हा ब्लॉग शोधा

रविवार, ३१ मे, २०२०

खूळ


हवे होते तसे ते सर्व आहे लाभले आता
मिळवण्याचे परंतू खूळ आहे लागले आता

मनाची पाळणारे स्वच्छता कित्येकजण होते
मदाऱ्यांनी असे आहेत येथे पाळले आता

बियाणे कोणतेही आणि मातीही असो काळी
विषारी तण इथे सगळीकडे फोफावले आता

गरीबीचे असत वृत्तांत अन् फोटो कधीकाळी
किती प्रगती कसे भरपूर व्हिडिओ काढले आता!

जगाला साफ कळले देव ही कविकल्पना केवळ
समजता हे लगोलग दैत्य सगळे माजले आता

न कोणी राहिले माझे न मीही राहिलो तेथे
तरीही आपसुक वळतात तिकडे पावले आता


- निलेश पंडित
१ जून २०२०


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा