हा ब्लॉग शोधा

शनिवार, २९ मार्च, २०२५

अगोचर

 

संपणे अस्तित्व सर्वांचे भयंकर वाटते 

कल्पनेमधल्या भराऱ्या हेच उत्तर वाटते 


एकदोघांची खरी त्या नेत्रदीपक उन्नती 

वाढले पण बहुजनांपासून अंतर वाटते


भक्त रामाचा म्हणवतो देत आरोळी बडी

पाहता ते ध्यान त्याचे फक्त वानर वाटते


तेच ते असतात सगळे रूप केवळ बदलते

बोलणे प्रेषित महात्म्याचे अगोदर वाटते 


भासते वर जे सुवासिक दडविते दुर्गंध ते

वाहते साधेच पाणी स्वच्छ अत्तर वाटते


निर्मितीनंतर पुढे संहार अनपेक्षित घडे

माणसाला गवसलेलेही अगोचर वाटते


- निलेश पंडित 

३० मार्च २०२५


शुक्रवार, २८ मार्च, २०२५

हुलकावणी

 

मनापासून थोडे वेगळे वागायचे होते

मला माझ्या मनाचे सांगणे ऐकायचे होते


जरी मी चारचौघांसारखा होतो समाधानी

मला तू सोसलेले दुःखही सोसायचे होते


कधी जर भेटलो नसतोच तर झाले बरे असते

असो हे व्हायचे होते जसे ते व्हायचे होते


सदोदित येत वरचेवर पुन्हा स्वप्नात ती गेली  

तिला जाऊनही माझ्याकडे परतायचे होते 


मनाच्या मत्त वारूने उधळणे सोडले नाही

जरासे थांबणे अन् चालणे जमवायचे होते


दिली हुलकावणी प्रत्येक टप्प्यावर मला त्याने 

नशीबाला जणू काहीतरी सुचवायचे होते



- निलेश पंडित 

२९ मार्च २०२५

सोमवार, २४ मार्च, २०२५

उठाठेव


शंकित मनाची   दीर्घ उठाठेव 

हीच एकमेव   नित्य क्रिया 


बाह्य ओढाताण  तशी आंतरिक 

प्रसंगा गणिक   खटाटोप


गोतावळा सारा  पसरे भोवती

त्यात नातीगोती  गदारोळ 


दरी किंवा भिंत  भयाण गवसे

पूल जेथे भासे  आधी मना


गढूळसे पाणी   तृषार्त जीविता

ओंजळ भरता  दिसतसे


सौंदर्याचा ध्यास  अथांग पसारा 

शोध घेणे सारा   वैफल्यात


कोलाहलात ह्या   मंजूळ सुस्वर

पडे कानावर  कोठूनसा


धूळ स्थिर साचे   तळाशी पाण्यात

तहान क्षणात   भागतसे


शुष्क कंठा भासे  अमृताचा स्पर्श 

वैफल्याचे पाश   सैलावती


नवनव्या वाटा   दऱ्यांत दिसती

कवाडे लाभती  भिंतींमध्ये



- निलेश पंडित 

२५ मार्च २०२५


मंगळवार, ११ मार्च, २०२५

जथा

 

तुझी माझीच नाही हीच सर्वांची कथा आहे

जरासे वेगळे नसणेच सर्वांची व्यथा आहे


विलसतो चेहऱ्यावर नेहमी उत्साह सर्वांच्या 

तरीही आत लपलेली सदोदित भयकथा आहे


नद्या सर्वत्र आता वाहती श्रद्धा नि भक्तीच्या

इथे तर्काविवेकाचा घडाही पालथा आहे


शिखर गाठायला जातात तुरळक पालखीमधले

नशीबी सर्व भोयांच्या पुढेही पायथा आहे


विखुरलेलेच दिसती नेहमी सारे जथे येथे

तरी एकाच मार्गावर जथ्यांचाही जथा आहे


- निलेश पंडित

१२ मार्च २०२५

शुक्रवार, २१ फेब्रुवारी, २०२५

भुयार


जिथे जाईन तिथे

निरनिराळ्या भिंतीच असतात 

ज्या अडवतात 

अडथळा बनत 

कधी धडकून 

करतात जखमीही

तरीही धडका मारत 

फोडत तोडत कधी

तर कधी शोधत दरवाजे 

खिडक्याही

आपणच काढावेत मार्ग आपले

दालनं बदलण्याचे

शोधण्याचे 

मोकळी हवा

किंवा कधीकाळी गरज भासलीच

तर फक्त जीव वाचवण्यासाठी 

निवारा


ह्या मौलिक सामाजिक पारंपरिक

अटळ दृढ

शिकवणीतून केलेल्या संघर्षात 

थकून दोन क्षण बसलो

डोळे मिटले आणि ऐकला आवाज

स्वतःच्या श्वासांचा

अजमावली शक्ती

तसंच मर्यादा 

स्वतःच्या शरीराची 

आणि न्याहाळला भवताल 


तेव्हा जाणवला

टणक जमिनीखालील

भुसभुशीत गाभा

थोडंसं वाहतं पाणी 

लुकलुकती शक्यता

भुयारं खणण्याची

जी जाऊन भिडावीत

इतर भुयारांना

तशीच इतरत्र 

कुणी खणली असल्यास 


- निलेश पंडित

२२ फेब्रुवारी २०२५


शुक्रवार, १४ फेब्रुवारी, २०२५

खंत


लाट येते आणि जाते दोन क्षण टिकतो ठसा

मी किनाऱ्यासारखा उरतो जसा होतो तसा


सूत्र असते एक केवळ सर्व जगण्याचे इथे

कष्ट दुःखातून सुख अन् आठवे मग अवदसा


जन्मभर ऐकून सर्वांचे सदोदित वागलो

समजले नाही कधी मी नेमका आहे कसा


गुंतलो नाही स्वताच्या वर्तुळाबाहेर मी

चूक झाली आतही गेलोच नाही फारसा


नेहमी कुरवाळली माझी कथा माझी व्यथा 

आज कळते शेवटी गेलो उगाळत कोळसा


मी मला बघतो असा की मी जणू नवखा कुणी

वाटते माझा मला उरला नसावा भरवसा 


बांधल्या कित्येक भिंती भोवती माझ्याच मी

लावणे राहून गेले पण कुठेही आरसा



- निलेश पंडित 

१५ फेब्रुवारी २०२५