभव पुढती रोकडे

... भूक लागते भूक भागते भूतकाळ होतो फिका

आणि न थांबे धावत जाते पुढेपुढे मन बापडे


संपणार हा प्रवास ह्याची सतत हीच नांदीच का?

सदानुरक्तीतून विरक्तीचीच तयारी हीच का?


- निलेश पंडित

२० आॅक्टोबर २०२२


मंगळवार, ६ सप्टेंबर, २०२२

सत्य

 अदृश्य व दृढ

संस्कृतीचे रूप

सुप्त जाणिवेत

वसते अप्रूप


स्पीड लाइट हे

उल्लेख होतात

एनर्जी तात्काळ

येतसे मनात


गाॅडही आताशा

एक पार्टिकल

संज्ञेत दडते

मनाची उकल


प्रकाश नि गती

तेज व सद्गती

रुपे नकळत

अकस्मात होती


भाषेतून झरे

वृत्ती आपोआप

नव्यांच्या रक्तात

जुन्यांचेही पाप


वाटे जी उकल

तेच खरे कोडे

असहाय्य सत्य

असत्यात दडे


- निलेश पंडित

६ सप्टेंबर २०२२


गुरुवार, ४ ऑगस्ट, २०२२

जीर्ण

 

कोणती कुठे ही कशी चालते वारी

उजळून चेहरा आत जीर्ण आजारी

... कायेस शुष्क ग्रासते झिंग स्वप्नांची

तजवीज मोक्ष चारी मिळण्याची न्यारी


क्षणकाल थबकतो तिष्ठत पिंडापाशी

व्याकूळ भुकेला अगतिक त्रस्त अधाशी

... कावळा जाणतो भले बुरे जगताना

मानव घसरे भूवर बघता आकाशी


लाभली अपरिमित जरी कल्पनाशक्ती

निर्मिती तशी संहाराचीही वृत्ती

... भरघोस देत नियती जोखतसे पाणी

संस्कृती विकृती मधली अथांग व्याप्ती


ही निसर्गनिर्मित विचित्र जादू सारी

मूढता दडे सुज्ञतेत दाट विषारी- निलेश पंडित

४ आॅगस्ट २०२२

शनिवार, ९ जुलै, २०२२

शस्त्र

 

भान असते काय केव्हा नेमके अन् कोणती असते नशा

जाणवेना हे तरीही अवतरे कोठूनशी मोहक दिशा

... भास जो त्या रूपरस अन् स्पर्शगंधाची पडावी मोहिनी

आणि अवचित समजते कैफात होती फक्त नटवी दुर्दशा 


धावतो एका प्रसंगातून मी दुसरीकडे अविरत जरी

जाणतो चढतो उतरतो तीच ती नकळत पुन्हा मी पायरी

... रोज वाटा वेगळ्या अन् वाटते मी कापले अंतर नवे

वर्तुळावर धावल्याची बोच अंती मात्र लागे अंतरी


स्वप्न सत्याऐवजी नकळत मनाला साद देता नेहमी

जन्मतो आभास क्षणभर वेदना दृढ मात्र उरते कायमी

... जसजसा भांबावतो ओशाळतो कळते पुन्हा माझे मला

आग्रहाने संपवावे मागणे माझ्याकडे माझेच मी


.. अन् उमगते आग्रहाने संपवावे मागणे हेही तसे

तोडते जे शस्त्र काही त्याच शस्त्रानेच ते जोडू कसे?- निलेश पंडित

१० जून २०२२