हा ब्लॉग शोधा

शनिवार, ४ एप्रिल, २०२०

उघडीप


खिन्नता वर्षानुवर्षे
अवतीभवती नांदूनही
अंतसमयी
चेहर्‍यावर तरळावं
समाधानाचं
परिपूर्ण स्मितहास्य

असं भाग्य लाभणारा
ठरला तो एक
जेव्हा त्यानं पाहिलं
स्वतः झिजून कुजून
जीर्ण होऊन
नामशेष होताना
आजुबाजूला सर्वत्र
झपाट्यानं बदललेल्या
परिसराकडे

जिथे त्याच्याचसारख्या
त्याच्याच जैविकतेच्या
फक्त छोट्या छोट्या
क्षुद्र-क्षुल्लक
जिवांवर चालवल्या गेल्या
कुऱ्हाडी व करवती
आणि त्यांच्या माफक
हिरवाईचा उपयोग न होता
झाला त्यांनी व्यापलेल्या जमिनींचा
अधिकाधिक खणण्यासाठी
जे राखण्यासाठी
राहिले होते उभे
काही माफक सांगाडे
बसक्या इमारतींचे
लाकडांच्या
त्याच्यासारख्या निष्पापांच्या
खोडांमधून निघालेल्या

... आणि तिथे दिसलं त्याला
ओसरत्या पुरात घडलेलं
मृत्यूनं घातलेलं थैमान
सर्व लहानथोरांना
एकसारखं
गिळंकृत करून
नव्या सूर्यप्रकाशात
जुन्याच बीजांमधून
उघडीप होताच
स्वच्छ नवीन हिरवी रोपटी
आणि पालवी
जन्मण्यासाठी


- निलेश पंडित
५ एप्रिल २०२०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा