हा ब्लॉग शोधा

शुक्रवार, २७ नोव्हेंबर, २०१५

व्रत


(वृत्त: हरिभगिनी)

कोण कोठला नसे ज्ञात तो अनेक असले वावरती
कद्रू मर्यादित वृत्ती जी पाहुनि होते गुंग मती
प्रभूत्व भाषेवरती असते तर्कावरती जरी नसे
चेहऱ्यावरी सुज्ञपणा मेंदू-हृदया ग्रासते पिसे

चरफडतो तडफडतो तो त्वेषाने अगम्य बडबडतो
चिकित्सकाचा आव भूमिका आडमुठ्याची बाळगतो
तेजस्वी अन् थोर वाटते सदैव त्याला परंपरा
म्हणतो 'अपयश परंपरेचे परकीयांचा दोष खरा'

परकीयांची वैज्ञानिकता वापरतो तो नित्य जरी
म्हणतो 'ज्ञानी बलाढ्य होतो पूर्वी आम्ही कितीतरी'
'काय कसा उपयोग करावा पुराणातल्या ज्ञानाचा?'
ह्या प्रश्नावर उत्तरतो तो 'प्रश्न असे अभिमानाचा!'

धर्म जात त्याचेच श्रेष्ठ हा ठाम मनी विश्वास असे
स्पष्ट निकषही एक नेहमी 'इतरांचे निकृष्ट कसे'
बदलाच्या भोळ्या आशेने, अभिमानाने पीडित तो
भिन्न मताला द्रोह मानतो बहिऱ्याचे व्रतही घेतो

'मूळ अर्थ, उद्देश मूळ संज्ञांचे होते उच्च किती'
हे सांगत सुटतो ऐकवतो सुभाषिते सगळी अंती
प्रत्यक्षात न का उतरावे सहस्त्र वर्षे हे सगळे
सद्य पिढ्यांना दोष देत तो चर्चेमधुनी ते वगळे

मनातल्या वैफल्याने पदरापदराने जळणारा
विरोध संपवण्यासाठी व्यक्तींवर हल्ला करणारा
हा जो इतरांच्या न्यूनावर नेहमीच बरळत जगतो
शब्द व्यर्थ ठरतात तसे तो शब्दांविण पुरता कळतो

- निलेश पंडित
२८ नोव्हेंबर २०१५

३ टिप्पण्या: