हा ब्लॉग शोधा

बुधवार, १३ जानेवारी, २०१६

मार्ग


(वृत्त: विनोद)

संवाद संपल्याने
संपेल का दिलासा
का टाकतेस आता
तू आर्त हा उसासा

निःशब्दतेस आहे
ग्रासून राहिलेला
अंधार ह्या क्षणी मी
चरकून पाहिलेला

आहे कितीक वर्षे
निपचीत मौन जागे
त्यातील चेतना का
उरली न आज मागे?

आशाच संपल्याने
भेटू पुन्हा कधी ही
ऊर्जाच लोपली का
जगण्यातली तुझीही?

तो नेक मार्ग एक
समजून जो धरावा
बदलून हात वेडे
हातातला बघावा

शिकलो सदैव दोघे
प्रगतीत विश्व दडते
जावे पुढेच तेव्हा
आयुष्य रम्य घडते

त्यातून ऐक पुढचे
हातात हात नसता
मी नेहमी दिसेन
मागे वळून बघता


- निलेश पंडित
१४ जानेवारी २०१६

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा