हा ब्लॉग शोधा

शुक्रवार, ४ डिसेंबर, २०१५

अट

(वृत्त: उपेंद्रवज्रा)

जबाबदारी अधिकार ह्यांचे
उदासवाणे विपरीत कोडे
सदैव राही मखरात कोणी
कुणी जगावे झिजवीत जोडे

ददात नाही कसलीच ज्यांना
प्रतोद त्यांचा स्वजनांस जाचे
जिवास त्यांच्या जपतात जे जे
खलास होते जगणेच त्यांचे

मुखात त्यांच्या रुजतात स्वप्ने
समाज ज्यांना वलयात राखे
अतर्क्य भारी परमेश भोळा
अशक्त भक्तां नरकात टाके

अतीव सोपी अट एवढीशी
समानतेचा बुरखा असावा
जपून साऱ्या बहुमोल श्रद्धा
हरेक भोळा भजनी वसावा


- निलेश पंडित
५ डिसेंबर २०१५

२ टिप्पण्या:

  1. "अतीव सोपी अट एवढीशी
    समानतेचा बुरखा असावा" _/\_ अप्रतिम!

    ('निर्जीव' ऐवजी 'निरर्थ' किंवा 'निमूढ' वापरलं तर वृत्तात बसेल.)

    उत्तर द्याहटवा
  2. Excellent. नजरचुकीने वृत्तभंग झाला होता.
    करतो दुरुस्त.
    धन्यवाद.

    उत्तर द्याहटवा