हा ब्लॉग शोधा

शुक्रवार, २४ एप्रिल, २०१५

काणाडोळा

ज्यातून बाहेर येणं दुरापास्त
ज्याची ना संपते तल्लफ
ना नशा
असं जडलंय मला
व्यसन काणाडोळा करण्याचं
निरनिराळ्या रुपांनी अवतरणा-या
त्याच त्या ह्या प्रश्नाकडे
जो ठरेल कधी ना कधी
माझ्याच गळ्याभोवतीचा फास
पण दुर्लक्ष करताच तूर्तास
मार्ग खुले करतो
भरभराटीच्या
मस्तीसुस्तीच्या
अल्पजीवी पण अमर्याद नशेचे


सिगारेटच्या पाकिटातल्या चांदीवरल्या
पांढ-याशुभ्र भुकटीभोवती तरणी पोरे
त्या पोरांवर पोट भरुन
नोटांच्या - इतरही -
कृष्णनशांमधे मश्गूल
निर्बुद्ध बलिष्ठ काही
त्यांच्या बलावर अधिराज्य गाजवत
निद्रिस्त न्यायव्यवस्थेच्या शुचितेचा हवाला देत
सतत स्वच्छ शूभ्र पोषाखात
चतुर सूत्रधार
त्या सूत्रधारांना आशिर्वाद देणारे
भगव्या-हिरव्या वस्त्रांतील
राजस महात्मे
.... आणि त्या राजतेजाची शहानिशा
अशक्यप्राय, निंदनीय मानून
अतीव श्रद्धेने माथा तुकवणारा
जगण्याच्या व्यसनात रममाण मी

नेमकं व्यसन कोणतं?
नेमकं व्यसनी कोण?



- निलेश पंडित
२५ एप्रिल २०१५

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा