हा ब्लॉग शोधा

रविवार, १३ डिसेंबर, २०१५

स्थिती

(वृत्त: वियद्गंगा)


स्थिती आता समाधानातली माझी बरी आहे
विवेका नेहमी माझ्या-तुझ्यामध्ये दरी आहे

कुणी हिरवा कुणी भगवा कुणी रंगाविना जगतो
पुरा इतिहास भीषण लाल रक्ताचा जरी आहे

गरीबीची चिकित्सा नेहमी मी नेमकी करतो
अशांच्या बातम्यांवर चालणारी चाकरी आहे

असावे माणसांनी पूर्णतः भयमुक्त मी म्हणतो
मला जातील का विसरून हे भय अंतरी आहे

निखारे रोज भडकावे इथे जाती नि धर्मांचे
अशांवर रोज माझी भाजली मी भाकरी आहे

निरंतर ऐकतो महती पुरातन संस्कृतीची मी
कळेना कंस वा श्रीकृष्ण कोणाची खरी आहे

- निलेश पंडित
१४ डिसेंबर २०१५

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा