हा ब्लॉग शोधा

गुरुवार, १८ ऑगस्ट, २०१६

सज्ज


निबिड अरण्य ... घनदाट
पायाखाली चिखल
किर्र अंधार
काट्याकुट्यांची वाट
ह्यातच जन्म ... तशीच वाढ
तरीही कष्टाने मिळवून
वाटलेला प्रकाश

अशा खडतर प्रवासावर
लावून अभिमानाची झालर
मिळवलेली भूमिका
नायकाची ... महात्म्याची नंतर
मग प्रेषिताचीही

स्वत:सही अज्ञात
पण अनुयायांनी ठामपणे ... वारंवार
सांगितलेली दिव्यं .... रचलेली काव्यं
अरण्य, चिखल, अंधार, अभिमान, काटेकुटे
ह्यांना त्यागाच्या महान कोंदणात
जडवून घडवलेलं
रत्नजडित सुवर्ण सिंहासन

.... हे सर्व .... हे सर्व ....
त्याला वाटलं निव्वळ अपयश
जेव्हा दिसले अनुयायी
सज्ज ... सिंहासन काबीज करण्यास
आणि दिसले सज्ज
त्याची थंडपणे वाट पहात
स्थिर .... अटळ
निबिड अरण्य .... काटेकुटे .... किर्र अंधार
पुन्हा एकदा

- निलेश पंडित
१८ आॅगस्ट २०१६

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा