हा ब्लॉग शोधा

शुक्रवार, २५ नोव्हेंबर, २०१६

गाभा


विरोधाचा खुल्या गाभा जरा शाबूत ठेवावा
असत्याने कटू सत्यातला आघात झेलावा

उपायांच्या करू चर्चा परंतू सत्य स्वीकारू
फुकाचे साजरे आभास करण्याचा पुरे कावा

नसे सोपे कुणालाही इथे आशेविना जगणे
तरी ना फोल आशेच्या नशेचा खेळ खेळावा

पुन्हा पाणी नको काळे नको हौतात्म्य कोणाला
तमा नाही समाजाला तिथे का प्राण वेचावा

जिथे वर्षे हजारो झुंजल्याने थोडके घडते
कसा कोणी तिथे आम्हांस जादूगार भेटावा


- निलेश पंडित
२६ नोव्हेंबर २०१६

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा