हा ब्लॉग शोधा

शुक्रवार, १८ डिसेंबर, २०१५

विसर


वाहते आयुष्य हे निर्मळ कधी अवखळ कधी
फक्त तुटता एक नाते होतसे निष्फळ कधी

शुभ्र स्फटिकातून जेथे वाहतो सुंदर झरा
भग्न काळे पाहिले तेथेच मी कातळ कधी

मौन अन् एकांतवासाची कळावी थोरवी
ठिकठिकाणी ह्याचसाठी वाढते वर्दळ कधी

रोज बघतो भव्य लाटा खोल विहिरी गूढशा
वाटतो लोभस मनाला शेवटी ओहळ कधी

नेमकेपण बारकाई शिस्त असली बंधने
वाटते आयुष्यही व्हावे जरा ढोबळ कधी

जे मला विसरायचे असते तसे ते विसरतो
मात्र निष्कारण उरी ते माजवी खळबळ कधी

- निलेश पंडित
१९ डिसेंबर २०१५

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा