परतीच्या वाटा | होत जाता सुरू
कसे मी नाकारू | सामान्यत्व
आनंददायक | भासे खटाटोप
आणि समारोप | जीवघेणा
भासले जगता | हातातले क्षण
फक्त उधळण | क्षणाेक्षणी
असामान्य जे जे | वाटे वरवर
रिक्त खरोखर | जगताना
सरता आनंद | बोचली पोकळी
अजस्त्र मोकळी | खोलवर
आणि दुर्लक्षिता | पोकळी सदैव
वसली जाणीव | समृध्दीची
क्षणिक टिकून | ऐशी ही जाणीव
अनंत उणीव | पुन्हा तीच
अशा चकव्यात | कळले न आधी
मृत्यू नसे व्याधी | कदापीही
असणे नसणे | ह्यांमधे वेदना
भयस्वप्ने नाना | देत गेली
क्षणमात्र तिला | थोडे विसरावे
आदिअंत व्हावे | अविभाज्य
मर्म हे नेमके | जाणता मी आज
प्रवास सहज | वाटे आता
सामान्यासामान्य | व्यर्थ अट्टाहास
संतत प्रवास | हेचि सत्य
लिप्त अलिप्त हा | वाद आता नुरे
अंती फक्त उरे | क्षणक्षण
- निलेश पंडित
३० आॅक्टोबर २०२०
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा