हा ब्लॉग शोधा

मंगळवार, २२ सप्टेंबर, २०२०

मुक्त

 

गायचं आपणही - गाणार मीही.

असं ठरवलं मी.

कुणीतरी बुरसटलेल्या विचारांचा जुनाट गायक म्हणाला, 

"तंबोरा घे, स्वरसाधना कर, रियाझ कर, संगीत रत्नाकर वाच थोडं, शिक कुणाकडून तरी जरा.

शास्त्र, सराव, कष्ट हा सर्व क्रिडा-कलांचा पाया. मग पेर नाविन्य आणि प्रायोगिकता त्यात."


तेव्हा सांगितलं मी तडफदार पणे,

"मी गाणार फक्त मुक्त.

आतून आतून आलेलं. 

नरड्यातून उमटतं तसं थेट.

लय सूर शब्दांची बंधनं झुगारून."


गायलो तसा. गातो तसा. गात राहीन तसा.

समविचारी सह्रदय नवनिर्मितीपरायण लोक जमत गेले जसजसे 

तसतशा मिळत गेल्या टाळ्या भरपूर 

(का कुणास ठाऊक अनेकदा हशाही!)

फक्त ते जुनाट विचारांचे लोक बिचारे -

तज्ज्ञ म्हणतात लोक ज्यांना ते -

आजही आहेत अनभिज्ञ

माझ्या लय-सूर-कालातीत कलाविष्काराबद्दल.


हे लिहिलं

जसं उमटलं तसं

आतून आतून

(म्हणजे नक्की कुठून ते माहित नाही अद्याप)

आणि जाणवलं.

लिहिला असता सरळ परिच्छेद तरी

चाललं असतं.

पण असाच लिहितात म्हणे

मुक्त मनाचे मुक्त नवकवी

मुक्तछंद!



- निलेश पंडित

२३ सप्टेंबर २०२०


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा